Iran mocks Israel names Trump Daddy
Iran mocks Israel Trump daddy : इराण आणि अमेरिकेतील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला असून, दोन्ही देशांमध्ये शब्दांच्या युद्धाने कमालीचा रंग धरला आहे. विशेष म्हणजे, यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘डॅडी’ या उपरोधिक टोपणनावाने लक्ष्य करण्यात आले आहे. इराणचे परराष्ट्र उपमंत्री अब्बास अराक्ची यांनी इस्रायलवर टीका करताना म्हटले की, “इराणच्या क्षेपणास्त्रांपासून वाचण्यासाठी इस्रायल ‘डॅडी’कडे म्हणजेच ट्रम्पकडे धावत आहे.”
डोनाल्ड ट्रम्प यांना काही युरोपीय राजकीय नेत्यांनी नाटो परिषदेच्या वेळी ‘डॅडी’ म्हणून हिणवल्याची माहिती यापूर्वीही समोर आली होती. याच संदर्भाचा उपयोग इराणने आपल्या टीकेसाठी केला असून, अराक्ची यांनी थेट ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांना टोमणा मारला. त्यांचे म्हणणे, “इस्रायलचे पंतप्रधान इराणच्या क्षेपणास्त्रांपासून घाबरले असून, आता त्यांनी अमेरिकेच्या ‘डॅडी’कडे मदतीसाठी हात पसरणे सुरू केले आहे.” हे विधान केवळ इस्रायलच्या धोरणावर टीका नसून, अमेरिकेच्या संरक्षण नितीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. यामुळे अमेरिकेचे नेतृत्व पुन्हा चर्चेच्या भोवऱ्यात सापडले आहे.
अब्बास अराक्ची यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर अमेरिका खरोखरच अणुकराराबाबत गंभीर असेल, तर तिने इराणच्या सर्वोच्च धर्मगुरू अयातुल्ला अली खामेनेई यांच्याबद्दल आदरयुक्त भाषा वापरावी. त्यांनी सांगितले, “खामेनेई यांच्याबद्दल अपशब्द वापरले गेले, तर आमच्या लाखो नागरिकांच्या भावना दुखावल्या जातील आणि कोणत्याही प्रकारचा करार शक्य होणार नाही.” हा इशारा ट्रम्प यांच्या त्या सोशल मीडिया पोस्टवर उत्तर म्हणून आला आहे, ज्यामध्ये त्यांनी दावा केला होता की अमेरिकेने खमेनी यांचा जीव वाचवला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Canada-China Relations : कॅनडाचा चीनवर मोठा घाव! ‘या’ कंपनीला देशातून हाकलले, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी इराणवरील निर्बंध शिथिल करण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत दिले होते. मात्र, इराणच्या कठोर प्रतिक्रियेनंतर त्यांनी ते प्रयत्न थांबवले, असा दावा अमेरिकेच्या अधिकृत सूत्रांकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे, इराणने या दाव्यांना फेटाळून लावत स्पष्ट केले आहे की, “आम्ही अमेरिकेशी पुन्हा कोणत्याही प्रकारचे थेट वाटाघाटी सुरू करणार नाही. आमच्या सुरक्षेचा आणि सत्तेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.” इराणने आधीच अमेरिकेवरील विश्वास कमी केला असून, अणुकरारासाठी नव्याने कोणतीही हालचाल अद्याप सुरू झालेली नाही.
इराण आणि अमेरिका यांच्यातील शाब्दिक संघर्ष सध्या तणावपूर्ण स्थिती गाठत आहे. अमेरिकेच्या मध्यपूर्वेत सुरू असलेल्या हालचाली, इस्रायलवर होणारे इराणकडून आरोप, आणि ट्रम्प यांचे वादग्रस्त विधान हे सर्व मिळून एक नवा राजकीय व लष्करी संघर्ष उभा करू शकतात, अशी शक्यता तज्ज्ञ वर्तवू लागले आहेत.
वजागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : एस. जयशंकर यांचा इराणी परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद; भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या मदतीबद्दल इराणचे आभार
इराणने ‘डॅडी’ या टोपणनावाचा वापर करून अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या धोरणांवर केलेली टीका केवळ उपहासात्मक नसून, जागतिक शक्ती संतुलनावर भाष्य करणारी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे वादग्रस्त नेतृत्व, इस्रायलची संरक्षणावर असलेली अवलंबित्व आणि इराणची उग्र भूमिका या सर्व गोष्टींमुळे पश्चिम आशियात पुन्हा एकदा संघर्षाच्या सावल्या गडद होत आहेत.