India sidesteps China and Pakistan securing ₹4,000 crore investment
तेहरान : पाकिस्तान आणि चीनने मोठ्या आशेने विकसित केलेल्या ग्वादर बंदर प्रकल्पाला अपयश येत असतानाच भारताने चाबहार बंदराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भारत तब्बल ४००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, बंदराच्या क्षमतेत पाचपट वाढ करण्याचा संकल्प केला आहे. ही योजना भारताला मध्य आशियासोबत व्यापारी संबंध बळकट करण्यासाठी आणि चीन-पाकिस्तानच्या CPEC योजनेला उत्तर देण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांत पाकिस्तान आणि चीनने ग्वादर बंदराला आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख केंद्र बनवण्याचे मोठे स्वप्न रंगवले होते. मात्र, बलुचिस्तानमधील अस्थिरता आणि सुरक्षा समस्या यामुळे हा प्रकल्प अपयशी ठरत आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने नुकतेच जाफर एक्स्प्रेस ट्रेनचे अपहरण केले, त्यामुळे चीनचा अब्जावधी डॉलर्सचा CPEC प्रकल्प आणखी अडचणीत आला आहे.
दुसरीकडे, भारताने चाबहार बंदराच्या विकासावर लक्ष केंद्रित करत संधी साधली आहे. इराणच्या या बंदराचा विकास करण्यासाठी भारत नवीन आधुनिक क्रेन बसवणार आहे आणि बंदर व्यवस्थापन सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान आणणार आहे. सध्या चाबहार बंदराची क्षमता १००,००० TEUs (ट्वेंटी फुट इक्विव्हलंट युनिट्स) आहे, जी पुढील काही वर्षांत ५,००,००० TEUs पर्यंत वाढवण्याचा भारताचा मानस आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बांगलादेशच्या घशाला कोरड; समोर आला युनूस सरकारचे डोळे उघडणारा अहवाल
अमेरिकेने यापूर्वी चाबहार बंदरासाठी भारताला निर्बंधांपासून सूट दिली होती, मात्र अलीकडेच ही सवलत संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. हे अमेरिकेच्या इराणविरोधी धोरणाचा एक भाग आहे, ज्याद्वारे ते तेहरानच्या आण्विक कार्यक्रमावर दबाव आणू इच्छित आहे.
तथापि, या निर्बंधांचा भारताच्या धोरणावर कोणताही परिणाम झाला नाही. मोदी सरकारने चाबहार प्रकल्पासाठी आपल्या गुंतवणुकीला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. भारत या बंदराचा उपयोग अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील देशांशी व्यापारी संबंध मजबूत करण्यासाठी करणार आहे.
भारतासाठी चाबहार बंदर हा केवळ एक व्यापारी प्रकल्प नसून एक कूटनीतिक संधी आहे. या बंदराद्वारे भारत थेट मध्य आशियाशी आणि अफगाणिस्तानशी जोडला जाईल, ज्यामुळे पाकिस्तानला वळसा घालून भारत व्यापार करू शकतो.
याशिवाय, चाबहार हा आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर (INSTC) प्रकल्पाचा एक भाग आहे, जो भारताला थेट रशियाशी आणि युरोपशी जोडतो. INSTC कॉरिडॉरमुळे भारताला अर्मेनिया, रशिया आणि युरोपातील इतर देशांमध्ये सहज माल वाहतूक करता येणार आहे. विशेष म्हणजे, रशियाही याच मार्गाचा उपयोग करून भारत आणि आखाती देशांशी व्यापार वाढवत आहे, त्यामुळे तो अमेरिकेच्या निर्बंधांपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे.
भारताने चाबहार बंदराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यापारात आपली भूमिका अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतात देखील आहेत CIAचे सिक्रेट अड्डे? JFK च्या फाईल्समध्ये अमेरिकन गुप्तचर संस्थेची गुपिते उघड
ग्वादर बंदर चीन आणि पाकिस्तानसाठी आर्थिक अडथळ्यांचे केंद्र बनले असताना, भारताने चाबहार बंदराच्या माध्यमातून मोठ्या आर्थिक संधी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या निर्बंधांचा फटका न बसू देता भारताने ४ हजार कोटींची गुंतवणूक करून आपल्या व्यापारी धोरणाला अधिक बळकट करण्यास सुरुवात केली आहे.
चाबहार बंदर हा केवळ भारताचा व्यापारी प्रकल्प नसून चीन-पाकिस्तानच्या वाढत्या प्रभावाला उत्तर देणारी मोठी रणनीती आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर भारताच्या जागतिक प्रभावात मोठी वाढ होईल, आणि युरोप, मध्य आशिया, तसेच आखाती देशांसोबत व्यापार अधिक वेगाने वाढेल.