Trump pauses military aid to ukraine
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यातील तीव्र वादानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी युक्रेनला मोठा धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी यूक्रेनला मिळणारी लष्करी मदत थांबवण्याचे आदेश जारी केले आहेत. शुक्रवारी ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या ट्रम्प-झेलेन्स्की वादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ही लष्करी मदत तात्पुरती थांबवण्यात आली आहे.
व्हाईट हाउसच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही मदत तात्पुरती थांबवण्यात आली असून याचा आढावा घेतला जात आहे. या निर्णयाची मदत शांतता करार पूर्ण करण्यास होईल अशी खात्री राष्ट्राध्यक्षांना आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. तसेच आमचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या ध्येयासाठी आणि आपल्या भागीदारीसाठी वचनबद्ध आहेत, त्यांचे लक्ष्य युक्रेन-रशियामध्ये शांतता कररा करण्यावरही आहे. आणखी एका अधिकाऱ्याने, फक्त लष्करी उपकरणांची मदत बंद केली असून युक्रेन अजूनही अमेरिकेकडून मिळालेली शस्त्रे वापरु शकतो असे म्हटले आहे.
झेलेन्स्की यांच्यावर आरोप
डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष डेडी वॅन्स यांनी झेलेन्स्की यांच्या अमेरिकेच्या समर्थनाबद्दल पुरेशी कृतज्ञता न दाखवल्याचा आरोप केला आहे. याच दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची माफी मागण्याचा सल्ला दिला आहे.
युक्रेनवर दबाव आणणे
युक्रेनला मिळणारी लष्करी मदत थांबवणे, ट्रम्प यांच्या रणनितीचा एक भाग असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या मते अमेरिकेच्या मदतीशिवाय युक्रेनला रशियाविरुद्ध विजय मिळवणे कठीण आहे. तसेच यामुळे झेलेन्स्की पुन्हा वाटाघाटी करण्यास तयार होतील. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे युक्रेनच्या संरक्षण क्षणतेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी आधीच सुरक्षित केले आहे की, सध्या युक्रेनकडे असलेल्या शस्त्र पुरवठ्याद्वारे फक्त काही काळाच रशियाविरुद्ध लढा देऊ शकतात.
यूक्रेनला युरोपिन देशांचा पाठिंबा
याच पार्श्वभूमीवर यूरोपियन नेत्यांनी युक्रेनला समर्थन दिले असून ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली लंडनमध्ये झालेल्या शिखर परिषदेत युरोपियन नेत्यांनी यूक्रेनला समर्थनाची हमी दिली आहे. पोलंडचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी यूक्रेनला पोलंडचा संपूर्ण आणि अटूट पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी “पोलंड कोणत्याही अटींशिवाय युक्रेनच्या बाजूने उभा राहिल असेही म्हटले.