Khorramshahr‑4 missile : अमेरिका आणि इस्रायलविरोधात आक्रमक भूमिका घेत इराणने पुन्हा एकदा आपली क्षेपणास्त्र क्षमता जगासमोर ठेवली आहे. अमेरिकेने इराणच्या अणु संशोधन तळांवर हवाई हल्ला केल्यानंतर काही तासांतच इराणने इस्रायलवर किमान ४० क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यांमध्ये ‘खोरमशहर-४’ या इराणच्या सर्वात धोकादायक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा समावेश होता, अशी माहिती इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने दिली आहे.
खोरमशहर-4: इराणचं ‘गेमचेंजर’ क्षेपणास्त्र
खोरमशहर-४ हे क्षेपणास्त्र इराणने स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केले असून त्याची श्रेणी तब्बल २००० किलोमीटर इतकी आहे. म्हणजेच, हे क्षेपणास्त्र इस्रायलसह संपूर्ण मध्यपूर्वेत कुठेही लक्ष्य भेदू शकते. एवढंच नाही, तर हे क्षेपणास्त्र १५०० किलोग्रॅम वजनाचा वॉरहेड वाहून नेऊ शकते – जो अणु वा पारंपरिक दोन्ही प्रकारच्या स्फोटकांनी सुसज्ज असू शकतो. हे क्षेपणास्त्र इराणच्या AIO (Aerospace Industries Organization) या सरकारी संरक्षण संस्थेने विकसित केले आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, याचा आराखडा उत्तर कोरियाच्या ह्वासोंग-१० या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रावर आधारित असल्याची शक्यता आहे.
‘खोरमशहर’ नावामागील इतिहास
खोरमशहर या क्षेपणास्त्राला नाव देण्यात आलं आहे ते इराणमधील एका ऐतिहासिक शहरावरून. १९८० च्या इराक-इराण युद्धात या शहराने मोठं नुकसान झेललं होतं. त्यामुळे हे नाव इराणसाठी शौर्य आणि प्रतिकाराचं प्रतीक बनलं आहे. या क्षेपणास्त्राला ‘खेइबार’ असंही एक पर्यायी नाव दिलं गेलं आहे – जे इस्लामिक इतिहासातील एका लढाईतील ज्यू किल्ल्यावरून घेण्यात आलं आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Strike On Iran : आता मोठे अणुयुद्ध होणार? रशियाचा संयुक्त राष्ट्रांत अमेरिकेवर ‘एक’ गंभीर आरोप
पहिली चाचणी आणि सार्वजनिक प्रदर्शन
खोरमशहर-४ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी २०१७ च्या सुरुवातीला घेण्यात आली होती. याच वर्षी सप्टेंबरमध्ये तेहरानमध्ये लष्करी परेडदरम्यान हे क्षेपणास्त्र पहिल्यांदाच जगासमोर आलं. त्यानंतर २०१९ मध्ये याचे अद्ययावत मॉडेल पुन्हा प्रदर्शित करण्यात आले.
इराणचा इस्रायलविरोधात गंभीर इशारा
अमेरिकेच्या हवाई हल्ल्याने उडालेल्या प्रक्षोभानंतर, इराणने इस्रायलवर हल्ले करत आपली क्षेपणास्त्र शक्ती दाखवून दिली आहे. इराणी सरकारी टीव्हीवर खोरमशहर-४ चा फोटो दाखवण्यात आला असून, हे क्षेपणास्त्र इस्रायलच्या संवेदनशील भागांवर हल्ला करण्यासाठी वापरले गेल्याचा दावा केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींवर परिणाम
इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संपूर्ण पश्चिम आशिया पुन्हा एकदा तणावाच्या खाईत लोटला आहे. यामागे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात वाढती शस्त्रस्पर्धा आणि सामरिक संघर्ष दिसून येतो. विश्लेषकांच्या मते, खोरमशहर-४सारख्या क्षेपणास्त्रांच्या वापरामुळे भविष्यात युध्दाचा धोका वाढू शकतो. विशेषतः जेव्हा असे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असतात, तेव्हा परिस्थिती आणखी गंभीर होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel-US War : अमेरिका आणि इराणच्या युद्धात नेमकी काय आहे भारताची भूमिका? वाचा सविस्तर…
खोरमशहर-4
इराणचं खोरमशहर-४ हे केवळ एक क्षेपणास्त्र नाही, तर ते त्यांच्या सामरिक ताकदीचं आणि आंतरराष्ट्रीय दबावाला उत्तर देण्याचं एक सशक्त साधन आहे. अमेरिकेच्या हल्ल्याच्या काही तासांतच या क्षेपणास्त्राचा वापर करून इराणने इस्रायल आणि पश्चिमी देशांना स्पष्ट इशारा दिला आहे – “आमच्याकडे फक्त शब्द नाहीत, शस्त्रंही आहेत!”