कोण आहेत स्टीफन मिलर? ट्रम्पने सोपवली इमिग्रेशन धोरणांची जबाबदारी, भारताची चिंता वाढली
वॉश्गिंटन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. आता अमेरिकेचे नवचर्चित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आपल्या प्रशासनासाठी नवीन टीम बांधण्यात व्यस्त आहे. आता ट्रम्प यांनी आपल्या नवीन प्रशासनात इमिग्रेशन धोरणाचे उपप्रमुख म्हणून स्टीफन मिलर यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे भारतीय समुदायांमध्ये चिंता वाढली आहे. मिलर हे ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणांचे मुख्य सल्लागार मानले जातात.
कोण आहेत स्टीफन मिलर?
स्टीफन यांच्या आक्रमक दृष्टीकोनामुळे भारतीयांसह इतर देशाच्या समुदायांवर संभाव्य परिणाम होऊ शकतो. स्टीफन मिलर हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी इमिग्रेशन धोरणावर कडक उपाययोजना राबवण्यास समर्थन दिले होते. ट्रम्प यांच्या ‘अमेरिकन फर्स्ट’ धोरणांतर्गत मिलर यांनी अवैध स्थलांतर रोखण्यासाठी आणि कायदेशीर इमिग्रेशनवरही मर्यादा आणण्यासाठी धोरणात्मक बदल घडवले.
स्टीफन यांच्या नियुक्तीमुळे अमेरिकेत शिक्षण घेमाऱ्यांच्या चिंतेत वाढ
अमेरिकन फर्स्ट धोरणांतर्गत भारतीय तंत्रज्ञान व्यावसायिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या एच-1बी व्हिसासारख्या कार्यक्रमांवर स्टीफन यांनी कडक निर्बंध लादले होते. यामुळे भारतीय नागरिकांना अमेरिकेत स्थायिक होणे अत्यंत कठीण झाले. त्यांच्या नियुक्तीमुळे अमेरिकेत उच्च शिक्षण घेणारे किंवा काम करत असलेले भारतीय देखील चिंतेत आहेत, कारण भविष्यात त्यांच्या व्हिसा नूतनीकरण, ग्रीन कार्ड मिळवणे यासारख्या प्रक्रियेत आव्हाने येऊ शकतात.
मिलरच्या आक्रमक सीमा अंमलबजावणीच्या धोरणांमुळे बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासोबतच कायदेशीर इमिग्रेशनवरही नियंत्रण आणण्याचे संकेत मिळाले आहेत. ट्रम्प प्रशासनाने मिलरच्या नेतृत्वाखाली सीमा सुरक्षा आणि हद्दपारीवर कठोर नियमावलीची अंमलबजावणी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यामुळे भारतीयांनी व्हिसासह अमेरिकेत राहण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदोपत्री प्रक्रियेत कठोर बदल अपेक्षित आहेत.
इतर महत्त्वाच्या नियुक्त्या
दुसरीकडे, ट्रम्प यांनी माईक वॉल्ट्झ यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) म्हणून नियुक्ती केली आहे. वॉल्ट्झची नियुक्ती भारतासाठी सकारात्मक ठरू शकते कारण ते भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत करण्याचे समर्थक आहेत. दुसरीकडे टॉम होमन यांना “बॉर्डर झार” म्हणून नियुक्त केले आहे. होमन यांच्यावर बेकायदेशीर परदेशी नागरिकांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्याची जबाबदारी असणार आहे. ही जबाबदारी ट्रम्प यांच्या अजेंड्याचा महत्त्वाचा भाग असल्याचे म्हटले जात आहे.
मात्र, स्टीफन मिलर यांच्यासारख्या नेत्याला इमिग्रेशनच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी दिल्यामुळे भारतीय समुदायासमोर नवे आव्हान उभे राहिले आहेत. स्टीफन मिलर यांची नेमणूक भारतीयांसाठी चिंता निर्माण करणारी आहे, कारण त्यांच्यामुळे ट्रम्प प्रशासन इमिग्रेशन धोरणांवर अधिक कडक नियम आणण्याची शक्यता आहे. याचा भारतीय समुदायावर थेट परिणाम होऊ शकतो.