India shines again 54 institutes in QS Rankings 2026
QS World University Rankings : भारताच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्यंत गौरवाची बाब ठरली आहे. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ मध्ये देशातील तब्बल ५४ उच्च शिक्षण संस्थांनी आपले स्थान मिळवले आहे. या ऐतिहासिक कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशवासीयांचे अभिनंदन करत शैक्षणिक सुधारणांचे फलित असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘X’ (माजी ट्विटर) वरून या यशाबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले, “QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ आपल्या शिक्षण क्षेत्रासाठी खूप चांगली बातमी घेऊन आले आहे. भारतातील तरुणांच्या हितासाठी संशोधन आणि नवोन्मेष परिसंस्था अधिक मजबूत करण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे.” या रँकिंगच्या माध्यमातून भारतातील उच्च शिक्षण संस्थांची जागतिक स्तरावर पोच वाढली असून, त्याचा फायदा देशाच्या जागतिक दर्जाच्या मानव संसाधन निर्मितीत होणार असल्याचेही ते म्हणाले.
QS रँकिंगनुसार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्ली ही भारतातील सर्वोच्च रँकिंग प्राप्त संस्था ठरली आहे. IIT दिल्लीने गेल्या दोन वर्षांत ७० हून अधिक स्थानांची झेप घेत यंदा १२३ व्या क्रमांकावर पोहोचले आहे. ही संस्था भारताच्या जागतिक शैक्षणिक स्थानाचे प्रतीक ठरली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायल-इराण युद्धावर जागतिक शक्तींचा संयमाचा सल्ला; शी जिनपिंग यांनी व्लादिमीर पुतिन यांच्यात गंभीर चर्चा
या वर्षी रँकिंगमध्ये ८ नवीन भारतीय संस्थांचा समावेश झाल्याने भारताने एकूण ५४ संस्थांसह आपली उपस्थिती भक्कम केली आहे. भारत आता या यादीत चौथ्या स्थानावर आहे. फक्त अमेरिका (१९२ संस्था), यूके (९० संस्था), आणि चीन (७२ संस्था) भारताच्या पुढे आहेत. यंदाच्या QS रँकिंगमध्ये इतर कोणत्याही देशाने भारतासारखी वाढ नोंदवलेली नाही. जॉर्डन आणि अझरबैजानने प्रत्येकी फक्त ६ विद्यापीठे रँकिंगमध्ये समाविष्ट केली आहेत.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही ‘X’ वरून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले, “२०१४ मध्ये केवळ ११ भारतीय संस्थांना रँकिंगमध्ये स्थान होते. आज ती संख्या ५४ वर पोहोचली आहे. ही वाढ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिक्षण क्षेत्रातील परिवर्तनकारी सुधारणा आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० यांचे फलित आहे.” त्यांनी असेही नमूद केले की, NEP 2020 भारताच्या शिक्षण क्षेत्रात केवळ बदल घडवत नाही, तर खऱ्या अर्थाने क्रांती घडवत आहे.
‘QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’ ही लंडनस्थित क्वाक्वेरेली सायमंड्स (QS) संस्थेद्वारे दरवर्षी प्रसिद्ध केली जाते. या रँकिंगमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन प्रभाव, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी प्रमाण, रोजगारक्षमतेसाठी प्रतिष्ठा इत्यादी घटकांवर विद्यापीठांचे मूल्यमापन केले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हे’ आहेत जगातील टॉप 5 सर्वात घातक ड्रोन; 50 हजार फूट उंचीवरून शत्रूला करतात नेस्तनाबूत
भारताने शैक्षणिक उत्कृष्टतेच्या आंतरराष्ट्रीय मंचावर आपला ठसा उमटवला आहे. IIT दिल्लीसारख्या संस्थांनी जागतिक स्पर्धेत आपले स्थान अधिक बळकट केले असून, देशभरातील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी प्रेरणा आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात शिक्षण क्षेत्रात सुरू असलेली सुधारणा आणि नवोन्मेषासाठी असलेली कटिबद्धता यामुळे भारत भविष्यात जागतिक शिक्षण केंद्र म्हणून उदयास येईल, याबाबत शंका नाही.