Modi In Cyprus : तुर्कीचा सर्वात मोठा शत्रू करणार भारतासोबत संरक्षण करार; पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान हालचालींना वेग ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
भारत आणि सायप्रस यांच्यात संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अवकाश क्षेत्रात सामंजस्य करारांनंतर नवे सहकार्य सुरू होणार आहे.
तुर्की-सायप्रस वैरामुळे हा करार प्रादेशिक राजकारणात मोठा बदल घडवू शकतो.
मोदींच्या सायप्रस भेटीनंतर दोन्ही देशांचे संबंध अभूतपूर्व वेगाने दृढ होत असून याला तुर्कीविरोधी संदेश म्हणूनही पाहिले जात आहे.
Cyprus-India AI MoU : जून २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रसला दिलेल्या ऐतिहासिक भेटीनंतर दोन्ही देशांच्या संबंधांना एक नवा अध्याय मिळाला आहे. तब्बल २३ वर्षांनी भारतीय पंतप्रधानांनी सायप्रसला भेट दिली होती. या दौऱ्यात केवळ औपचारिक चर्चा न होता, भविष्यातील धोरणात्मक मैत्रीची पायाभरणी झाली. त्यातून आता कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), अवकाश तंत्रज्ञान, संशोधन, व्यापार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संरक्षण क्षेत्रात सहकार्याचे नवे दरवाजे उघडले आहेत.
सायप्रसच्या सीएसआरआय संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डेमेट्रिस स्कॉरिड्स यांनी मुंबईत बोलताना सांगितले की, मोदींच्या दौऱ्यानंतर स्वाक्षरी केलेले सामंजस्य करार आता प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये रूपांतरित होत आहेत. ते म्हणाले, “अमेरिका आणि चीन जरी एआयमध्ये आघाडीवर असले तरी भारताची दृष्टी वेगळी आहे. भारत संतुलित मार्ग निवडत असून, नव्या तंत्रज्ञानाला समाजासाठी पूरक बनवण्याचा प्रयत्न करतोय. या प्रवासात सायप्रसला भागीदार बनण्याची संधी आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Saudi deal: सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये मोठा संरक्षण करार; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया आली समोर
भारत आज अवकाश क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या जगातील पाच प्रमुख राष्ट्रांपैकी एक आहे. चांद्रयान, मंगळयान यांसारख्या मोहिमांमुळे भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. दुसरीकडे, सायप्रस अवकाश राष्ट्र नसले तरी देशातील कंपन्या सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान विकसित करण्यात पुढे येत आहेत. अशा वेळी भारतासोबत हातमिळवणी केल्याने सायप्रसच्या कंपन्यांना जागतिक मंचावर संधी मिळेल.
सायप्रस आणि तुर्की यांच्यातील संघर्ष नवीन नाही. १९७४ च्या युद्धानंतर सायप्रस कायमचे दोन भागांत विभागला गेला. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये सतत तणाव आहे. तुर्की सायप्रसला आपला शत्रू मानतो, आणि उलटही तेच. या पार्श्वभूमीवर भारत-सायप्रस मैत्री केवळ आर्थिक किंवा तांत्रिक नसून राजकीय संदेशही देणारी आहे. विशेषतः तुर्कीची पाकिस्तानशी असलेली जवळीक लक्षात घेतल्यास, भारताचे सायप्रससोबतचे सहकार्य तुर्कीला अस्वस्थ करणारे ठरू शकते.
तुर्की आणि पाकिस्तान यांचे जुने सामरिक संबंध आहेत. पाकिस्तानविरोधात भारताची भूमिका सर्वज्ञात आहे. त्यामुळे भारत आणि सायप्रसची जवळीक प्रादेशिक संतुलन बदलू शकते. तज्ञांच्या मते, हा केवळ दोन देशांमधील करार नसून, भूमध्य समुद्रापासून दक्षिण आशियापर्यंतच्या राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारा टप्पा आहे.
सायप्रसचा उद्योगक्षेत्र तुलनेने लहान असला तरी, तंत्रज्ञानावर आधारित नवे प्रयोग या देशात सुरू आहेत. एआय, सॉफ्टवेअर विकास आणि डिजिटल तंत्रज्ञानात सायप्रस गुंतवणूक करत आहे. भारतासोबत संशोधन सहकार्य झाल्यास भारतीय विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि स्टार्टअप्सना नवे दालन खुले होईल.
डेमेट्रिस स्कॉरिड्स यांनी स्पष्ट केले की, अमेरिका आणि चीन एआयमध्ये वेगाने पुढे जात असले तरी त्यांची वाटचाल प्रामुख्याने नफा आणि बाजारपेठेवर केंद्रित आहे. भारत मात्र ‘मानवीकेंद्रित एआय’ तयार करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच समाजातील सर्वसामान्यांना उपयोगी ठरेल असे तंत्रज्ञान निर्माण करणे. हा दृष्टिकोन सायप्रससाठीही आकर्षक आहे.
मोदींच्या सायप्रस भेटीकडे तुर्कीने बारकाईने लक्ष ठेवले होते. कारण, हा दौरा फक्त एक राजनैतिक औपचारिकता नव्हती; तर तुर्कीविरोधी संदेशही होता. तज्ञांचे म्हणणे आहे की, “भारताने सायप्रससोबतची जवळीक वाढवून तुर्कीला स्पष्ट कळवले की, प्रादेशिक समीकरणांमध्ये भारत एक महत्त्वाचा घटक ठरेल.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Drug Policy : अमेरिकेच्या ड्रग्ज तस्करी अहवालात ‘हे’ 23 देश रडारवर; पाहा भारताबद्दल काय म्हणाले ट्रम्प?
भारतात आणि सायप्रसला एकत्रितपणे काम करता येईल अशी अनेक क्षेत्रे आहेत
संरक्षण संशोधन
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स
अवकाश संशोधन व सॉफ्टवेअर
व्यापार आणि गुंतवणूक
सांस्कृतिक देवाणघेवाण
या सर्व क्षेत्रात दोन्ही देशांचा सहकार प्रगाढ झाला तर पुढील दशकात भारत-सायप्रस संबंध एक आदर्श भागीदारी म्हणून उभे राहू शकतात.