Elon Musk says Trump decided to Shut Down USAID
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच एकामागून एक असे निर्णय घेतले आहे, ज्यामुळे संपूर्ण जग हादरुन गेले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी येत्या चार वर्षात अमेरिकेची भूमिका काय असेल याचा छोटासा ट्रेलर जगाला दाखवून दिली आहे. आता ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट संस्था (USAID) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे USAID ला मोठा धक्का बसला आहे.
सोमवरी (3 फेब्रुवारी) टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी यासंदर्भात ट्रम्प यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली. USAID ही संस्था 1961 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी स्थापन केली होती. या संस्थेचा मुख्य उद्दिष्ट जागतिक आरोग्य, आर्थिक विकास, आपत्ती व्यवस्थापन आणि लोकशाही सुधारणा यासंबंधी कार्य करणे आहे. ही संस्था सध्या 100 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे आणि अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा भाग राहिली आहे.
USAID चे कार्य आणि महत्त्व
USAID ही अमेरिकन सरकारची स्वतंत्र संस्था आहे. ही संस्था परदेशी नागरी आणि विकास सहाय्याचे नियोजन व अमंलबजावणी करते. जागतिक स्तरावर अनेक मानवीय आणि आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प या संस्थेद्वारे राबवले जातात. विविध देशांना आर्थिक आणि सामाजिक मदत करून ही संस्था त्यांच्या विकासास हातभार लावते. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला बळकट करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी USAID महत्त्वाची भूमिका बजावत आली आहे.
ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय
डोनाल्ड ट्रम्प यांनी परराष्ट्र विभागामार्फत परदेशी वित्तपुरवठ्यावर बंदी घातल्याने USAID ला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे अनेक मानवीय विकास आणि सुरक्षा प्रकल्प बंद झाले आहेत. यामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार झाले आहेत आणि अनेकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. ट्रम्प प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, USAID चे मोठे खर्च अमेरिकेसाठी परवडणारे नाहीत आणि त्यामुळे ही संस्था बंद करणे योग्य ठरेल.
एलॉन मस्कचाही ट्रम्प यांना पाठिंबा
एलॉन मस्क यांनी देखील USAID ला “अयोग्य प्रणाली” म्हणत त्याच्या बंदीला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी म्हटले की, ही संस्था करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग करत आहे आणि जैविक शस्त्रसज्जतेसाठी निधी पुरवत आहे. मस्क यांच्या मते, ही संस्था आता सुधारण्याच्या पलीकडे गेली आहे आणि त्यामुळे तिला बंद करणेच योग्य राहील.
USAID प्रमुखांवर कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, USAID चे दोन वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांनी एलॉन मस्क यांच्या निरीक्षण पथकाला संवेदनशील माहिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर USAID ची अधिकृत वेबसाइटही बंद झाली आहे. USAID च्या बंदीनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर आणि जागतिक मदत प्रकल्पांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘या’ मुस्लिम राष्ट्रप्रमुखांच्या हिंदूंना वसंत पंचमीच्या शुभेच्छा