मायणी–मल्हारपेठ रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे चार महिन्यात उघड झाले (फोटो - टीम नवराष्ट्र)
Satara News : उंब्रज : अनिल कदम : ४८० कोटी रुपये खर्चून बांधल्या जात असलेल्या पाटण पंढरपूर मार्गाच्या निकृष्ट कामाचे पितळ अवघ्या चार महिन्यात उघडे पडले असून ठिकठिकाणी रस्ते खराब व्हायला सुरुवात झाली आहे. ठेकेदार कंपनीच्या निकृष्ट रस्ते उखडू लागले असून वाहनधारकांच्या जीवाला घोर लागला आहे. संथ गतीने सुरू असलेल्या या कामाने रस्त्यांच्या दुतर्फा असणारी शेकडो गावेही हैराण झाली आहेत. स्थानिकांच्या तक्रारी डावलून ठेकेदार कंपनी व प्रशासनाकडून (Maharashtra News) राजरोसपणे काम सुरू असल्याने संपूर्ण कारभारावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सातारा जिल्ह्यातील मायणी ते मल्हारपेठ रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम काही महिन्यांपासून सुरू आहे. योग्य नियोजन न करता सुरुवातीच्या टप्यात हजारो जुनी झाडे तोडल्याने भक्कास चित्र निर्माण झाले आहे. कराड तालुक्यातील मसूर ते चरेगाव या हद्दीत घाईगडबडीत काम आटोपण्याचा प्रयत्न सुरू असून काही महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आलेल्या मायणी–मल्हारपेठ राज्य मार्गावरील सिमेंट काँक्रेट रस्त्याची काम पुर्ण होण्यापूर्वीच दयनीय अवस्था झाल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे. ठेकेदाराने शासकीय मापदंड धाब्यावर बसवून काम केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
हे देखील वाचा : MNS राज ठाकरेंचा महिला आरक्षण अन् मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा की विरोध? स्पष्ट केली भूमिका
रस्त्यावर ठिकठिकाणी तडे जाणे, सिमेंट उखडणे, खड्डे पडणे अशी स्थिती निर्माण झाली आहे. वडोली भिकेश्वर परिसरातील पुलाजवळ पडलेला मोठा खड्डा अपघाताला आमंत्रण देत आहे. “एखादा जीव गेल्यावरच अधिकारी जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, वाघेश्वर गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या आरसीसी गटाराच्या कामातही मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आली आहे.
प्रत्यक्ष पाहणीत स्टील बारमधील अंतर 10 ते 12 इंच असल्याचे दिसून आले असून, हे तांत्रिक निकषांच्या पूर्णपणे विरोधात असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. वापरले जाणारे साहित्य आणि बांधकामाची पद्धतही अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, येणाऱ्या पावसाळ्यात हे गटार वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
या रस्त्याच्या परस्थितीवर चरेगावचे सरपंच देवदत्त माने यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “पाटण – पंढरपूर राज्य मार्गाच्या रूंदीकरणाच्या कामात कोणत्माही प्रकारे सुरक्षिततेचा विचार केला गेलेला नाही. जिथे लोकवस्ती आहे तिथे गटरची सुविधा द्यावी. चरेगाव हद्दीत रोडला लागून हायस्कूल आहे. तिथे हजारो विद्यार्थी रस्त्याने चालत येतात. हायस्कूल परिसरात फुटपाथची गरज आहे. जेणेकरून विद्यार्थी, शेतकरी महिला, व स्थानिक फुटपाथवरुन येजा करतील. रुंदीकरणानंतर वाहनांचे स्पीड वाढणार आहे. मात्र जिथे जंक्शन स्टाॅप आहेत तिथे सुरक्षेच्या दृष्टीने सर्कल, डिव्हायडर केलेले नाहीत. या सर्व बाबी संबंधित यंत्रणेचा निदर्शनासही आणून दिल्या आहेत मात्र कोणतीही दखल घेतली जात नाही त्यामुळे भविष्यात भयंकर अपघातांचा सामना करावा लागणार आहे. चरेगाव हद्दीत अनेक ठिकाणी गाव खाली व रस्ता चढावर अशी परिस्थिती आहे. संबंधितांकडून त्यांच्या सोयीनुसार काम चालू असून कुणाचेही म्हणणे ऐकून घ्यायला ठेकेदार व त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी तयार नाहीत.”
हे देखील वाचा : सत्ताधाऱ्यांची चार तास कोंडी; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात ‘एकजूट’
ग्रामस्थांचा संताप
शिवडे येथील ग्रामस्थ संदीप घाडगे म्हणाले की, रस्त्याच्या कामात निर्माण झालेल्या त्रुटी सांगायच्या कुणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणतेही शासकीय अधिकारी फोन उचलत नाहीत. स्थळ पाहणीसाठी बोलावले असता टाळाटाळ केली जाते. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा रस्ता इतक्या निकृष्ट दर्जाचा आहे की एक वर्षही टिकणार नाही. सर्व अधिकारी एकमेकांना सामील असल्याचा संशय आहे. जागोजागी पॅच मोकळे सोडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. एखादा जीव गेल्यास आम्ही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
तर या दुरावस्थेबाबत अभियंता धुमाळ म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या मल्हारपेठ ते मायणी रस्त्याचे कखम EBC अंतर्गत असून शासनाकडून L.L. मालविया यांची देखभालसाठी नेमणूक करण्यात आली आहे. स्थानिक अडचणींसाठी शाखा अभियंता कोकरे हे सहकार्य करतात. सातारा बांधकाम विभागाची भूमिका केवळ स्थानिक अडचणी दूर करण्यापुरती आहे.
अपघात झाल्यास जबाबदार कोण?
महिन्यातच रस्ता खराब होण्यामागे जबाबदार कोण असा सवाल निर्माण झाला असून गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा कुठे आहे? प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात संगनमत आहे का? अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या कामाची तात्काळ तांत्रिक चौकशी करून
संबंधित अभियंता व ठेकेदारांवर कारवाई करावी. निकृष्ट काम पुन्हा करून दर्जेदार बांधकाम व्हावे तसेच स्वतंत्र गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेने लक्ष घालणे गरजेचे आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अनेक गावांतील ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तरी जागे होऊन ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.






