China enters a new tech-war era deploying unmanned ground vehicles on the border
China UGV deployment border : चीनने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने युद्धाच्या नव्या युगात पाऊल ठेवले असून, त्याचे ताजे उदाहरण म्हणजे सीमेवर तैनात होणारी मानवरहित युद्ध यंत्रे (UGVs – Unmanned Ground Vehicles). ही यंत्रे केवळ युद्धासाठी वापरली जाणारी साधने नसून, ती शत्रूच्या हालचाली टिपण्यासाठी, पर्वतरांगांमध्ये सहज फिरण्यासाठी आणि थेट हल्ला करण्यासाठी सक्षम आहेत. यामुळे भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
चीनने सध्या ‘शार्प क्लॉ’ आणि ‘शार्प क्लॉ २’ नावाची दोन प्रमुख UGV विकसित केली आहेत. शार्प क्लॉचे वजन सुमारे १२० किलो असून, ते ६ किमीपर्यंत हालचाल करू शकते. विशेष म्हणजे, हे वाहन डोंगराळ भागांमध्येही सहज चढ-उतार करू शकते. त्यामध्ये हलक्या मशीन गन आणि हाय-रेझोल्युशन कॅमेरे बसवलेले आहेत. त्यामुळे हे UGV शत्रूच्या हालचाली टिपणे, लक्ष्य निश्चित करणे आणि हल्ला करणे या तिन्ही गोष्टी सहज करू शकते. शार्प क्लॉ २ हे आणखी प्रगत मॉडेल असून, गुहा, बंकर आणि इमारतीसारख्या जटिल रचनांवर थेट हल्ला करण्यास सक्षम आहे. चीन लवकरच हे यंत्र युद्धभूमीवर उतरवण्याच्या तयारीत आहे.
इतकेच नाही, तर चीनने चार पायांचे रोबोट कुत्रे आणि लांडगेही विकसित केले आहेत. हे यंत्रमानव अत्यंत वेगाने हालचाल करू शकतात आणि प्राणघातक हल्ला करण्यास सक्षम आहेत. सध्या हे प्रोटोटाइप स्वरूपात असले तरी, लवकरच चीन हे देखील सीमेवर उतरवू शकतो, असा अंदाज लष्करी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सूर्यमालेत परग्रहीय ‘घुसखोर’! नासाचा ‘Interstellar Object A11pl3Z’ बद्दल धक्कादायक खुलासा
चीनचे हे पाऊल एक प्रॉक्सी वॉर (Proxy War) प्रकारातील धोरण मानले जात आहे. थेट मानवाला युद्धात झोकण्याऐवजी, रोबोट आणि UGV चा वापर करून मानवी नुकसान टाळण्याचे उद्दिष्ट चीनने ठेवले आहे. अशा तंत्रज्ञानामुळे लढाईतील धोके कमी होतात आणि सैन्याची ऊर्जाही वाचते. चीनने आपल्या २०२४ च्या संरक्षण बजेटमध्ये तब्बल $२२५ अब्ज डॉलर्सची तरतूद केली होती. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या माहितीनुसार, २०२५ मध्ये हे बजेट आणखी वाढवले जाण्याची शक्यता आहे. या पैशाचा मोठा वाटा एआय (AI), रोबोटिक्स, ड्रोन आणि UGV वर खर्च केला जाणार आहे.
भारत-चीन सीमेवरील तणाव अजूनही पूर्णतः निवळलेला नाही. अशा परिस्थितीत चीनकडून यंत्रांच्या माध्यमातून युद्धासाठी केलेली तयारी ही भारतासाठी मोठा धोका ठरू शकते. चीनकडून उच्च तंत्रज्ञानाची शस्त्रे, युद्ध यंत्रे आणि रोबोट्स सीमेवर तैनात होऊ लागल्यास, भारतीय लष्करालाही तंत्रज्ञान आधारित संरक्षणात वाढ करणे अपरिहार्य होईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जागतिक UFO दिन म्हणजे काय? जाणून घ्या ‘या’ दिवसामागचा खास इतिहास
चीनचा हा युद्धसज्जतेचा नवा चेहरा म्हणजे शस्त्रसज्ज रोबोट्स, मानवरहित वाहनं आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून युद्ध लढण्याची योजना आहे. हे ‘राक्षस’ सैनिक मेंदूहीन, हृदयहीन असले तरी, त्यांची प्रभावी मारकता मानवासारखीच किंबहुना त्याहूनही अधिक असू शकते. भारतीय लष्कर आणि संरक्षण मंत्रालयासाठी हा इशारा आहे की, भविष्यातील युद्ध आता माणसांपेक्षा यंत्रांमध्ये खेळले जाणार आहे. आणि त्यासाठी आता तयारी करणे गरजेचे आहे.