Donald Trump moves to end birthright citizenship
वॉशिंग्टन: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाभार स्वीकारताच अनेक कार्यकारी आदेशांवर कारवाई सुरु केली. अमेरिकेला जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यात्वातून बाहेर काढण्यापासून ते टिटटॉक बंदीवरील मुदत 75 दिवसांपर्यंत वाढवण्यापर्यंत निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या या प्रमुख निर्णयापैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे परदेशी नागरिकांना जन्मत: मिळाणारे नागरिकत्व ट्रम्प यांनी रद्द केले आहे. त्यांच्या या निर्णयाचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होणार आहे.
नागरिकत्व मिळवण्यासाठी नवीन अटी
यापूर्वी देखील ट्रम्प यांनी निवडणुकीच्या विजयानंतर डिसेंबरमध्ये जन्मसिद्ध नागरिकत्वाचा निर्णय घेतला होता. नवीन आदेशानुसार, आता अमेरिकेत जन्मलेल्या मुलाला नागरिकत्व मिळवण्यासाठी किमान एक पालक अमेरिकेचा नागरिक, कायमचा रहिवासी ( ग्रीन कार्ड धारक) किंवा अमेरिकन सैन्यसेवेत असणे गरजेचे आहे. या निर्णायाचा उद्देश बेकायदेशीर स्थलांतर थांबवणे असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
जन्मसिद्ध नागरिकत्व म्हणजे काय?
1868 मध्ये लागू करण्यात आलेल्या 14व्या घटनादुरुस्तीमुळे अमेरिकेत जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीस नागरिकत्वाचा अधिकार देण्यात आला. 150 वर्षाहून अधिका काळापासून हा अधिकार अमेरिकेच्या संविधानाच्या 14 व्या दूरुस्तीने मान्य करण्यात आला होता. परंतु, ट्रम्प यांच्या नवीन आदेशानुसार, जर आई बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहात असेल किंवा वडील नागरिक नसतील तर अशा मुलांना नागरिकत्व नाकारले जाईल. मात्र, ट्रम्प यांच्या बदलामुळे भारतीय आणि इतर परदेशी नागरिकांवर मोठा परिणा होण्याची शक्यता आहे.
लाखो भारतीयांना फटका
अमेरिकेत भारतीय समुदाय वेगाने वाढत असून 2024 मध्ये त्यांची संख्या 5.4 दशलक्षांपेक्षा जास्त आहे. बहुतेक भारतीय स्थलांतरित आहेत आणि काहींची मुले अमेरिकेत जन्मलेली आहेत. परंतु ट्रम्प यांच्या आदेशाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
काय होणार परिणाम?
या आदेशांनुसार, भारतीय पालकांच्या मुलांना नागरिकत्व सहज मिळणे आता सोपे राहणार नाही. यासाठी त्यांच्याकडे अमेरिकेचे ग्रीन कार्ड असले पाहिजे मात्र, यासाठी अनेक अडथळे निर्माण होऊ शकतील. तसेच अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना त्यांच्या पालकांना 21 व्या वर्षी अमेरिकेत आणण्याचा अधिकार मिळणार नाही. याशिवाय विद्यार्थी व्हिसावर आलेल्या भारतीय कुटुंबांवरही मोठा परिणाम होणार. तात्पुरत्या व्हिसावर राहणाऱ्या कुटुंबांसाठी कायदेशीर समस्या वाढतील.
ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीय स्थलांतरितांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. अमेरिकेत जन्मलेल्या मुलांच्या भविष्याबाबत अनिश्चितता वाढणार असून कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी कायदेशीर संघर्ष करावा लागणार आहे. या निर्णयावर अनेक कायदेशीर आव्हाने उभे राहतील, कारण हे अमेरिकन संविधानाशी संबंधित आहे. बर्थ राइट सिटीझनशिप संपवण्याचा ट्रम्प यांचा निर्णय केवळ स्थलांतरितांवरच नाही तर अमेरिकेतील संपूर्ण प्रशासन व्यवस्थेवर मोठा परिणाम करू शकतो. भारतीय समुदायासाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.