Horrific accident in Los Angeles Car driver plows into crowd, crushing people more than 10 injured
लॉस एंजलिस : अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. एका कारचालकाने गर्दीत घुसून लोकांना चिरडले आहे. यामध्ये १० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरलेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लॉस एंजलिसमध्ये वेस्ट सांता मोनिका बुलेव्हार्ड येथे घडली. स्थानिक वेळेनुसार, शनिवारी (१९ जुलै) पहाटे २ च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. हा अपघात जाणूनबुजून करण्यात आला की निष्काळजीपणामुळे घडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या या अपघाताची चौकशी सुरु करण्यात आली आहे. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतल आहे. सध्या कार चालकाची ओळख पटवण्याचे कार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षदर्शनींनी सांगितले की, एक राखाडी रंगाची कार अचानक गर्दीच्या दिशेने धावत आली आणि लोकांना चिडून गेली. शिवाय या अपघातापूर्वी एका महिलेला गोळीबाराचा आवाज ऐकू आला होता. यामुळे घटनास्थळी लोकांमध्ये पळापळ सुरु झाली.
शिवाय अमेरिकेत अनेक राज्यांमध्ये गोळीबाराच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. अमेरिकेच्या फिलाडेल्फियात सार्वजनिक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये ६ जणांचा मृत्यू तर ३१ जण जखमी झाले होते. तसेच अमेरिकेच्या शिकागोतही रेस्टॉरंटबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. गेल्या काही काळात अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे अमेरिकेच्या नागरिकांच्या सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्न उमटले आहेत.
यापूर्वी देखील अशा रस्ते अपघाताच्या घटना घडल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी ब्रिटनच्या लिव्हरपूरमध्येही अशी घटना घडली होती. एका फुटबॉल क्लबच्या चाहत्यांवर गर्दीत कार घुसवण्यात आली होती. या दुर्घटनेत ४७ जण जखमी झाले होते. लिव्हरपूर येथे फुटबॉल क्लबची विजयी परेड सुरु असताना ही घटना घडली होती. तत्पूर्वी, जर्मनीती म्युनिकमध्ये असाच एक प्रकार घडला होता. एका अफगाण नागरिकाने निदर्शकांना चिरडले होते. यामध्ये २८ हून अधिक लोक जखमी झाले होते.