खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे याचा पाकिस्तानात मृत्यू, जर्नेलसिंग भिंडरावालेचा होता पुतण्या

खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडेचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाला. ते जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचा पुतण्य़ा होता. मिळालेल्या माहितीनुसार रोडे यांचे २ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

    खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे यांचा पाकिस्तानमध्ये २ डिसेंबर रोजी मृत्यू (Khalistani Terrorist Lakhbir Singh Rode Died) झाल्याची माहिती समोर येत आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तो खलिस्तानी दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा पुतण्या होता. रोडे यांच्यावर गुप्तपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. शीख प्रथा आणि परंपरेनुसार रोडे यांच्यावर पाकिस्तानात गुप्तपणे अंत्यसंस्कार करण्यात आले.

    भारताविरोधी कारवाईमध्ये सहभागी

    रोडे हा पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआयच्या सहकार्याने भारताविरोधात काम करत होता. पंजाबमध्ये भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. तो बंदी घातलेल्या संघटनेचे इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन (ISYF) प्रमुख होता. त्याला भारत सरकारने दहशतवादी घोषित केलं होतं. एनआयएनं ऑक्टोबरमध्ये एनआयएने (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) पंजाबमधील मोगा येथे छापा टाकून रोडे यांची मालमत्ता जप्त केली होती. एनआयए 2021 ते 2023 दरम्यान दहशतवादाशी संबंधित कारवायांमध्ये सक्रिय सहभागासाठी रोडे यांच्याविरुद्ध सहा प्रकरणांचा तपास करत आहे. 

    कोण आहे लखबीर सिंग रोडे 

    लखबीर सिंग रोडे यांच कुटुंब कॅनडामध्ये आहे. तो मूळचा पंजाबमधील मोगा येथील रोडे गावचा रहिवासी होता. यापूर्वी तो दुबईला पळून गेला होता. नंतर पाकिस्तानात गेला. त्याने आपल्या कुटुंबाला कॅनडामध्ये ठेवलं. 2002 मध्ये भारताने पाकिस्तानला 20 दहशतवाद्यांची यादी सादर केली होती आणि त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. रोडे यांचेही नाव त्यात होतं. केंद्र सरकारच्या दस्तऐवजानुसार, “ISYF ने यूके, जर्मनी, कॅनडा आणि यूएस मध्ये विविध ठिकाणी आपल्या शाखा उघडल्या आहेत. पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी आणि व्हीव्हीआयपी आणि राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी सीमेपलीकडून शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांची खेप भारतात पाठवण्याचं काम तो करत होता. अलीकडच्या काळात त्याच्यावर पंजाबमध्ये हल्ले करण्यासाठी गुंडांची भरती केल्याचा आरोप होता.