Israel bomb attacks on Yemen’s Hodeidah port after attack near Tel Aviv
जेरुसेलम: इस्रायलने येमेनच्या हुथी बंडखोरांवर सोमवारी (05 मे) जोरदार हवाई हल्ले केले आहेत. हुथींच्या विद्रोही गटाने दिलेल्या माहितीनुसार अमेरिका आणि इस्रायलने येमेनेच्या लाल समुद्रातील होदेदा बंदराला लक्ष्य करत सहा बॉम्ब हल्ले केले. तर इतर काही हल्ले होदेदा प्रांताच्या इतर प्रदेशांतील सिमेंट कारखान्यांवर केले आहेत. याच्या एक दिवस आधी हुथींनी इस्रायलच्या प्रमुख विमानतळावर केलेल्या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर इस्रायली सैन्याने दिले आहे.
एक दिवसापूर्वी इराण समर्थित हुथी बंडखोरांना इस्रायलयच्या प्रमुख बेन गुरियन विमानतळावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली होती. यामध्ये सहाजण जखमी झाले होते. या हल्ल्यामुळे विमानतळावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तातडीने सुरक्षा मंत्रालयाची बैठक बोलवली होती. बेंजामिन नेतन्याहू यांनी संतप्त होत, हुथींना या हल्ल्याचे लवकरच योग्य उत्तर देण्यात येईल असे म्हटले होते.
इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुथी विद्रोही सतत इस्रायल आणि त्यांच्या नागरिकांवर हल्ले करत आहे. यामुळे या हल्ल्यांचे प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने बॉम्ब हल्ले केले आहेत. यामध्ये ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्रे देखील डागण्यात आली आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, इस्रायलने होदेदा बंदरावर 10 हून अधिक हल्ले केले आहे. तसेच होदेदा शहराच्या सिमेंट कारखान्यावर चार हल्ले करण्यात आले आहेत. लाल समुद्रावरील होदेदा बंदर हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर आहे. या बंदरावरुन येमेनच्या 80% खाद्य आयात केली जाते.
हुथी बंडखोरांनी इस्रायलच्या बेन गुरियन आंतरराष्ट्री विमानतलावर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर प्रवासी वाहतूक सेवा थांबवण्यात आली होती. हल्ल्याच्या काही तासानंतर हवाई वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली. हल्ल्यामुळे अनेक उड्डाणे रद्द झाली होती. बेन गुरियन विमानतळावरी हल्ला हा इस्रायली कॅबिनेटच्या गाझा पट्टीला ताब्यात घेण्याच्या आणि यासाठी प्लॅन सादर करण्याच्या काही तास आधी करण्यात आला होता.
दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराण समर्थित हुथी बंडखोरांच्या बेन गुरियन विमानतळावरी हल्ल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. नेतन्याहूंनी या हल्ल्याचा बदला घेण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. तसेच हुथींनी इस्रायलवरील हल्ले न थांबवल्यास आम्हीही असेच हल्ले करत राहू असे त्यांनी म्हटले आहे.
इस्रायल-हमासचे गाझामध्ये युद्ध सुरु झाल्यापासून हुथी बंडखोरांनी याचा निषेध केला आहे. तसेच हुथींनी लाल समुद्रातील इस्रायलच्या समुद्री जहाजांना अनेक वेळा लक्ष केले आहे. यामुळे नेतन्याहूंनी यापूर्वीही हुथींना हल्ले थांबवण्याचा इशारा दिला होता.