
फोटो सौजन्य - Social Media
अमेरिकेने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रियेत महत्त्वपूर्ण आणि कठोर बदल लागू केले असून, याचा थेट परिणाम विद्यार्थी, व्यावसायिक आणि प्रवाशांवर होणार आहे. नव्या नियमांनुसार भारतीय अर्जदारांना आता तिसऱ्या देशांमधून अमेरिकन व्हिसासाठी मुलाखत देता येणार नाही. स्टुडंट व्हिसा (एफ-१), व्हिजिटर व्हिसा (बी-१/बी-२) तसेच वर्क व्हिसा (एच-१बीसह) यासाठीची सर्व व्हिसा मुलाखत फक्त भारतातच घ्यावी लागणार आहे. आतापर्यंत अनेक भारतीय अर्जदार व्हिसा मुलाखतीसाठी दुबई, सिंगापूर, थायलंड, मलेशिया यांसारख्या देशांचा पर्याय निवडत होते. भारतात अपॉइंटमेंट मिळण्यास विलंब होत असल्याने तिसऱ्या देशांमधील दूतावासांमधून व्हिसा प्रक्रिया पूर्ण करण्याचा मार्ग मोठ्या प्रमाणावर वापरला जात होता. मात्र, अमेरिकेच्या नव्या निर्णयामुळे हा पर्याय पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
तज्ज्ञांच्या मते, व्हिसा प्रक्रिया अधिक केंद्रीकृत आणि कठोर करण्याचा हा प्रयत्न आहे. अर्जदारांची पार्श्वभूमी तपासणी अधिक प्रभावी करणे, नियमांचा गैरवापर रोखणे आणि व्हिसा प्रणालीतील त्रुटी कमी करणे, हे या बदलामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः स्टुडंट आणि वर्क व्हिसाच्या बाबतीत होणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यावर अमेरिकेचा भर आहे. या निर्णयामुळे भारतातील अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावासांवर अपॉइंटमेंटचा ताण वाढण्याची शक्यता आहे. आधीच अनेक शहरांमध्ये व्हिसा मुलाखतीसाठी दीर्घ प्रतीक्षा कालावधी आहे. नव्या नियमांनंतर ही प्रतीक्षा आणखी वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक योजनांवर तसेच व्यावसायिकांच्या नोकरीत रुजू होण्याच्या तारखांवर होऊ शकतो.
विशेषतः अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम चिंतेचा विषय ठरू शकतो. वेळेत व्हिसा न मिळाल्यास अभ्यासक्रम सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. तसेच एच-१बी किंवा अन्य वर्क व्हिसावर जाणाऱ्या व्यावसायिकांना नोकरीत सामील होण्याच्या तारखा पुढे ढकलाव्या लागू शकतात. सध्या या नियमांबाबत कोणतीही अधिकृत सूट किंवा अपवाद जाहीर करण्यात आलेले नाहीत. भारतातील अपॉइंटमेंट क्षमता वाढवली जात नाही, तोपर्यंत भारतीय अर्जदारांसाठी ही प्रक्रिया आव्हानात्मक राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अमेरिकेला जाण्याची योजना आखणाऱ्या भारतीय नागरिकांनी व्हिसा स्लॉट लवकरात लवकर बुक करावेत, सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेत तयार ठेवावीत आणि प्रवास, शिक्षण किंवा नोकरीचे वेळापत्रक आखताना संभाव्य विलंब लक्षात घ्यावा, असा सल्ला देण्यात येत आहे. एकूणच, अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतीय नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया अधिक कठीण आणि वेळखाऊ ठरण्याची शक्यता असून, विशेषतः विद्यार्थी आणि आयटी व्यावसायिकांमध्ये याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.