'जर अमेरिका दहशतवाद्यांना आपल्या ताब्यात देऊ शकते, तर पाकिस्तान...' भारतीय राजदूत जेपी सिंह नक्की काय म्हणाले? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India Pakistan relations : दहशतवादाविरोधात लढणाऱ्या भारताने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानचा खरपूस समाचार घेतला आहे. इस्रायलमध्ये भारताचे राजदूत जेपी सिंह यांनी एका मुलाखतीत पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर तीव्र शब्दांत टीका केली आणि म्हटले की, “जेव्हा अमेरिका दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात देऊ शकते, तेव्हा पाकिस्तान हाफिज सईद, लख्वी आणि साजिद मीर यांना का सोपवत नाही?”
मुंबई हल्ल्याच्या संदर्भाने दहशतवाद्यांविरोधात भारताने उचललेल्या कारवाया, आणि त्या मागे असलेल्या कट्टरवादी संघटनांची पाकिस्तानकडून होणारी सरंक्षण व्यवस्था यावर प्रकाश टाकताना राजदूत सिंह यांनी स्पष्ट सांगितले की, “लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद हे भारतात झालेल्या बहुतांश दहशतवादी हल्ल्यांमागचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांचे नेते आजही पाकिस्तानमध्ये मोकाट फिरत आहेत.”
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत सिंह म्हणाले की, “दहशतवाद्यांनी लोकांना मारण्याआधी त्यांचा धर्म विचारला आणि निर्दोष नागरिकांचा बळी घेतला. आमच्या कारवायांचा उद्देश फक्त दहशतवादी गट व त्यांच्या पायाभूत सुविधांचा नायनाट करणे हा होता. त्यावर पाकिस्तानने हल्ले करून उत्तर दिले.” ते पुढे म्हणाले, “आपली लढाई दहशतवाद्यांविरुद्ध आहे आणि ती सुरूच राहणार. युद्धबंदी अद्याप सुरू आहे, पण ‘ऑपरेशन सिंदूर’ संपलेले नाही. ही भारताची नवी सामान्यता आहे. आक्रमक रणनीती. दहशतवादी कुठेही असले तरी त्यांचा खात्मा होणारच.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : एकीकडे लष्करप्रमुखांना धमकावत होते युनूस, तर दुसरीकडे बांगलादेशच्या सैन्याने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
अमेरिकेने अलीकडेच मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वुर हुसेन राणा याला भारताच्या ताब्यात दिले आहे. त्याचा उल्लेख करत राजदूत सिंह म्हणाले, “अमेरिका हे करू शकते, तर पाकिस्तान का नाही? त्यांनी फक्त हाफिज सईद, लख्वी आणि साजिद मीर यांना आमच्या स्वाधीन करावे. यामुळे न्यायाच्या प्रक्रियेला चालना मिळेल आणि दहशतवाद्यांवर अंकुश बसेल.” मुंबई हल्ल्यात अनेक यहुदी नागरिकांचे मृत्यू झाल्याची आठवण करून देत त्यांनी इस्रायलच्या व्यासपीठावरून पाकिस्तानला झणझणीत सुनावले. “ही केवळ भारताचीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय समुदायाची जबाबदारी आहे.”
पाकिस्तानने अलीकडे पहलगाम हल्ल्याच्या चौकशीसाठी सहकार्याची इच्छा व्यक्त केली. यावर टीका करत राजदूत सिंह म्हणाले, “मुंबई, पठाणकोट आणि पुलवामा हल्ल्यांच्या बाबतीत पाकिस्तानने चौकशीचं नाटक केलं. आम्ही त्यांना पुरावे, तांत्रिक माहिती, आणि जागतिक समुदायाचा पाठिंबाही दिला – तरीही त्यांनी काहीच केलं नाही.”
राजदूत जेपी सिंह यांनी ठामपणे सांगितले की, “दहशतवाद केवळ एका देशाचा प्रश्न नाही. भारत, इस्रायल आणि इतर त्रस्त देशांनी एकत्र येत दहशतवादी संघटनांवर आणि त्यांच्या समर्थकांवर आघात करणारी आंतरराष्ट्रीय युती तयार केली पाहिजे.” त्यांनी पुढे म्हटले, “जगातील दहशतवादी कारवायांमागे जे राष्ट्रे आश्रय देतात, त्यांना रोखणे तितकेच महत्त्वाचे आहे जितके दहशतवाद्यांचा नायनाट करणे. केवळ कारवाई करून नव्हे, तर एकत्रित राजनैतिक आणि लष्करी दबाव निर्माण करूनच ही लढाई आपण जिंकू शकतो.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Government: ‘आता दारूपासून सिगारेटपर्यंत…’ पाकिस्तानचे खिसे भरताना चीनवर गरिबीचे सावट
भारतीय राजदूत जेपी सिंह यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, दहशतवाद्यांना संरक्षण देणाऱ्या कोणत्याही राष्ट्रावर भारत गप्प बसणार नाही. दहशतवादाविरोधात केवळ सैनिकी नव्हे तर राजनैतिक, आंतरराष्ट्रीय आणि नैतिक पातळीवरही भारत आक्रमक पवित्रा घेणार आहे. “आता केवळ कारवाईच नव्हे, तर जबाबदारी आणि न्याय हवा आहे”. असा ठाम संदेश त्यांनी जागतिक समुदायाला दिला आहे.