Largest snake ever India's Vasuki or Colombia's Titanoboa
Vasuki Indicus vs Titanoboa : साप म्हणजेच नाग हे नाव ऐकले तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. पण कल्पना करा, जर सापाची लांबी १५ मीटर आणि वजन तब्बल १ टनाच्या आसपास असेल तर? हो, अशा महाकाय सापांचा अस्तित्व खरोखरच पृथ्वीवर होता आणि त्यांच्यात सर्वात मोठा कोण होता, यावर सध्या वैज्ञानिक वर्तुळात चर्चा सुरू आहे. भारताच्या गुजरातमधून सापडलेला ‘वासुकी इंडिकस’ आणि कोलंबियामध्ये सापडलेला ‘टायटानोबोआ सेरेजोनेन्सिस’ या दोन प्राचीन सर्प प्रजातींच्या तुलनेत कोणता खरा “सर्प सम्राट” होता, यावर आता प्रकाश पडू लागला आहे.
सुमारे ५८ ते ६० दशलक्ष वर्षांपूर्वी पॅलेओसीन युगात, कोलंबियामधील सेरेजोन दलदलीत एक भव्य साप वावरत होता टायटानोबोआ सेरेजोनेन्सिस. २००९ मध्ये या सापाचे जीवाश्म सेरेजोन कोळसा खाणीमध्ये सापडले आणि जगात खळबळ उडाली. सुरुवातीला हे मगराचे अवशेष आहेत, असे समजले गेले. पण जेव्हा त्याचे विश्लेषण झाले, तेव्हा उघड झाले की हा जीव म्हणजे पृथ्वीवरचा सर्वात मोठा साप होता.
या टायटानोबोआची लांबी सुमारे १५ मीटर (५० फूट) इतकी होती आणि त्याचे वजन १.२५ टन होते. हे वजन आणि लांबी ही दोन्ही आजच्या कोणत्याही वाहनाच्या तुलनेत मोठी आहेत. टायटानोबोआ विषारी साप नव्हता, पण तो शिकार गुदमरून मारण्याचे तंत्र वापरत असे. तो बोआ आणि अॅनाकोंडा यांच्याशी संबंधित होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ब्राझीलने भारताला दिला मोठा झटका! ‘Akash Missile System’ची खरेदी रद्द; काय आहे कारण?
टायटानोबोआसारखा दुसरा महाकाय साप भारताच्या गुजरातमधील पनाध्रो लिग्नाइट खाणीत सापडला. २००५ मध्ये येथे २७ मोठे कशेरुक सापडले, जे सुरुवातीला मगरीचे असल्याचे गृहित धरले गेले. पण तब्बल नऊ वर्षांच्या सखोल अभ्यासानंतर, वैज्ञानिकांनी सांगितले की हे अवशेष एका अज्ञात सापाच्या प्रजातीचे आहेत.
या सापाचे नाव ‘वासुकी इंडिकस’ ठेवण्यात आले हिंदू पुराणांमधील शिवाच्या गळ्यातील नागराज वासुकीवरून. वासुकी सुद्धा १५ मीटर लांब आणि १ टन वजनाचा असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. वासुकी आणि टायटानोबोआ दोघेही आकाराने जवळपास सारखे आहेत, मात्र वजनाच्या बाबतीत टायटानोबोआ थोडा मोठा ठरतो.
दोघांचे तुलनात्मक निरीक्षण करताना हे लक्षात येते की:
1. लांबी: दोघेही १५ मीटरपर्यंत वाढू शकतात.
2. वजन: टायटानोबोआ – १.२५ टन | वासुकी – १ टन
3. काळ: टायटानोबोआ – ५८-६० दशलक्ष वर्षांपूर्वी | वासुकी – ४७ दशलक्ष वर्षांपूर्वी
4. ठिकाण: टायटानोबोआ – कोलंबिया | वासुकी – भारत (गुजरात)
यावरून एक गोष्ट निश्चित दिसते की, टायटानोबोआला वजनात थोडा अधिक टोक मिळतो, पण वासुकीही काही कमी नाही. हे दोघेही आपापल्या काळातील उत्क्रांतीच्या शिखरावर होते. त्यांचा आकार, शरीराची रचना आणि जीवनशैली या सर्व बाबतीत आधुनिक सापांच्या तुलनेत ते अनेक पटीने पुढे होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gaza Crisis 2025 : युद्धबंदीच्या आशा क्षीण! गाझामध्ये अन्न-पाण्याविना मृत्यूचे तांडव; 800हून अधिक बळी
आज विज्ञानाच्या साहाय्याने आपण लाखो वर्षांपूर्वीच्या प्रजातींना शोधून त्यांचे स्वरूप आणि वैशिष्ट्य समजून घेऊ शकतो. वासुकी इंडिकस आणि टायटानोबोआ हे फक्त साप नव्हते, तर पृथ्वीच्या उत्क्रांतीचा इतिहास सांगणारे एक महत्त्वाचे पान होते. या दोन सर्पसम्राटांची गोष्ट विज्ञान, पुराणकथा आणि उत्क्रांतीच्या संयोगाने भरलेली आहे जी भविष्यात अजूनही अनेक रहस्य उलगडेल.