
Birds Fear Women More Than Men Urban Bird Behavior Study 2026
शहरी पर्यावरणात मानवांसोबत राहणाऱ्या पक्ष्यांच्या वर्तनाबद्दल एक थक्क करणारा वैज्ञानिक शोध समोर आला आहे. आपण अनेकदा रस्त्यावर, बागेत किंवा घराच्या गच्चीवर कबुतरे, साळुंक्या आणि चिमण्यांसारख्या पक्ष्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु, एक नवा आंतरराष्ट्रीय संशोधन अहवाल सांगतो की, जेव्हा एखादी स्त्री पक्ष्यांच्या जवळ जाते, तेव्हा पक्षी अत्यंत सावध होतात आणि पटकन उडून जातात. याउलट, पुरुष जवळ आल्यास पक्षी त्यांना आणखी थोडे जवळ येऊ देतात. या अजब वर्तनाने जगभरातील प्राणीशास्त्रज्ञ आणि संशोधकांना चक्रावून टाकले आहे. (Science Mysteries)
‘जर्नल ऑफ द ब्रिटिश इकोलॉजिकल सोसायटी’ मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, पक्षांच्या ३७ वेगवेगळ्या प्रजातींवर हे संशोधन करण्यात आले. माणसांच्या अगदी जवळ राहणाऱ्या कबुतारांपासून ते अत्यंत भित्र्या मानल्या जाणाऱ्या साळुंक्या आणि कावळ्यांपर्यंत सर्वच पक्ष्यांमध्ये हेच वर्तन सातत्याने दिसून आले. हा अभ्यास झेकिया, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि स्पेन या पाच युरोपीय देशांमधील विविध शहरांमध्ये पार पडला.
या प्रयोगात संशोधकांनी पक्ष्यांच्या ‘फ्लाइट इनिशिएशन डिस्टन्स’ (Flight Initiation Distance – FID) म्हणजेच ‘धोका ओळखून उडून जाण्याचे अंतर’ या मानकाचा अभ्यास केला. जेव्हा एखादा पुरुष पक्ष्यांच्या दिशेने चालत गेला, तेव्हा पक्ष्यांनी त्याला सरासरी एक मीटर (सुमारे ३ फूट) अधिक जवळ येण्याची परवानगी दिली. मात्र, तीच गोष्ट जेव्हा एखाद्या स्त्रीने केली, तेव्हा पक्षी अधिक अंतरावरूनच भीतीपोटी किंवा सावधगिरी म्हणून उडून गेले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या जावयाचा फोन हॅक; सौदी अरेबिया आणि यूएईसोबतचे गुप्त करार आले उघडकीस
या संशोधनात सहभागी असलेले युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस (UCLA) चे प्राध्यापक डॅनियल ब्लमस्टाईन यांनी सांगितले की, “शहरी पक्षी जवळ येणाऱ्या व्यक्तीचे लिंग ओळखून त्यानुसार प्रतिक्रिया देतात यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही अत्यंत प्रगत तुलनात्मक विश्लेषण पद्धतींचा वापर केला आहे, ज्यातून हे स्पष्ट झाले की सर्व शहरांमध्ये आणि पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये हे वर्तन एकसारखेच आहे. परंतु, यामागील मूळ कारण काय आहे हे सांगणे सध्या तरी कठीण आहे.”
प्राग येथील ‘झेक युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ सायन्सेस’च्या डॉ. यानिना बेनेडेटी, ज्या या संशोधन पथकाचा भाग होत्या, यांनी या निष्कर्षावर आश्चर्य व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “पर्यावरण क्षेत्रात काम करणारी एक महिला म्हणून पक्ष्यांनी आम्हाला असा वेगळा प्रतिसाद दिला हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले. प्राणी विज्ञानात सहसा मानवी निरीक्षकाला ‘तटस्थ’ मानले जाते. परंतु या अभ्यासाने दाखवून दिले आहे की शहरी प्राणी माणसांकडे कसे पाहतात आणि त्यांच्यात कसा सूक्ष्म फरक करतात.”
शास्त्रज्ञांच्या मते, पक्षी माणसांच्या चालण्याची पद्धत, शरीराची बनावट, कपड्यांचा रंग, डोळ्यांच्या बाहुल्यांची हालचाल किंवा शरीराचा गंध यांपैकी कोणत्या घटकावरून पुरुष आणि स्त्री यांच्यातील फरक ओळखतात, यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : LAC Update: अजित डोवाल थेट चीनमध्ये! बीजिंगच्या 25 व्या बैठकीत 8 मोठे निर्णय; 21 वर्षांनंतर अखेर भारत-चीन सीमेचा प्रश्न सुटणार?
हा शोध केवळ एक रंजक माहिती नसून, त्याचा शहरी परिसंस्थेच्या (Urban Ecology) अभ्यासावर मोठा परिणाम होऊ शकतो. आजवर प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करताना संशोधकाचे लिंग विचारात घेतले जात नव्हते. मात्र, आता भविष्यकाळात प्राण्यांवर होणाऱ्या प्रयोगांमध्ये महिला आणि पुरुष निरीक्षकांच्या उपस्थितीचा प्रभाव विचारात घ्यावा लागणार आहे.
पक्षी मानवी वर्तनातील अत्यंत बारीक गोष्टी आत्मसात करतात हे यावरून सिद्ध झाले आहे. पक्षी स्त्रियांना अधिक घाबरतात की त्यांच्या संवेदनशीलतेमुळे त्वरित सावध होतात, याचे उत्तर शोधण्यासाठी आता जगभरात पुढील प्रयोग सुरू आहेत.
Ans: आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार पक्षी स्त्रियांना पाहिल्यावर अधिक सावध होतात. परंतु ते गंध, चालण्याची पद्धत की कपड्यांमुळे अंतर ठेवतात, याचे मुख्य कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Ans: हा अभ्यास युरोपमधील ५ देशांमध्ये (झेकिया, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, स्पेन) ३७ वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजातींवर पार पडला.
Ans: संशोधनात आढळले की पक्षी पुरुषांना स्त्रियांपेक्षा सरासरी १ मीटर (सुमारे ३ फूट) अधिक जवळ येण्याची मुभा देतात.