'अमेरिकेच्या हितसंबंधांना धोका...'; उत्तर कोरिया ट्रम्प प्रशासनावर भडकला, नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
प्योंगयांग: उत्तर कोरियाला अमेरिकेचा मोठा शत्रू मानले जाते. रशिया-युक्रेनयुद्धामुळे हे शत्रुत्व अधिक वाढले होते. उत्तर कोरियाने या युद्धात रशियाला आपला पाठिंवा उघडपणे दर्शवला होता. मात्र, अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली. ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधला.मात्र आता पुन्हा एकदा हे संबंध बिघडण्याच्या मार्गावर आहेत.
उत्तर कोरियाने अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर तीव्र टीका केली आहे. उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (3 फेब्रुवारी) अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या वक्तव्याचा निषेध केला. रुबियो यांनी उत्तर कोरियाला “दुष्ट राज्य” म्हणून संबोधले होते. यामुळे प्योंगयांगने तीव्र प्रतिक्रिया दिली आणि अमेरिकेला इशारा दिला की अशा गंभीर आणि चूकीच्या वक्तव्यांमुळे त्यांचे हित साधले जाणार नाहीत.
उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्रालय
उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचे हे विरोधी शब्द आणि कृती दर्शवून देतात की, अमेरिकेची डीपीआरके (डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया) बाबतची धोरणे पूर्वीप्रमाणेच आहेत आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही.”
उत्तर कोरियाने हेही स्पष्ट केले की, मार्को यांचे वक्तव्य गंभीर आणि हास्यास्पद आहे. हे अमेरिकेच्या नव्या प्रशासनाच्या उत्तर कोरियाकडे पाहण्याच्या चुकीच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. उत्तर कोरियाने अमेरिकेला सावध करताना म्हटले की, “अशा वक्तव्यांमुळे अमेरिकेच्या हितसंबंधांना धोका निर्माण होऊ शकतो.”
मार्को रुबियो यांच्या वक्तव्यावरून वाद
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एका मुलाखतीत उत्तर कोरिया आणि इराणला “दुष्ट राज्य” म्हटले होते. त्यांनी अमेरिकेसमोरील परराष्ट्र धोरणाच्या प्रमुख आव्हानांबद्दल चर्चा करताना उत्तर कोरियाला आंतरराष्ट्रीय शांततेसाठी धोकादायक देश संबोधले होते. यामुळे उत्तर कोरियाने या टीकेचा कडाडून विरोध केला आणि अमेरिकेच्या प्रशासनाची मानसिकता अद्याप बदललेली नाही, असे म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प उत्तर कोरियाशी पुन्हा संबंध प्रस्थापित करू इच्छितात
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उत्तर कोरियाशी पुन्हा चर्चेचा प्रयत्न करत आहेत. आपल्या पहिल्या कार्यकाळात देखील त्यांनी उत्तर कोरियासोबत अनेक बैठकांचे आयोजन केले होते आणि दोन्ही देशांमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. 23 जानेवारी रोजी एका मुलाखतीत ट्रम्प यांनी किम जोंग उन यांना “धार्मिक कट्टरतावादी नसून एक हुशार व्यक्ती” असे म्हटले होते. मात्र, उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. आगामी काळात या वादाला कोणती दिशा मिळेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.