
china hongqi bridge landslide tibet route traffic affected video viral
सिचुआन प्रांतातील तिबेटला जोडणारा होंगकी पूल भूस्खलनामुळे कोसळला.
या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
चीनच्या अभियांत्रिकी सुरक्षिततेबद्दल आणि बांधकाम गुणवत्तेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Hongqi Bridge Collapse : चीनच्या( china) सिचुआन प्रांतात नुकताच बांधलेला होंगकी पूल (Hongqi Bridge) मंगळवारी अचानक कोसळल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. हा पूल चीनच्या मध्यभागाला तिबेटशी( Tibet) जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा एक महत्त्वाचा भाग होता. या अपघातामुळे तिबेटशी रस्ते संपर्क पूर्णपणे खंडित झाला असून वाहतूक सेवा ठप्प झाल्या आहेत. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही.
होंगकी पूल हा ७५८ मीटर लांबीचा आधुनिक पूल असून, काही महिन्यांपूर्वीच त्याचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. चीनने या पुलाचे उद्घाटन “अभियांत्रिकी कौशल्याचे उदाहरण” म्हणून जगभरात प्रसिद्ध केले होते. परंतु केवळ काही महिन्यांतच तो कोसळल्याने चीनच्या तांत्रिक दाव्यांवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मेरकांग शहरात सोमवारपासूनच पुलाजवळील डोंगराळ भागात भेगा दिसू लागल्या होत्या. भूभाग हलू लागल्याचे संकेतही मिळत होते. त्यामुळे सावधगिरी म्हणून वाहतूक बंद करण्यात आली होती. परंतु मंगळवारी दुपारी झालेल्या मोठ्या भूस्खलनामुळे पुलाचा काही भाग अक्षरशः उद्ध्वस्त झाला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये संपूर्ण पूल कोसळताना दिसतो. व्हिडिओ पाहून अनेकांनी चीनच्या “अभियांत्रिकी निष्काळजीपणावर” थेट टीका केली आहे. काही वापरकर्त्यांनी या घटनेला नैसर्गिक आपत्तीचे परिणाम म्हटले असले तरी, बहुतेकांचे मत आहे की पूल बांधणीच्या प्रक्रियेत दर्जात्मक त्रुटी झाल्या असाव्यात.
JUST IN: 🇨🇳 Hongqi bridge collapses in southwest China, months after opening. pic.twitter.com/EK3YcWEjUy — BRICS News (@BRICSinfo) November 11, 2025
credit : social media
हे देखील वाचा : World Pneumonia Day : श्वास एक…धोके अनेक! प्रदूषण, थंडी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती न्यूमोनियाचे तीन गुप्त शत्रू
चीन सरकारने तात्काळ या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक पोलिस, पायाभूत सुविधा विभाग आणि सिचुआन रोड अँड ब्रिज ग्रुपच्या अधिकाऱ्यांना चौकशीत सामील करण्यात आले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या भागात भूकंप आणि भूस्खलनाची शक्यता कायम असते, त्यामुळे कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी भूगर्भीय सर्वेक्षण अत्यंत काटेकोर असावे लागते. तथापि, सोशल मीडियावर अनेक नागरिक आणि तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत की, जर पूल अलीकडेच उघडण्यात आला होता, तर त्याच्या गुणवत्तेची तपासणी नेमकी कशी झाली होती? आणि अशा “महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावर” इतकी मोठी चूक कशी घडली?
हे देखील वाचा : पुन्हा होणार ‘Operation Sindoor 2.0’? दिल्ली बॉम्बस्फोटनंतर देशात हाय अलर्ट; PM Modi घेणार CCS बैठक
चीनने गेल्या काही वर्षांत स्वतःला “तांत्रिक आणि अभियांत्रिकी सामर्थ्यवान देश” म्हणून सादर केले आहे. मोठ्या पुलांपासून हाय-स्पीड रेल्वेपर्यंत अनेक प्रकल्प चीनच्या “आधुनिकतेचे प्रतीक” मानले गेले. परंतु होंगकी पुलाच्या दुर्घटनेने या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. ही घटना २०२१ मधील गेझोउबा पूल दुर्घटनेची आठवण करून देते, ज्यामध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला होता. सिचुआनसारख्या भूकंपप्रवण प्रदेशात मोठ्या पायाभूत प्रकल्पांवर कठोर देखरेखीची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. होंगकी पुलाचा कोसळणे ही केवळ एक “अभियांत्रिकी दुर्घटना” नसून, चीनच्या आधुनिक पायाभूत रचनेतील सुरक्षिततेच्या त्रुटींचे द्योतक आहे. या घटनेने तांत्रिक प्रगती आणि जमिनीवरील वास्तव यात किती मोठे अंतर आहे, हे स्पष्ट केले आहे. आता या चौकशीतून काय निष्कर्ष निघतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.