
Lahore Air Pollution : जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर पुन्हा लाहोर; AQI 465 वर, नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका
Lahore Air Pollution : पाकिस्तानमधील लाहोर शहर पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे. शुक्रवारी (20 नोव्हेंबर) सकाळी 7 ते 8 या वेळेत लाहोरचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) तब्बल 465 वर पोहोचला. हवेतील प्रदूषणाची ही पातळी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानली जात आहे. वाढत्या प्रदूषणामुळे लाहोरमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
लाहोरसोबतच पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील इतर शहरांमध्येही वायुप्रदूषणाची स्थिती चिंताजनक आहे. सरगोधा येथे 289, सियालकोटमध्ये 232, रहीम यार खानमध्ये 228, तर बहावलपूरमध्ये 198 इतका AQI नोंदवण्यात आला.
पाकिस्तानमधील ‘डॉन’ वृत्तपत्राच्या अहवालानुसार, पंजाबमधील अनेक शहरांमध्ये हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. या प्रदूषणाचा सर्वाधिक धोका लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच श्वसन आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींना आहे.
प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडणे टाळण्याचा, खिडक्या बंद ठेवण्याचा आणि बाहेर जाताना संरक्षक मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. घरामध्ये एअर प्युरिफायर वापरण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. हवेतील अतिसूक्ष्म पीएम २.५ कणांचा दीर्घकाळ संपर्क आल्यास श्वसन आणि हृदयविकारांचा धोका वाढू शकतो.
पंजाब सरकारकडून प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. विशेषतः नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वीटभट्ट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईनंतरही हवेच्या गुणवत्तेत अपेक्षित सुधारणा झालेली नाही.
पंजाब पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदल विभागाच्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी ते 18 नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील वीटभट्ट्यांची तब्बल 84 हजार 370 वेळा तपासणी करण्यात आली. या कारवाईत 1 हजार 429 वीटभट्ट्या पाडण्यात आल्या, तर 968 वीटभट्ट्या सील करण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 1 हजार 248 एफआयआर दाखल करण्यात आले. तसेच संबंधितांकडून 17.8 कोटी पाकिस्तानी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पाकिस्तान एअर क्वालिटी इनिशिएटिव्हच्या (PAQI) मागील महिन्यातील अहवालात वायुप्रदूषणाचे गंभीर परिणाम समोर आले होते. या अहवालानुसार, प्रदूषणामुळे पाकिस्तानमधील नागरिकांचे सरासरी आयुर्मान सुमारे 3.9 वर्षांनी कमी होत आहे. दरवर्षी जवळपास 1.28 लाख लोकांचा अकाली मृत्यू होत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
वायुप्रदूषणामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा आर्थिक भार पडत आहे. हा भार देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (GDP) सुमारे 6.5 टक्क्यांइतका असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, लाहोरमधील नागरिकांचे आयुर्मान प्रदूषणामुळे सात वर्षांपर्यंत कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
‘अनव्हीलिंग पाकिस्तान्स एअर पोल्युशन : अ नॅशनल लँडस्केप रिपोर्ट ऑन हेल्थ रिस्क्स, सोर्सेस अँड सोल्युशन्स’ या अहवालात पाकिस्तानमधील विविध भागांतील प्रदूषणाच्या स्रोतांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे.
या अहवालानुसार, लाहोरमधील पीएम 2.5 कणांचे वार्षिक सरासरी प्रमाण प्रति घनमीटर 110 मायक्रोग्रॅमपेक्षा अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वार्षिक मार्गदर्शक मर्यादेपेक्षा हे प्रमाण 22 पटींहून अधिक आहे.
लाहोरमधील प्रदूषणासाठी वाहतूक क्षेत्र सर्वाधिक जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यानंतर औद्योगिक क्षेत्राचा 28 टक्के, तर वीटभट्ट्यांचा 17 टक्के वाटा आहे. हिवाळ्यातील हवामानविषयक परिस्थितीमुळे प्रदूषित हवा जमिनीजवळ साचून राहते आणि प्रदूषणाची समस्या आणखी गंभीर बनते.
Ans: पाकिस्तानमधील लाहोर शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले असून तेथील AQI 465 नोंदवण्यात आला आहे.
Ans: सरगोधा, सियालकोट, रहीम यार खान आणि बहावलपूर या शहरांमध्येही हवेची गुणवत्ता खालावली आहे.
Ans: वाहतूक क्षेत्र हे प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. याशिवाय औद्योगिक कारखाने आणि वीटभट्ट्यांमधून होणारे उत्सर्जनही प्रदूषण वाढवते.