Israeli army starts Gaza ground operation minister warns of devastation
जेरुसलेम : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामानंतर शांततेचा कालावधी संपुष्टात आला असून इस्रायलने पुन्हा एकदा गाझा पट्टीवर मोठ्या प्रमाणावर हल्ला चढवला आहे. बुधवारी (19 मार्च 2025) इस्रायली हवाई हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी, इस्रायली सैन्याने गाझामध्ये जमिनीवरील लक्ष्यित कारवाई सुरू केली, ज्यामुळे उत्तर आणि दक्षिण गाझामधील बफर झोन तयार केला जात आहे.
इस्रायली संरक्षण दलाने (IDF) स्पष्ट केले आहे की गाझा पट्टीतील सुरक्षा क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी त्यांनी मध्य आणि दक्षिण गाझामधील जमिनीवरील हालचालींना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या ग्राउंड ऑपरेशन्सच्या अंतर्गत नेत्झारिम कॉरिडॉरवरील सैन्य नियंत्रण वाढवण्यात आले आहे, ज्यामुळे उत्तर आणि दक्षिण गाझामधील संपर्क थोड्या प्रमाणात खंडित झाला आहे.
इस्रायली सैन्याच्या म्हणण्यानुसार, गोलानी ब्रिगेड दक्षिण कमांड क्षेत्रात तैनात राहणार असून ती गाझामधील ऑपरेशन्ससाठी तयार असेल. इस्रायल राज्याच्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी, IDF गाझामधील दहशतवादी संघटनांविरुद्ध कठोर कारवाई करत राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सुनीता विल्यम्स भारतात कधी येणार? कुटुंबीयांनी दिली मोठी माहिती
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅटझ यांनी गाझातील नागरिकांना शेवटचा इशारा देताना, हमासला सत्तेवरून हटवण्याची सूचना केली आहे. एका व्हिडिओ संदेशात त्यांनी म्हटले की, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला सल्ला माना, हमासने ओलिस ठेवलेल्या सर्व इस्रायली नागरिकांना परत द्या आणि हमासला सत्तेवरून हटवा.”
कॅट्झ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “गाझानवासीयांपुढे दोनच पर्याय आहेत – एकतर त्यांनी हमासविरोधात उभे राहावे आणि इस्रायली ओलीस सोडवण्यासाठी दबाव टाकावा, अन्यथा त्यांना गाझा सोडून इतर देशात जाण्याचा विचार करावा.”
गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यातील तणाव वाढत चालला होता. जानेवारी 2025 मध्ये युद्धविराम जाहीर करण्यात आला होता, परंतु त्यानंतर काही काळ शांतता राहिल्यानंतर इस्रायलने पुन्हा एकदा पॅलेस्टिनी प्रदेशावर जोरदार हल्ला केला आहे. या नवीन ऑपरेशनमुळे गाझामध्ये स्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः, गाझामध्ये अडकलेल्या लाखो नागरिकांसाठी परिस्थिती अत्यंत संकटमय बनली आहे. इस्रायली सैन्याने केलेल्या कारवाईमुळे अनेक नागरिक स्थलांतरित होत आहेत, तर अनेकांना पुरवठ्याचा तुटवडा भासत आहे.
या संघर्षावर आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले गेले असून, काही देशांनी इस्रायलवर संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे आणि हमासविरोधात कठोर पावले उचलण्याचे समर्थन केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघ आणि काही युरोपीय देशांनी या नवीन संघर्षामुळे निर्माण झालेल्या मानवीय संकटाकडे लक्ष वेधले आहे आणि युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘या’ मुस्लिम देशात होणार सत्तापालट; हजारो आंदोलक खलिफाच्या विरोधात उतरले रस्त्यावर
गाझामध्ये सुरू असलेले इस्रायली सैन्याचे ग्राउंड ऑपरेशन आणि संरक्षण मंत्र्यांनी दिलेला कठोर इशारा, यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. इस्रायलने गाझातील सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलले असून, त्याचा थेट परिणाम पॅलेस्टिनी नागरिकांवर होणार आहे.