Indian Navy's INS Trikanda arrives in Cyprus for show of force
भारतीय नौदलाचे INS त्रिकंद हे आधुनिक युद्धनौकेने सायप्रसच्या लिमासोल बंदरात प्रवेश करून तुर्कीला थेट संदेश दिला आहे.
भारत-सायप्रस संरक्षण सहकार्य वाढत असून मोदींच्या भेटीनंतर हे पाऊल विशेष महत्त्वाचे ठरते.
तुर्की-सायप्रस तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा हा लष्करी डाव तुर्कीसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
INS Trikand Cyprus arrival : जागतिक राजकारणात प्रत्येक हालचालीला अर्थ असतो. खासकरून समुद्री सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेले पाऊल तर एखाद्या राष्ट्राच्या शक्तीचे थेट द्योतक ठरते. भारताने नुकतेच असेच एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. भारतीय नौदलाचे सर्वात प्रगत स्टेल्थ फ्रिगेट्सपैकी एक आयएनएस त्रिकंद ( INS Trikand) रविवारी( दि.21 सप्टेंबर 2025 ) सायप्रसच्या लिमासोल बंदरात दाखल झाले. वरकरणी हे एक नियमित दौऱ्याचे कारण असले तरी यामागील राजकीय संदेश मात्र अत्यंत ठळक आहे.
गेल्या काही वर्षांत भारत आणि तुर्की यांच्यातील नाते गोड राहिलेले नाही. तुर्की उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा देत आले आहे. जम्मू–काश्मीरच्या प्रश्नावरही तुर्कीने भारताविरोधात भूमिका घेतली. त्याचबरोबर ७ ते १० मेदरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी तुर्कीने पाकिस्तानच्या बाजूने उभे राहून भारताला उघडपणे आव्हान दिले. या काळात कराची बंदरात तुर्कीची युद्धनौका टीसीजी ब्युकाडा दाखल झाली होती. हे सर्व पाहता भारतानेही योग्य तो प्रतिकार करत आपले समुद्री बळ दाखवण्याचा निर्णय घेतला. त्याचे ठोस रूप म्हणजे आयएनएस त्रिकंदचे सायप्रसमध्ये आगमन.
सायप्रस हा तुर्कीचा जुना शत्रू. १९७४ च्या युद्धानंतर सायप्रस दोन भागांत विभागला गेला आणि तुर्की–सायप्रस तणाव कायमस्वरूपी वाढला. या पाश्र्वभूमीवर भारत आणि सायप्रस यांचे संरक्षण सहकार्य हे तुर्कीला थेट उत्तर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून महिन्यात सायप्रसला दिलेल्या भेटीवेळी हे बीजारोपण झाले. त्या भेटीत संरक्षण, प्रशिक्षण आणि सागरी सुरक्षेवर सहकार्य वाढवण्यासाठी चार वर्षांची कृती योजना तयार करण्यात आली. आता त्रिकंदच्या आगमनाने या कराराला प्रत्यक्ष रूप आले आहे.
हे देखील वाचा : Shardiya Navratri: ‘याच’ पर्वतावर देवी भवानीने केला होता महिषासुराचा वध; आजही केली जाते ‘या’ ठिकाणी त्या राक्षसाची पूजा
२१ ते २४ सप्टेंबर दरम्यान आयएनएस त्रिकंद सायप्रसमध्ये थांबणार आहे. या काळात सायप्रस नौदलासोबत संयुक्त नौदल सराव (पासेक्स) होणार आहे. हे केवळ व्यावसायिक सराव नसून एक प्रकारे तुर्कीला धाक दाखवण्याचे साधन आहे. भारत आणि सायप्रस दोन्ही देश राजनैतिक आणि संरक्षण क्षेत्रात अनेक उपक्रम राबवतील. यामुळे केवळ द्विपक्षीय नातेच दृढ होणार नाही तर भूमध्य समुद्र परिसरातील सामरिक समीकरणेही बदलणार आहेत.
तुर्कीला सर्वाधिक त्रास देणारा मुद्दा म्हणजे सायप्रसमधील कोणतीही परकीय हालचाल. आधीच इस्रायलने सायप्रसमध्ये हवाई संरक्षण प्रणाली तैनात केली आहे. त्यात आता भारताची अत्याधुनिक त्रिकंद युद्धनौका दाखल झाली आहे. ही नौका अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर्स आणि स्टेल्थ तंत्रज्ञानाने सज्ज आहे. त्यामुळे भूमध्य समुद्रातील तुर्कीची वर्चस्ववादी भूमिका धोक्यात येण्याची शक्यता आहे.
भारतातील हा डाव केवळ संरक्षणापुरता मर्यादित नाही. हा एक राजकीय संदेश आहे की, भारत आता जागतिक घडामोडींमध्ये निष्क्रिय पाहुणा राहणार नाही. ज्या तुर्कीने पाकिस्तानचा उघडपणे पाठिंबा घेतला, त्यालाच भारताने त्याच्या शत्रू सायप्रससोबत हातमिळवणी करून प्रत्युत्तर दिले आहे. हा संदेश आशियापासून ते युरोपपर्यंत सगळ्यांनी गंभीरपणे घेतला आहे.
आजच्या काळात समुद्रमार्ग हे जागतिक व्यापाराचे प्राण आहेत. भारतासारख्या महासत्तेसाठी हिंद महासागरापुरतेच नाही तर भूमध्य समुद्रासारख्या दूरवरच्या क्षेत्रांतही आपली उपस्थिती दाखवणे आवश्यक आहे. त्रिकंदच्या दौऱ्यामुळे भारताने आपल्या ‘ब्लू वॉटर नेव्ही’ क्षमतेचे प्रदर्शन केले आहे. हीच ताकद भारताला अमेरिकेसोबत, युरोपातील देशांसोबत आणि मध्यपूर्वेत सामरिकदृष्ट्या बळकट स्थान देऊ शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-Sri Lanka: ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणाची नवी पायरी; नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठींचा श्रीलंका दौरा, ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा
सायप्रससाठी भारताची साथ म्हणजे केवळ लष्करी बळ नाही, तर आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक विश्वासार्ह भागीदार मिळणे आहे. लहान देशांसाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते. तुर्कीसोबत चाललेल्या संघर्षात भारताची साथ सायप्रसला दिलासा देणारी आहे. दुसरीकडे, भारतालाही भूमध्य समुद्र परिसरात एक ठोस मित्र मिळाला आहे.
आयएनएस त्रिकंदचा सायप्रस दौरा हा केवळ लष्करी कार्यक्रम नाही तर जागतिक राजकारणातील एक ठोस आणि विचारपूर्वक आखलेला डाव आहे. पाकिस्तान–तुर्की जवळीक, काश्मीर प्रश्नावर तुर्कीची भूमिका, आणि कराचीमध्ये तुर्की युद्धनौकेचे आगमन यांना भारताने नेमके उत्तर दिले आहे. त्यामुळे हा दौरा केवळ भारत–सायप्रस सहकार्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर तुर्कीसाठीही एक कठोर इशारा ठरणार आहे.