dragons arms support ukraine conflict putin jinping kim alliance
Putin Xi Kim alliance : चीनची राजधानी बीजिंग बुधवारी इतिहास आणि शक्तीच्या अनोख्या संगमाचे साक्षीदार ठरली. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवाला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चीनने भव्य विजय दिन परेड आयोजित केली होती. या परेडमध्ये चीनच्या सैनिकी ताकदीचे दिमाखदार प्रदर्शन झाले आणि जगभरातील नेत्यांचे लक्ष बीजिंगकडे वळले. विशेष म्हणजे या परेडमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन हे एकाच व्यासपीठावर दिसले. ही घटना पहिल्यांदाच घडली असून, आंतरराष्ट्रीय राजकारणात ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
तियानमेन चौकात झालेल्या या भव्य परेडला शी जिनपिंग यांनी सलामी दिली. आपल्या भाषणात त्यांनी ठामपणे सांगितले की, चीन कोणत्याही धोक्याला भीक घालत नाही, नेहमीच पुढे जातो आणि आपल्या सैनिकांचा आदर करतो. त्यांचा हा संदेश जगभरात चर्चेचा विषय ठरला. यावेळी चीनने आपल्या क्षेपणास्त्र, टँक, लढाऊ विमाने आणि आधुनिक युद्धसामग्रीचे भव्य प्रदर्शन करून आपली लष्करी क्षमता जगाला दाखवली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनच्या लष्करी परेडला अनुपस्थित राहण्यामागे PM मोदींची राजकीय खेळी; भारताच्या परराष्ट्र धोरणात लपला होता ‘हा’ मोठा संदेश
परेडनंतर पुतिन आणि किम जोंग-उन यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. किम यांनी जाहीर केले की रशियाला मदत करणे हे त्यांचे “बंधुत्वाचे कर्तव्य” आहे. रशियाने इतिहासात उत्तर कोरियाच्या शौर्याला विसरले नाही, हे पुतिन यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या महायुद्धात उत्तर कोरियाच्या विशेष सैन्याने कुर्स्क प्रदेशाच्या मुक्ततेसाठी पराक्रमी लढा दिला होता. या बैठकीमुळे रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध औपचारिक युतीकडे वळत आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या संपूर्ण घडामोडींमध्ये चीनने उघडपणे सांगितले की तो रशियाला शस्त्रास्त्रे पुरवत राहील. पाश्चिमात्य निर्बंधांमुळे रशियाला सैनिकी आणि औद्योगिक साहित्य मिळवण्यात अडचणी येत असल्या तरी चीनने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे चीन रशियाला “दुहेरी वापराची शस्त्रे” पुरवेल. ही अशी साधने आहेत जी नागरी आणि लष्करी अशा दोन्ही क्षेत्रांत वापरली जाऊ शकतात. यामुळे रशियाच्या लष्करी मोहिमांना मोठा हातभार लागणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, या तिन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याने आणि चीनच्या पाठिंब्याने पुतिन यांचा आत्मविश्वास वाढला आहे. अमेरिका आणि युरोपीय देशांनी केलेल्या निर्बंधांना पुतिन आता भीक घालतील असे दिसत नाही. उलट, बीजिंगहून परतल्यानंतर ते युक्रेनविरुद्ध अधिक आक्रमक भूमिका घेतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आत्तापर्यंतचे युद्ध प्रामुख्याने युक्रेनच्या सीमांमध्ये मर्यादित होते. पण चीनकडून शस्त्रास्त्रांचा अखंड पुरवठा मिळाल्यास रशिया पुढे मोठे आणि तीव्र आक्रमण करू शकतो, अशी भीती जागतिक स्तरावर व्यक्त केली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Maduro Bounty : व्हेनेझुएलावर अमेरिकेचा दबाव हा फक्त ड्रग्जमुळेच की यामागे आहे काही छुपा अजेंडा? वाचा सविस्तर…
बीजिंगच्या विजय दिन परेडने फक्त चीनच्या सामर्थ्याचे प्रदर्शन घडवले नाही, तर जागतिक राजकारणातील नवे समीकरणही दाखवून दिले. पुतिन-जिनपिंग-किम या त्रिकोणामुळे जगातील तणाव वाढणार हे स्पष्ट झाले आहे. चीनकडून रशियाला मिळणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या पाठिंब्यामुळे युक्रेन युद्ध आणखी भीषण होईल का, हा प्रश्न आता सर्वांसमोर उभा राहिला आहे.