चीन मोठ्या युद्धाच्या तयारीत? PLA साठी दिली 'या' 10 लाख आत्मघाती ड्रोनची मोठी ऑर्डर
बिजींग: चीनने आपल्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA)साठी 10 लाख आत्मघाती ड्रोन खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ड्रोन 2026 पर्यंत PLA ला पुरवले जातील. या महाऑर्डरची जगभर चर्चा सुरू आहे. मात्र, चीनच्या या कृतीने त्याच्या युद्धसंबंधी महत्त्वाकांक्षेचे संकेत दिले असून जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चीन तैवानवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे.
हे कामिकाझे ड्रोन म्हणजे शत्रूच्या लक्ष्यावर आदळून मोठ्या प्रमाणात विध्वंस घडवून आणतात. हे ड्रोन यापूर्वी नागोर्नो-काराबाख संघर्ष आणि यूक्रेन-रशिया युद्धात वापरण्यात आले होते. याचा प्रचंड गंभीर परिणाम हल्ला केलेल्या भागात झाला होता. आता पुन्हा एकदा चीन या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या आधुनिक ड्रोनमुळे युद्धाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलू शकतो.
भारतासाठी मोठे आवाहन
चीनच्या या पावलामुळे त्याचे तैवानवरील वाढत्या हालचाली आणि मोठ्या युद्धाच्या तयारीचा अंदाज वर्तवला जात आहे. तैवानवरील नियंत्रण मिळवण्याच्या चीनच्या योजनांमध्ये हे ड्रोन महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. भारतासाठी ही परिस्थिती अधिक चिंतेची आहे. चीनचे हे किलर ड्रोन भारताच्या संरक्षणासाठी मोठे आव्हान ठरू शकतात.
भारताने नागास्त्र या स्वदेशी आत्मघाती ड्रोनचा विकास केला आहे, पण तरीही हे तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमतेच्या बाबतीत भारत अजूनही चीनच्या खूप मागे आहे. चीन सध्या जासूसी, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि अचूक हल्ल्यांसाठी ड्रोनच्या प्रगत तंत्रज्ञानावर भर देत आहे, तर भारत या क्षेत्रात अधिक संशोधन आणि विकासाची गरज भासत आहे.
कामिकाझी ड्रोनचे वैशिष्ट्ये
हे कामीकाझी ड्रोन प्रचंड प्रभावी हत्यार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. हे ड्रोन मिसाइल्सच्या तुलनेत कमी खर्चिक असून लक्ष्यावर थेट हल्ला करु शकते. हे ड्रोन मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यास सक्षम आहेत. चीनने दिलेली ही प्रचंड ऑर्डर अधिकृत जाहीर केले नसले तरी जागतिक विश्लेषकांच्या मते, चीनचे उद्दिष्ट तैवानसारख्या प्रदेशांवर नियंत्रण मिळवणे आणि युद्धासाठी तयारी करणे हे आहे. मात्र चीनने एवढी मोठी ऑर्डर का दिली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
चीनच्या या पावलाची जगभरात चर्चा सुरु
चीनच्या या पावलामुळे इतर अनेक देशांमध्येही ड्रोन क्षेत्रात प्रगती करण्याची स्पर्धा निर्माण होऊ शकते. विशेषतः भारताने संरक्षण क्षमतेला बळकट करण्यासाठी आत्मघाती ड्रोन तसेच प्रगत तंत्रज्ञानाच्या विकासावर अधिक भर द्यायला हवा. चीनच्या या महत्त्वाकांक्षी पावलांमुळे जागतिक सुरक्षा आणि सामरिक संतुलनावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे.