Sogaku Taguchi: 12 वर्षे जगाशी संपर्क नाही! जपानी बौद्ध भिक्षू सोगाकु तागुची यांची क्योटोच्या पर्वतावर अंगावर काटा आणणारी कठोर तपश्चर्या
आधुनिक जगात जिथे माणूस एका क्षणासाठीही स्मार्टफोन, इंटरनेट आणि सोशल मीडियापासून दूर राहू शकत नाही, तिथे जपानमधून आध्यात्मिक साधनेचे एक अत्यंत अद्भूत आणि तितकेच थरारक उदाहरण समोर आले आहे. जपानमधील ३१ वर्षीय बौद्ध भिक्षू सोगाकु तागुची यांनी पुढील १२ वर्षांसाठी जगाशी असलेला सर्व संपर्क तोडून एकांतवासात जाण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. क्योटो शहराच्या ईशान्येकडे असलेल्या पवित्र हिएई पर्वतावरील ऐतिहासिक एनर्याकुजी मंदिराच्या समाधी परिसरात तागुची यांनी स्वतःला पूर्णपणे विलगीकृत केले आहे. ११ सप्टेंबर २०३८ पर्यंत त्यांचा बाह्य जगाशी किंवा कोणत्याही मानवाशी कसलाही संपर्क राहणार नाही.(Enryakuji)
सोगाकु तागुची यांची ही अत्यंत कठीण आणि कसोटी पाहणारी साधना तेंडाई बौद्ध परंपरेतील ‘जिशिन’ (Jishin) बनण्यासाठी आहे. ‘जिशिन’ याचा अर्थ ‘खरा निरीक्षक’ किंवा संन्यासी असा होतो. तेंडाई बौद्ध धर्माचे संस्थापक सायझो (Dengyo Daishi) यांच्या पवित्र समाधीची सेवा आणि देखभाल करण्यासाठी समर्पित असणाऱ्या भिक्षूला हे पद दिले जाते. हे पद आणि जबाबदारी मिळवणे सोपे नसून, यासाठी भिक्षूला आपल्या आयुष्याची १२ वर्षे संपूर्ण विजनवासात, मानवी वस्तीपासून दूर आणि अत्यंत बिकट परिस्थितीत घालवावी लागतात.
या १२ वर्षांच्या काळात सोगाकु तागुची यांना दररोज एका अत्यंत कडक आणि वेळापत्रकानुसार बांधलेल्या नित्यक्रमाचे पालन करावे लागणार आहे. दररोज सूर्योदयाच्या आधी उठून स्वतः अन्न शिजवणे आणि ते बुद्ध व सायझो यांच्या समाधीसमोर अर्पण करणे, हे त्यांचे प्राथमिक कर्तव्य असेल. यानंतर त्यांना सलग अनेक तास बौद्ध मंत्रांचा उच्चार करावा लागेल. सर्वात कठीण गोष्ट म्हणजे, बुद्धमूर्तीसमोर दररोज तब्बल ३,००० वेळा साष्टांग नमस्कार घालणे हे त्यांच्या साधनेचे प्रमुख अंग आहे.
या अत्यंत कठोर शारीरिक परिश्रमासोबतच त्यांना रोज रात्री केवळ २ ते ३ तासांचीच झोप मिळेल. अशी मान्यता आहे की, अशा प्रकारच्या निद्रानाशाच्या आणि शारीरिक दमावणुकीच्या स्थितीत भिक्षूला बुद्धाचे प्रत्यक्ष आणि स्पष्ट दर्शन होते. याशिवाय समाधी परिसर आणि आजूबाजूच्या बागेची स्वच्छता राखणे ही देखील त्यांचीच जबाबदारी असेल, जिथे बागेत झाडाचे एकही वाळलेले पान शिल्लक राहू दिले जात नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Trolls UN: इराण गॉट नो चिल! ‘या’ भन्नाट ‘शोले’मधील ‘ठाकूर’ च्या मीमने संयुक्त राष्ट्रांना सोशल मीडियावर केले जोरदार ट्रोल
हिएई पर्वतावर हिवाळ्यात पडणारी तीव्र आणि गोठवणारी थंडी या तपश्चर्येला अधिकच भयानक बनवते. ही साधना इतकी अत्यंत कष्टप्रद आणि शारीरिक क्षमतेची पराकाष्ठा पाहणारी आहे की, इतिहासकाळात अनेक भिक्षू १२ वर्षांचा हा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच तीव्र आजारपण किंवा शारीरिक थकव्यामुळे मृत्युमुखी पडले आहेत.
या ऐतिहासिक परंपरेची अधिकृत नोंद सन १६९९ पासून ठेवली जात आहे. तेव्हापासून आजपर्यंत हे खडतर आव्हान स्वीकारणारे सोगाकु तागुची हे ११८ वे ‘जिशिन’ ठरणार आहेत. विशेष म्हणजे, गेल्या ८० वर्षांत ही १२ वर्षांची कठोर पर्वत साधना सुरू करणारे तागुची हे केवळ आठवे व्यक्ती आहेत, यावरूनच या साधनेच्या कठीणतेचा अंदाज येतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kaveri Engine Russia: भारताच्या स्वदेशी ‘कावेरी’ इंजिनचा रशियात थरार; चाचणीत मिळवला तब्बल 48.5 kN थ्रस्ट अन् जोरात शक्ती प्रदर्शन
हिएई पर्वत हा केवळ या १२ वर्षांच्या एकांतवासासाठीच नाही, तर ‘काइहोग्यो’ (Kaihogyo) नावाच्या एका प्रसिद्ध आणि भयंकर साधनेसाठीही ओळखला जातो. काइहोग्यो साधनेत भिक्षूंना ७ वर्षांच्या कालावधीत एकूण १,००० दिवस पर्वताभोवती प्रदक्षिणा घालावी लागते. सुरुवातीच्या तीन वर्षांत दररोज १९ मैल (सुमारे ३० किमी) चालणे बंधनकारक असते. पाचवे वर्ष सर्वात कठीण मानले जाते, ज्यात सलग २०० दिवस दररोज १९ मैल चालावे लागते. तर सातव्या वर्षी १०० दिवस रोज ५२ मैल (सुमारे ८३ किमी) चालण्याची अट असते.
या प्रक्रियेदरम्यान ‘दोइरी’ (Dōri) नावाचा एक भयानक टप्पा येतो. या ९ दिवसांच्या काळात भिक्षू अजिबात अन्न खात नाहीत, पाणी पीत नाहीत, झोपत नाहीत आणि साधे आडवेही होत नाहीत. ही साधना पूर्ण करणारे भिक्षू बौद्ध जगात जिवंत बुद्ध मानले जातात. तागुची यांची १२ वर्षांची पर्वत समाधी साधना ही याच अत्यंत उच्च अध्यात्माचा आणि आत्मसमर्पणाचा एक भाग आहे.






