Donald Trump cut off funding to South Africa over land confiscations
वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ हाताच घेतलेल्या निर्णयांनी जागतिक स्तरावर खळबळ माजवली आहे. ट्रम्प यांनी परदेशी देशांना अमेरिकेकडून मिळणारी मदत बंद केल्याने अनेक देश आर्थिक संकटात सापडले आहेत. आता दक्षिण आफ्रिकेचे नावही या यादीत सामील झाले आहे. ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेला मिळणारी सर्व भविष्यातील आर्थिक मदत थांबवण्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेवर नागरिकांच्या जमिनींवर जबरदस्तीन कब्जा केल्याचा आरोप केला आहे.
ट्रम्प यांचा आरोप
ट्रम्प यांनी आरोप केला आहे की दक्षिण आफ्रिकेचे सरकार लोकांची जमीन जबरदस्तीने ताब्यात घेत असून काही वर्गांशी अत्यंत वाईट वर्तन करत आहे. त्यांनी म्हटले आहे की, “दक्षिण आफ्रिका नागरिकांच्या जमीन जप्त करत आहे आणि काही वर्गांशी अत्यंत वाईट वर्तन करत आहे. अमेरिका हे सहन करणार नाही, आम्ही कारवाई करू. तसेच, या परिस्थितीची पूर्ण चौकशी करण्यात येईल आणि तोपर्यंत मी दक्षिण आफ्रिकेला मिळणारी सर्व भविष्यातील आर्थिक मदत थांबवणार आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘या’ मुस्लिम राष्ट्रप्रमुखांच्या हिंदूंना वसंत पंचमीच्या शुभेच्छा
आफ्रिकेचे नवीन विधेयक
अलीकडेच दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी एक अधिग्रहण विधेयक कायद्यात आणले, यामध्ये सरकारला सार्वजनिक हितासाठी कोणत्याही नुकसान भरपाईशिवाय लोकांची जमीन ताब्यात घेण्याची परवानगी असल्याचे म्हटले आहे. या विधेयकाचा उद्देश आहे की 2030 पर्यंत काळ्या दक्षिण आफ्रिकन लोकांना एक तृतीयांश जमीन हस्तांतरित करणे आहे.
मात्र, ट्रम्प यांच्या आर्थिक मदत थांबवण्याच्या घोषणेनंतर दक्षिण आफ्रिकन रँडच्या मूल्यामध्ये 1.6% घसरण झाली आहे. अमेरिकेने 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेला सुमारे $440 दशलक्ष (सुमारे 3.82 हजार कोटी रुपये) आर्थिक मदत देऊ केली होती.
इलॉन मस्क यांचीही प्रतिक्रिया
ट्रम्प यांचे सहयोगी आणि दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले उद्योगपती इलॉन मस्क यांनीही या धोरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, रामाफोसा यांच्या या धोरणामुळे 1980 च्या दशकातील झिम्बाब्वेमधील जमीन जप्तीप्रमाणेच परिणाम होऊ शकतात, यामुळे झिम्बाब्वेची आर्थिक स्थिती खालावली होती.
काय म्हणाला दक्षिण आफ्रिका?
परंतु, दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने या आरोपांना नाकारले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जमीन अधिग्रहण प्रक्रिया मनमानी पद्धतीने न करता, जमीनमालकांशी चर्चा करूनच करण्यात येणार आहे. भूमी सुधारणा आणि वर्णभेद हे दक्षिण आफ्रिकेत दीर्घकाळापासून विवादित मुद्दे आहेत.मात्र, अध्यक्ष रामाफोसा यांनी अमेरिकेसोबत कोणत्याही तणावाच्या शक्यतेला नाकारले आहे. ट्रम्प यांनी अलीकडेच USAID द्वारे दिली जाणारी परदेशी मदतही थांबवली आहे, यामुळे आफ्रिकेतील अनेक आरोग्य, शिक्षण आणि विकास कार्यक्रमांवर परिणाम झाला आहे.