Coup threat in Turkey Thousands protest as Erdogan faces crisis
इस्तंबूल : तुर्कीमध्ये सध्या मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांच्याविरोधात हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरत संतप्त निदर्शने सुरू केली आहेत. देशातील परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की तुर्की प्रशासनाने पुढील चार दिवस कोणत्याही प्रकारच्या निदर्शनांवर बंदी घातली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांपासून अध्यक्ष एर्दोगन यांनी मुस्लिम जगतात आपली शक्ती सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता त्यांच्या स्वतःच्या देशातच त्यांची सत्ता कमकुवत होत असल्याचे चित्र दिसत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जग अंतराळ युद्धासाठी तयार आहे का? 5 चिनी उपग्रहांची आकाशात झुंज
गेल्या काही दिवसांत तुर्कीच्या इस्तंबूल शहरात मोठ्या प्रमाणावर आंदोलनं होत आहेत. या निषेधांमध्ये विरोधी पक्षांचे समर्थक, सर्वसामान्य नागरिक, पत्रकार आणि उद्योजक देखील सामील झाले आहेत. तुर्की प्रशासनाने 100 हून अधिक जणांना अटक केली असून, लोकशाही समर्थक आंदोलनांना दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सरकारवर केला जात आहे.
तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन हे गेल्या काही वर्षांपासून जागतिक राजकारणात प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. मग तो सीरियामधील संघर्ष असो किंवा गाझा पट्टीतील संघर्ष, ते अनेकदा सौदी अरेबिया आणि इराणला थेट आव्हान देत होते. पण आता त्यांची सत्ता स्वतःच्या देशातच संकटात सापडली आहे.
Bu Millet Büyüktür! pic.twitter.com/Pgxkty4uLK
— Ekrem İmamoğlu (@ekrem_imamoglu) March 19, 2025
credit : social media
तुर्कीमध्ये सुरु असलेल्या असंतोषाची ठिणगी इस्तंबूलचे महापौर आणि विरोधी पक्षाचे प्रमुख नेते एकरेम इमामोग्लू यांच्या अटकेनंतर पेटली. इमामोग्लू हे सेक्युलर रिपब्लिकन पार्टी (CHP) चे नेते आणि एर्दोगन यांचे मुख्य प्रतिस्पर्धी मानले जातात.
सरकारने त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि दहशतवाद्यांना मदत केल्याचे आरोप लावले आहेत. अधिकृतरित्या त्यांना गुन्हेगारी संघटनेचा संशयित नेता म्हणून संबोधण्यात आले आहे. परंतु, अनेक तज्ज्ञ आणि नागरिक याला राजकीय कट मानत आहेत आणि एर्दोगन हे आपल्या विरोधकांना दडपण्यासाठी अशी कारवाई करत असल्याचा आरोप करत आहेत.
इमामोग्लू यांच्या अटकेनंतर संपूर्ण इस्तंबूलमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरू झाली. लोकांचा वाढता रोष पाहून इस्तंबूलच्या गव्हर्नर ऑफिसने चार दिवसांसाठी सर्व प्रकारच्या निदर्शनांवर बंदी लागू केली. तरीही, हजारो आंदोलक हे इस्तंबूल पोलिस मुख्यालय, सिटी हॉल आणि CHP पक्षाच्या कार्यालयासमोर जमले आणि एर्दोगन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी इमामोग्लू यांच्यावर लावण्यात आलेले आरोप निराधार आणि बेकायदेशीर असल्याचा दावा केला.
इमामोग्लू यांनीही ट्विटरवरून एक संदेश देत सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी लिहिले – “लोकांची इच्छा दडपता येणार नाही.”
या संपूर्ण परिस्थितीवर राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, तुर्कीमध्ये लोकशाहीची गळचेपी सुरू आहे. गेल्या काही वर्षांत एर्दोगन यांनी आपल्या विरोधकांवर सातत्याने कारवाई केली आहे, पण आता जनतेचा रोष वाढत चालला आहे. इस्तंबूल आणि इतर प्रमुख शहरांमध्ये सुरू असलेले निदर्शने पाहता, तुर्कीमध्ये मोठे राजकीय बदल घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्ध की रणनीती? युक्रेनने युद्धासाठी मांडला आहे बुद्धिबळाचा डाव
तुर्कीमध्ये निर्माण झालेली अस्थिरता एर्दोगन यांच्या सत्तेसाठी एक मोठे आव्हान ठरत आहे. विरोधक आणि नागरिकांच्या वाढत्या रोषामुळे तुर्कीमध्ये सत्तापालट होऊ शकतो का? हा प्रश्न आता सर्वांना सतावत आहे. युरोप आणि मुस्लिम देशांमध्येही या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. तुर्कीमध्ये लोकशाही टिकवण्यासाठी जनतेचा लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे आणि येत्या काही दिवसांत परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.