व्हेनेझुएलावर अमेरिकेचा दबाव हा फक्त ड्रग्जमुळेच की यामागे काही छुपा अजेंडा? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Justice ForAmerica : लॅटिन अमेरिकेतील राजकारण नेहमीच जगाचे लक्ष वेधून घेते. विशेषतः अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील संघर्ष हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. मागील काही वर्षांत या संघर्षाने नवा रंग घेतला आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर थेट ड्रग्ज कार्टेल चालवण्याचे आरोप केले असून त्यांच्या अटकेसाठी तब्बल ५० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. याचवेळी, कॅरिबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौका व हजारो सैनिक तैनात करून अमेरिकेने तणाव अधिकच वाढवला आहे.
अमेरिकेचे म्हणणे आहे की व्हेनेझुएलामधून दरवर्षी २५० टनांहून अधिक कोकेन बाहेर नेले जाते. हे प्रमाण जागतिक उत्पादनाच्या तुलनेत कमी असले तरी पूर्णपणे दुर्लक्षित करण्याजोगे नाही. परंतु येथे प्रश्न असा आहे की जर खरा धोका इतका गंभीर असेल, तर मग कोलंबिया, पेरू किंवा बोलिव्हिया यांसारख्या थेट कोका लागवडीचे आणि कोकेन उत्पादनाचे केंद्र असलेल्या देशांवर अमेरिकेचा असा दबाव का नाही? संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, जगातील दोन तृतीयांश कोकेन उत्पादन कोलंबियातून होते. पेरू आणि बोलिव्हिया देखील मोठे उत्पादक आहेत. याउलट, व्हेनेझुएला ना मोठा उत्पादक आहे ना प्रमुख वाहतूक केंद्र. तरीसुद्धा अमेरिकेच्या लष्करी मोहिमांचे केंद्रबिंदू व्हेनेझुएला ठरतो. सीएनएनच्या आकडेवारीनुसार, ड्रग्ज जप्तीमध्येही व्हेनेझुएलाचा वाटा नगण्य आहे एकूण जप्तीच्या २ टक्क्यांपेक्षा कमी. यामुळे अमेरिकेचे आरोप किती ठोस आहेत, यावर प्रश्नचिन्ह उभे राहते.
राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अनेकदा जाहीर केले आहे की त्यांचे सरकार ड्रग्जविरोधी मोहिमा राबवत आहे. अलिकडच्या काही वर्षांत तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या शेकडो बोटी आणि विमान जप्त करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर या दाव्यांची स्वतंत्र पुष्टी मिळालेली नाही. तथापि, एक महत्त्वाची बाब म्हणजे मादुरो यांच्या कुटुंबाशी संबंधित काही व्यक्तींना अमेरिकन न्यायालयांनी ड्रग्ज तस्करीच्या आरोपांत दोषी ठरवले आहे. यावरून हे स्पष्ट होते की देशाच्या उच्च स्तरावर भ्रष्टाचार आणि संगनमताला जागा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनच्या लष्करी परेडला अनुपस्थित राहण्यामागे PM मोदींची राजकीय खेळी; भारताच्या परराष्ट्र धोरणात लपला होता ‘हा’ मोठा संदेश
आता मोठा प्रश्न असा आहे की जर व्हेनेझुएला जागतिक ड्रग्ज व्यापारातील मुख्य खेळाडू नाही, तर मग अमेरिकेने एवढ्या प्रमाणात लष्करी दबाव का आणला आहे? अनेक तज्ज्ञांचे मत आहे की यामागील खरी भूमिका म्हणजे निकोलस मादुरो सरकारला उलथवून टाकणे. स्वतः मादुरो यांनी थेट आरोप केला आहे की अमेरिका सत्ता बदल घडवून आणण्याच्या कटात गुंतलेली आहे. ही बाब पूर्णपणे नाकारता येत नाही कारण विसाव्या शतकात अमेरिकेवर अशा अनेक आरोप झाले आहेत. वॉशिंग्टनने चिली, ब्राझील, ग्वाटेमाला, ग्रेनेडा यांसारख्या देशांमध्ये सरकार उलथवण्यासाठी गुप्त व उघड लष्करी कारवाया केल्या होत्या.
व्हेनेझुएला हे जगातील सर्वाधिक तेलसंपन्न देशांपैकी एक आहे. अमेरिकेच्या नजरेत हा मुद्दा कमी महत्त्वाचा आहे का? हा प्रश्न नेहमीच चर्चेत येतो. अनेक तज्ज्ञ मानतात की ड्रग्जचा मुद्दा हा केवळ एक आवरण आहे. प्रत्यक्षात उद्दिष्ट आहे ते तेलसंपत्तीवर नियंत्रण आणि अमेरिकेच्या राजकीय अजेंड्यानुसार नवीन सरकार स्थापन करणे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 2300 वर्षे जुन्या गूढ कबरींसोबत समोर आला इतिहासाचा थरारक अध्याय; पेरूमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांची रोमांचकारी शोधमोहीम
ड्रग्ज तस्करी ही जागतिक पातळीवरील गंभीर समस्या आहे आणि त्यात व्हेनेझुएलाचा थोडाफार सहभाग असल्याचे नाकारता येत नाही. मात्र उपलब्ध आकडेवारीतून हे स्पष्ट होते की तो सहभाग प्रमुख नाही. अशा परिस्थितीत अमेरिकेचा सातत्याने वाढणारा दबाव हा फक्त ड्रग्जपुरता मर्यादित आहे की यामागे सत्ता उलथवण्याचा मोठा राजकीय अजेंडा दडला आहे? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.