Golden Dome missile defense : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच 175 अब्ज डॉलर्सच्या ‘गोल्डन डोम’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची अधिकृत घोषणा केली आहे. ही अत्याधुनिक मिसाइल शील्ड सिस्टम केवळ पृथ्वीवरील नव्हे, तर अंतराळातून होणारे हल्लेही रोखू शकते, असा दावा करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे चीन आणि रशिया दोघेही चिंतेत असून, बीजिंगने याला थेट विरोध दर्शवला आहे. चीनने अमेरिका या योजनेपासून माघार घेण्याची मागणी केली आहे आणि हा प्रकल्प जागतिक स्थैर्यासाठी घातक ठरू शकतो, असा इशारा दिला आहे.
‘गोल्डन डोम’ अमेरिकेचा अंतराळातील शस्त्रसज्जीकरणाचा आराखडा
२० मे रोजी ट्रम्प यांनी या प्रकल्पाची घोषणा करताना सांगितले की, “गोल्डन डोम प्रणाली कोणत्याही कोनातून, कोणत्याही देशातून, अगदी अंतराळातूनही होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना तोंड देण्यास सक्षम असेल. हे अमेरिका आणि तिच्या युतीसाठी अभेद्य कवच ठरेल.” या प्रणालीचा उद्देश शत्रूच्या आक्रमणाला चार टप्प्यांत ओळखणे, थांबवणे आणि नष्ट करणे असा आहे. अमेरिकेने या प्रकल्पाला ‘अमेरिकेचे पहिले अंतराळातील शस्त्र’ असे संबोधले आहे, ज्यामुळे अंतराळही रणभूमी बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, यात जमिनीवरील व अवकाशातील दोन्ही तंत्रज्ञानांचा समावेश आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानपेक्षा वाईट हाल होणार बांगलादेशचे? लष्करप्रमुखांच्या हातात देशाची सूत्र, युनूस हतबल
चीनचा तीव्र विरोध, जागतिक संतुलन धोक्यात
अमेरिकेच्या या घोषणेनंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी स्पष्ट शब्दांत चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले, “अमेरिका ‘यूएस फर्स्ट’ धोरणांतर्गत फक्त स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करत आहे. अशा प्रणालीमुळे बाह्य अवकाशाचे लष्करीकरण होते आणि शस्त्रास्त्रांच्या शर्यतीस खतपाणी मिळते.” बीजिंगने अमेरिकेवर जागतिक स्थैर्य बिघडवण्याचा आरोप करत, या प्रकल्पाला स्थगित करण्याची मागणी केली आहे. माओ निंग म्हणाले की, “हे इतर राष्ट्रांच्या सुरक्षेशी तडजोड करणारे आणि सामूहिक विश्वासाला धोका पोहोचवणारे पाऊल आहे.” चीनने अमेरिकेला “गोल्डन डोमसारख्या जागतिक क्षेपणास्त्र संरक्षण योजनेपासून माघार घ्यावी” असे जाहीरपणे सांगितले आहे.
रशियाचीही चिंता, अंतराळातील युद्धाचे संकेत?
या प्रकल्पावर रशियानेही नाराजी व्यक्त केली आहे. क्रेमलिनने बीजिंगसोबतच्या चर्चेनंतर म्हटले की, “गोल्डन डोम मुळे अंतराळातील शांततेला धोका निर्माण होतो आणि ते अंतराळातील लष्करी शस्त्रसज्जतेस प्रोत्साहन देऊ शकते.” रशियाने ठामपणे सांगितले की, ही योजना रणांगणाचे स्वरूप बदलू शकते, आणि अमेरिका अवकाशालाही युद्धभूमी बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
जागतिक सुरक्षा, तणावाची नव्या पर्वाची सुरुवात?
या घोषणेमुळे जागतिक सुरक्षा संरचनेत मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. शीतयुद्ध संपल्यानंतरही आजवर अवकाशात लष्करी स्पर्धा टाळली जात होती. मात्र, गोल्डन डोमसारखी यंत्रणा अंतराळातही शक्ती संतुलन बिघडवू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. या प्रणालीमुळे अमेरिका संभाव्य हल्ल्यांपासून पूर्णतः संरक्षित होण्याचा दावा करत असली, तरी चीन, रशिया आणि इतर राष्ट्रांमध्ये अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, यामुळे नव्या शस्त्रास्त्र शर्यतीला तोंड फोडले जाऊ शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जर अमेरिका दहशतवाद्यांना आपल्या ताब्यात देऊ शकते, तर पाकिस्तान…’ भारतीय राजदूत जेपी सिंह नक्की काय म्हणाले?
जागतिक संतुलन धोक्यात
‘गोल्डन डोम’ हा अमेरिका आणि तिच्या मित्रदेशांसाठी संरक्षणाचे मजबूत कवच असले, तरी इतर महासत्तांसाठी तो धोक्याचा इशारा आहे. चीन आणि रशियाचा संयुक्त विरोध, अंतराळातील संभाव्य शस्त्रसज्जता, आणि जागतिक धोरणात्मक स्थैर्यावरचा परिणाम – या सर्व बाबींसह या प्रकल्पाने जगाला नव्या तणावाच्या उंबरठ्यावर आणले आहे. आता पाहावे लागेल की अमेरिका आपल्या या निर्णयावर ठाम राहते की जागतिक दबावाखाली काही बदल करते.