Iran's secret plot exposed SVT reveals Enemy Removal plan with European gangsters
SVT Enemy Removal plan : पश्चिम आशियात अतिरेकी कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या इराणने आता युरोपातही आपले गुप्त जाळे पसरवले असून, गणवेशाविना बंदूकधारी शार्पशूटरांच्या माध्यमातून शत्रूंना संपवण्याचा कट रचत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. स्वीडनच्या राष्ट्रीय प्रसारक SVT च्या एका माहितीपटातून उघडकीस आले आहे की, इराण सरकार युरोपातील धोकादायक गुन्हेगारी टोळ्यांना पैसे आणि समर्थन देत आहे, जेणेकरून ते इराणविरोधकांना लक्ष्य करू शकतील.
SVT च्या या स्फोटक माहितीपटात दावा करण्यात आला आहे की, इराणच्या गुप्तचर संस्थांनी स्वीडनमधील फॉक्सट्रॉट टोळीशी संपर्क केला, आणि त्यांच्या प्रमुख रवा माजिद ऊर्फ ‘कुर्दिश फॉक्स’ ला थेट दोन पर्याय दिले. तुरुंगवास की शत्रूंच्या हटवण्यासाठी इराण सरकारसाठी काम! माजिदने दुसरा पर्याय स्वीकारत स्टॉकहोममधील इस्रायली दूतावासावर ग्रेनेड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हल्ला यशस्वी झाला नाही, परंतु या घटनेने इराणच्या धोकादायक हेतूंवर शिक्कामोर्तब केले.
या खुलास्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते इराण आता पारंपरिक युद्ध किंवा सायबर हल्ल्यांपलीकडे जाऊन टोळी युद्धाच्या मार्गाने शत्रूंना लक्ष्य करत आहे. या टोळ्यांमध्ये स्वीडनमधील फॉक्सट्रॉट, क्रीप्स, वुल्व्स यांसारख्या संघटनांचा समावेश आहे. त्यांच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये गोळीबार, बॉम्बस्फोट, अपहरण आणि खून यांचा समावेश असून, किशोरवयीन मुलांनाही गुन्ह्यांसाठी भाड्याने वापरले जाते. विशेष म्हणजे, या टोळ्यांचे नेटवर्क केवळ लॉरेन्स बिश्नोईसारख्या भारतातील गुंडांपेक्षा व्यापक आणि अधिक राजकीयदृष्ट्या गुंतलेले आहे. स्वीडनमध्ये SVT च्या मते सुमारे 14,000 जण या टोळ्यांशी थेट जोडलेले आहेत, तर 48,000 हून अधिक लोक अप्रत्यक्षपणे या जाळ्यात अडकले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इस्रायल-इराण संघर्षात ‘Cluster Bomb’चा वापर? जाणून घ्या अणुबॉम्बपेक्षा किती धोकादायक, कोणत्या देशांकडे आहे शस्त्रसाठा
या कटाचा मुख्य उद्देश इराण इंटरनॅशनल नावाच्या लंडनस्थित चॅनेलच्या पत्रकारांवर हल्ला करणे हे आहे, कारण हे माध्यम इराणी सरकारविरोधातील रिपोर्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय, इस्रायली दूतावास, ज्यू धार्मिक स्थळे (सिनेगॉग्स), आणि इराणमधून निर्वासित झालेले राजकीय कार्यकर्ते हे देखील संभाव्य लक्ष्य आहेत. याआधीही या पत्रकारांना सायबर हल्ले, फोन टॅपिंग आणि धमक्या मिळत होत्या, मात्र आता प्रकरण थेट हत्येपर्यंत पोहोचले आहे.
इराणच्या ‘MOIS’ (Ministry of Intelligence and Security) आणि ‘IRGC’ (Islamic Revolutionary Guard Corps) यांसारख्या गुप्तचर यंत्रणा या कारवायांचे नियोजन करत असल्याचेही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. युरोपातील पाश्चिमात्य गुप्तचर यंत्रणांना याचा सुगावा लागला असून, स्वीडन आणि युकेमध्ये विशेष गुप्त चौकशी सुरू झाली आहे.
या प्रकरणाने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवा ट्रेंड निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राजकीय हेतूंनी प्रेरित सरकारं आता अंडरवर्ल्डचा वापर करून स्वतःची अंमलबजावणी यंत्रणा निर्माण करत आहेत. यामुळे युरोपमध्ये राजकीय हत्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel- Iran War: भारतासाठी दिलासादायक बातमी! इराणने हवाई क्षेत्र केले खुले; Operation Sindhu’द्वारे 1000 भारतीय मायदेशी परतणार
इराणचा हा गुप्त कट केवळ पत्रकारितेवरचा हल्ला नाही, तर लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांची पायमल्ली आहे. SVT च्या या धक्कादायक अहवालामुळे युरोपातील सुरक्षेचे अलार्म वाजू लागले असून, इराणविरोधात अधिक कठोर उपाययोजना होण्याची शक्यता आहे. यासह, हे उदाहरण अंडरवर्ल्डचा वापर करून राष्ट्रकीय ध्येय साध्य करण्याच्या नवी पद्धतीचा गंभीर इशारा आहे.