
पिंपळगव्हाण (ता. पाथर्डी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची एकूण पटसंख्या २४ आहे. शासनाने या शाळेसाठी दोन शिक्षकपदे मंजूर केली आहेत. मात्र, यातील एका शिक्षकाच्या बदलीनंतर रिक्त पदावर अद्याप नवीन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून संपूर्ण शाळेचा शैक्षणिक बोजा एकाच शिक्षकावर पडला आहे. यामुळे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे अशक्य झाले आहे. परिणामी, चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले असल्याची तीव्र नाराजी पालकांनी व्यक्त केली.
जेजुरी स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्या; प्रवासी संघटना अन् लोकप्रतिनिधी आक्रमक
या अन्यायाविरोधात विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी पंचायत समिती परिसरात एक तास ठिय्या आंदोलन केले. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचा आरोप आंदोलकांनी केला. उपाशीपोटी आलेल्या लहान मुलांना दालनाबाहेर ताटकळत बसावे लागल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून लवकरच शिक्षक नियुक्त करण्यात येईल, असे लेखी आश्वासन आंदोलकांना देण्यात आले.
आंदोलनादरम्यान “आम्हाला कायमस्वरूपी शिक्षक हवा” अशा घोषणांनी पंचायत समिती परिसर दणाणून गेला. गटविकास अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेऊ नये, तर तत्काळ शिक्षक नियुक्त करून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी ठाम भूमिका पालक व ग्रामस्थांनी मांडली.
BMC Mayoral Election: मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक लांबणीवर; महायुतीमधील ‘हॉटेल डिप्लोमसी’
पालकांनी सांगितले की, शिक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे गटविकास अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नाहीत. मुलांचे शिक्षण ठप्प झाले तरी प्रशासनाला काहीच फरक पडत नाही का, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
या संदर्भात विश्वनाथ थोरे, नारायण पाखरे, किशोर थोरे, शिवाजी पाखरे, अशोक पाखरे, नागेश थोरे, सुनील थोरे, मंगल खेडकर, सीमा थोरे, संगीता थोरे, साखराबाई पाखरे, जयश्री पाखरे, वासुदेव थोरे, अनिल थोरे आदी पालकांनी निवेदन सादर केले. तातडीने शिक्षक नियुक्त न झाल्यास शाळाबंद आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.