Khamenei warned the U.S. of rare retaliation calling the strike unprovoked war
US bombing Iran : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आता धोकादायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इराणने तीव्र प्रतिक्रिया दिली असून, सर्व अमेरिकन नागरिक आणि लष्करी कर्मचारी हे आमचे लक्ष्य ठरतील, असा थेट इशारा दिला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी स्वतः बदला घेण्याची शपथ घेतली असून, यामुळे पश्चिम आशियातील तणाव अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी अमेरिकेच्या कारवाईनंतर म्हटले, “अमेरिकेने इराणच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करून मोठा गुन्हा केला आहे. आता अमेरिकन नागरिकांनी पूर्वीपेक्षा अधिक नुकसान आणि धक्क्याची अपेक्षा ठेवावी.” खामेनी यांच्या या वक्तव्यामुळे इराण थेट युद्धाच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी इराणच्या सरकारी माध्यमांनी अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी देत म्हटले की, “आता पश्चिम आशियातील प्रत्येक अमेरिकन हे आमचे लक्ष्य आहे.” चॅनेलवर दाखवण्यात आलेल्या ग्राफिकमध्ये अमेरिकेच्या तळांचे स्थान आणि संभाव्य हल्ल्यांची माहितीही देण्यात आली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घोषणा केली की, अमेरिकेने इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन अणुस्थळांवर हवाई हल्ले केले आहेत. ट्रम्प म्हणाले की, “हे आमच्यासाठी, इस्रायलसाठी आणि संपूर्ण जगासाठी ऐतिहासिक क्षण आहे.” फोर्डो हे अणुशक्ती संवर्धनासाठी महत्त्वाचे केंद्र असून, भूमिगत संरक्षणयुक्त बनावट संरचनेमध्ये वसले आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे या अणु प्रकल्पांचे किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप इराणने जाहीर केलेली नाही. मात्र, इराणी माध्यमांचे म्हणणे आहे की, हल्ल्याआधीच हे स्थळे रिकामी करण्यात आली होती.
JUST IN: Iranian state television displays a graphic of U.S. bases in the Middle East titled: “Within the fire range of Iran.”
“Mr. Trump, you started it, and we will end it.” pic.twitter.com/8eculMnwAG
— Collin Rugg (@CollinRugg) June 22, 2025
credit : social media
खामेनींचे प्रतिनिधी हुसेन शरीयतमदारी यांनी थेट कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले, “आता वेळ आली आहे की आपण अमेरिकन नौदलावर क्षेपणास्त्र हल्ला करू, विशेषतः बहरीनमधील ताफ्यावर. तसेच, होर्मुझची सामुद्रधुनी अमेरिकन, ब्रिटिश, फ्रेंच आणि जर्मन जहाजांसाठी बंद करावी.” तेहरानमध्ये अशा मागण्यांनी लष्करी वातावरण गडद होत आहे.
इस्रायलने देखील सतर्कतेचा स्तर वाढवला असून, इस्रायली हवाई क्षेत्र तात्पुरते बंद करण्यात आले आहे. इस्रायल लष्कराने दावा केला आहे की, या हल्ल्यांमुळे इराणी अणुशक्ती प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे. इस्रायली सूत्रांचे म्हणणे आहे की, इराणच्या अणु कार्यक्रमाविरोधात कारवाईची ही सुरूवात आहे आणि भविष्यात आणखी मोठी लष्करी मोहीम होण्याची शक्यता आहे. १३ जूनपासून इस्रायल आणि इराणमधील संघर्ष अधिक उघड झाला आहे, आणि आता त्यात अमेरिकेच्या सहभागाने स्थिती अधिक गंभीर झाली आहे.
इराण व अमेरिका यांच्यातील संबंध आता केवळ शाब्दिक युद्धापुरते उरलेले नाहीत. अणु प्रकल्पांवर थेट हल्ला आणि बदला घेण्याच्या इराणी घोषणांमुळे संपूर्ण पश्चिम आशियात युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे. खामेनींच्या इशाऱ्यांनंतर जगाच्या अनेक देशांनीही परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवायला सुरुवात केली आहे. पुढील काही दिवस या संघर्षात निर्णायक ठरू शकतात.