france citizens march 80000 police secure 300 detained
फ्रान्समध्ये सरकारविरोधी निदर्शने अधिक तीव्र; आतापर्यंत सुमारे ३०० जणांना अटक.
अर्थसंकल्प कपात व राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या राजीनाम्याच्या मागणीला डावे पक्ष आणि कामगार संघटनांचा पाठिंबा.
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी नवे पंतप्रधानपद स्वीकारले.
France Bloquons Tout movement : फ्रान्स सध्या एका मोठ्या राजकीय आणि सामाजिक उथळपुथळीतून जात आहे. अर्थसंकल्पातील मोठ्या कपाती आणि राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या निदर्शनांनी आता व्यापक आणि हिंसक वळण घेतले आहे. ८० हजारांहून अधिक पोलिस दल तैनात असूनही आंदोलकांचा संताप शमलेला नाही. तोडफोड, जाळपोळ, बस जाळण्याच्या घटना आणि पोलिसांशी संघर्ष यामुळे संपूर्ण देशात अस्वस्थतेचे वातावरण आहे.
पॅरिससह देशभरातील प्रमुख शहरांत आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत जवळपास २९५ आंदोलकांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी १७१ जणांना पॅरिसमध्येच अटक झाली. सकाळपासून तब्बल १०६ ठिकाणी रस्ते अडवले गेले, १०५ जाळपोळीच्या घटना घडल्या आणि चार सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. आंदोलकांचा रोष वाढत असल्याचे हे चित्र दाखवते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : नेपाळला आगीच्या भट्टीत रूपांतरित करतानाचा ‘हा’ 51 सेकंदांचा ड्रोन VIDEO पहा; नेत्यांना एकामागून ‘असे’ फेकले नदीत
या निदर्शनांना आता केवळ सामान्य जनता नव्हे, तर राजकीय पाठबळही मिळू लागले आहे. फ्रान्स अनबाउंड या डाव्या पक्षाचे नेते जीन-ल्यूक मेलेंचॉन यांनी ऑगस्ट महिन्यातच आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर इतर डावे पक्ष व ग्रीन पार्टी देखील या चळवळीत सामील झाले. दोन प्रमुख कामगार संघटनांनी आंदोलनात सक्रिय सहभागाची घोषणा केली आहे, तर इतर संघटना १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय संपाची प्रतीक्षा करत आहेत. यावरून आगामी दिवसांत निदर्शनांचा भडका आणखी मोठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फ्रेंच गृहमंत्री ब्रुनो रेशियो यांनी सांगितले की, रेनेस शहरात आंदोलकांनी एका सार्वजनिक बसला आग लावली. एवढेच नाही तर नैऋत्य भागात वीज वाहिनी खराब झाल्यानंतर रेल्वेसेवाही ठप्प झाली. यामुळे सामान्य जनतेचे हाल अधिक वाढले आहेत. आंदोलन केवळ राजकीय नव्हे, तर दैनंदिन जीवन विस्कळीत करणारे ठरत असल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
FRANCE: President Macron just appointed his 5th prime minister in 2 years. In response, the “Block Everything” Movement is calling for a nationwide blockade of roads, halting public services, and mobilizing citizens to stay home. Macron is considering blocking a social media to… pic.twitter.com/J8jVGMeyU9
— @amuse (@amuse) September 10, 2025
credit : social media
या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये महत्त्वाचा राजकीय घडामोडींचा क्रम सुरू आहे. सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी बुधवारी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. ते मॅक्रॉन यांचे जवळचे सहकारी आणि माजी संरक्षणमंत्री आहेत. गेल्या दोन वर्षांत पाचव्यांदा पंतप्रधान बदलले गेले, हे फ्रेंच राजकारणातील अस्थिरतेचे मोठे निदर्शक मानले जात आहे. याआधी फ्रँकोइस बायरो यांनी अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मॅक्रॉन यांच्याकडे राजीनामा दिला होता.
फ्रान्समधील सामान्य नागरिक आज एका द्विधा अवस्थेत आहेत. महागाई, अर्थसंकल्पातील कपात, सरकारी धोरणांविषयीचा असंतोष आणि त्यावर उपाययोजना करण्याऐवजी सतत बदलणारे पंतप्रधान या सर्वांमुळे जनतेत भ्रमनिरास वाढला आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की, “सरकारने ऐकण्याऐवजी दडपशाही केली तर परिस्थिती आणखी बिघडेल.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WeAreFire : ‘उत्कटतेच्या ज्वाला…’ ‘या’ नेपाळी विद्यार्थ्यांचे आक्रमक शब्द बनले जनतेचा गगनभेदी आवाज, प्रचंड VIRAL
१८ सप्टेंबर रोजी घोषित राष्ट्रीय संप हा या आंदोलनांचा पुढचा मोठा टप्पा ठरू शकतो. राजकीय पक्षांचा पाठिंबा, कामगार संघटनांचा सहभाग आणि युवकांचा वाढता उत्साह यामुळे सरकारसमोरची डोकेदुखी अजून वाढणार हे निश्चित आहे. नव्या पंतप्रधान लेकोर्नू यांच्यासाठी हा काळ कसोटीचा असेल.