Bangladesh's China-Pak ties and Yunus govt pose new challenge to India
Pakistan celebs social media ban : बांगलादेश सध्या भारतासाठी एक नवे आणि गंभीर धोरणात्मक आव्हान बनत चालले आहे. विशेषतः अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळात भारतविरोधी भूमिकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. युनूस यांनी भारताच्या पारंपरिक शत्रूंशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असून, त्याचे परावर्तन भारत-बांगलादेश संबंधांवर स्पष्टपणे दिसून येत आहे.
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात बांगलादेशने चीन आणि पाकिस्तानसोबत धोरणात्मक चर्चांना गती दिली आहे. अलीकडेच चीनच्या कुनमिंग शहरात बांगलादेश, पाकिस्तान आणि चीन यांच्यात त्रिपक्षीय बैठक पार पडली. यामध्ये प्रादेशिक सहकार्य वाढविण्यासाठी संयुक्त कार्यगट स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. बांगलादेशने अद्याप त्याला मान्यता दिली नसली तरी, अशा चर्चांमध्ये सहभागी होणेही भारतासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
चीनने बांगलादेशात लष्करी आणि नागरी पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. यामध्ये मोंगला बंदर, औद्योगिक पार्क्स, विमानतळ आणि इतर अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. लष्करी दृष्टिकोनातूनही चीनच्या या उपस्थितीमुळे भारताच्या पूर्वेकडील सीमांवरील सुरक्षेच्या मुद्द्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीन करत आहे तिसऱ्या महायुद्धाची तयारी? बीजिंगजवळ अणुहल्ला झेलू शकणारे गुप्त लष्करी शहर उभारले
बांगलादेश ही दक्षिण आशियातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे. त्याची भौगोलिक स्थिती, विशेषतः बंगालच्या उपसागरातील सागरी मार्ग आणि हायड्रोकार्बन साठ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शिवाय, भारत आणि बांगलादेश यांच्यात जगातील सर्वात लांब आंतरराष्ट्रीय सीमा आहे, त्यामुळे कोणत्याही अस्थिरतेचा थेट परिणाम भारताच्या ईशान्य राज्यांवर होऊ शकतो.
राजकीय विश्लेषक डॉ. रंजन सिंग यांच्या मते, भारताला या परिस्थितीत संयमाने काम करावे लागेल. “शेजारी देश बदलता येत नाही. बांगलादेशात सत्तांतर घडेल, तेव्हा परिस्थिती बदलू शकते. सध्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) पुढे असून, भारताने त्यांच्या नेतृत्वाशी संवाद सुरू ठेवावा,” असे सिंग सांगतात. भारताने बांगलादेशात स्वतःची उपस्थिती कायम ठेवणे आवश्यक आहे. जर भारत बांगलादेशाकडे दुर्लक्ष करतो, तर चीन-पाकिस्तान यांचा प्रभाव अधिक वाढू शकतो. यामुळे भारतविरोधी भावना वाढण्याचा धोका वाढेल आणि भारताच्या ईशान्य भागातील शांतता व विकासप्रक्रियेला फटका बसू शकतो.
बांगलादेश आता भारत-चीन भूराजकीय स्पर्धेचे नवे केंद्र बनले आहे. चीनने 2016 मध्ये जाहीर केलेले 27 प्रकल्प अद्याप पूर्ण केले नसले, तरी भारताने सक्रिय भागीदारी दाखवताच चीन पुन्हा अॅक्टिव्ह झाला. विशेषतः मोंगला बंदराच्या प्रकल्पात भारताच्या सहभागामुळे चीनने निधी जाहीर करून आपली उपस्थिती पुन्हा अधोरेखित केली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पृथ्वीचा वेग वाढतोय! मानव इतिहासातील सर्वात ‘लहान दिवस’ जुलै-ऑगस्टमध्ये अनुभवण्याची शक्यता
सध्याच्या राजकीय स्थितीत बांगलादेश भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील बनले आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सहकार्याने बांगलादेश भारताच्या विरोधात वळत असल्याचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे भारताने संयमाने, पण दूरदृष्टी ठेवून युनूस सरकारशी तात्पुरते संबंध राखत, भावी सत्तांशी संपर्क वृद्धिंगत करण्यावर भर देणे गरजेचे आहे. तसेच, बांगलादेशातील पायाभूत प्रकल्पांमध्ये अधिक गुंतवणूक करून भारताची उपस्थिती भक्कम करणे हेही तितकेच आवश्यक ठरेल.