Indian-origin politician arrested for running a gambling racket in America, network linked to Italian mafia
वॉशिंग्टन: अमेरिकेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका भारतीय वंशाच्या राजकारणीला अटक करण्यात आली आहे. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुगार रॅकेट चालवल्याच्या आरोपाखाली या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तसेच यामध्ये आणखी 29 जणांचा समावेश आहे. अटक केलेल्यांवर इटालियन माफियाशी संबंधित जुगार रॅकेटमधून लाखो डॉलर्स या लोकांनी कमवल्याचा आरोप आहे. फ्लोरिडामध्ये पोकर होस्ट म्हणून असणाऱ्या समीर नाडकर्णी या भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
न्यू जर्सी येथील ॲटर्नी मॅथ्यूज यांनी याबाबात एक निवेदना जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी न्यू जर्सी येथील कौन्सिलमन आणि स्थानिक व्यापारी आनंद शाह यांच्यावर आरोप केला आहे. आनंद शाह यांच्यावर बेकायदेशीरपणे जुगार अड्डे चालवणे आणि लुचेस गुन्हेगारी कुंटुंबाच्या लोकांशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लुचेसी कुटुंब गुन्हेगारीत बऱ्याच काळापासून असून त्यांच्या बेकायदेशीर जुगाराचा व्यवसाय दोन वर्षाच्या चौकशीनंतर उघड झाला आहे. उत्तर जर्सीतील पोकर क्लब आणि इतर अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. अनेकांना अटक करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 9 एप्रिल रोजी टोटोवा, गारफिल्ड आणि वुडलँड पार्क येथील पोकर क्लब ची झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान अनेक रेस्टॉरंटच्या मागच्या खोल्यांमध्ये गुप्तपण पोकर गेम चालवले जात असल्याचे पुरावे सापडले. तसेच पोकरमधून मिळालेल्या पैशांच्या लॉंडरिंगसाठी अनेक शेल कंपन्या स्थापन केल्याची माहिती देखील समोर आली आहे. यामुळे सध्या पोलिसांनी मनी लॉंड्रिंगचीही शक्यता वर्तवली असून तपास सुरु असल्याचे म्हटले आहे.
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला पोलिसांनी सर्च वॉरंट मिळाल्यानंतर 12 ठिकाणी छापे मारले असून आनंद शाह आणि इतर 29 जणांना अटक केली आहे. या लोकांवर फसवणूक, जुगाराचे गुन्हे, मनी लॉंड्रिंग आणि इतर गुन्ह्यांचे आरोप ठोठवण्यात आले आहेत. यामध्ये फ्लोरिडामधील लॉंगवुड येथील भारतीय वंशाचा समीर नाडकर्णीचा देखील समावेश आहे. समीर नाडकर्णीवर बेकायदेशीरपणे पोकर क्लब चालवल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद शाह यांना यामध्ये मोठी रक्कम मिळाली आहे. पोकर गेमचे व्यवस्थापन उच्च पातळीवरील व्यक्तींसाठी आयोजित करण्यात आले होते.