Major attack by Baloch rebels on Pakistani army base 17 Pakistani soldiers killed
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा मोठ्या हल्ल्याची घटना समोर आली आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) या बंडखोर संघटनेने कलात जिल्ह्यातील मंगोचर भागात पाकिस्तानी लष्कराच्या तळावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात किमान 17 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
बलुच बंडखोरांकडून मंगोचर ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, बलुच बंडखोरांनी मंगोचर भागातील लष्करी चौकीला संपूर्ण वेढा घातला असून ती आपल्या ताब्यात घेतली आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. कलातमधील अनेक महामार्ग आणि महत्त्वाच्या भागांवर सध्या बीएलएचा ताबा असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार आणि लष्करासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
बलुचिस्तानमध्ये हल्ल्यांचं सत्र कायम
बलुचिस्तानमध्ये अशा प्रकारचे हल्ले होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही पाकिस्तानी लष्कर आणि बलुच बंडखोरांमध्ये अनेकदा चकमकी झाल्या आहेत. अवघ्या चार आठवड्यांपूर्वी बलुचिस्तानमध्ये मोठा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात बीएलएच्या बंडखोरांनी पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करून 47 सैनिकांना ठार केलं होतं. तसेच 30 हून अधिक लोक जखमी झाले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘आता वेगळ्या सूरात होणार चर्चा’… सीमेवर भारत आणि बांगलादेशमध्ये संघर्ष; 17 तारखेला होणार आमना-सामना
बलुच बंडखोरांचा वाढता प्रभाव
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही एक बंडखोर संघटना आहे, जी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तानविरोधात लढा देत आहे. या संघटनेचा प्रभाव गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बलुच बंडखोरांनी पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्याची रणनीती अवलंबली आहे.
बीएलएच्या प्रवक्ते जिआंद बलोच यांनी या हल्ल्यानंतर एक निवेदन जारी करत म्हटले की, “कराचीहून तुर्बतमधील फ्रंटियर कोर्ट मुख्यालयाकडे जाणाऱ्या 13 वाहनांच्या लष्करी ताफ्यावर आमच्या सैनिकांनी हल्ला केला. हा हल्ला पाकिस्तानच्या जुलमी राजवटीविरोधातील आमच्या संघर्षाचा एक भाग आहे.”
पाकिस्तानी लष्कराला मोठा धक्का
या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराला मोठा धक्का बसला आहे. मंगोचरमधील लष्करी तळ हा एक महत्त्वाचा बेस होता. परंतु, बीएलएच्या बंडखोरांनी तो ताब्यात घेतल्याने पाकिस्तानच्या संरक्षण व्यवस्थेची मोठी उघड झाली आहे. पाकिस्तानी लष्कराला सातत्याने बलुचिस्तानमध्ये अशा हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हे’ राष्ट्र ठरणार सर्वात पहिला न्यूक्लियर वेपन्सने सुस्सज देश; UK च्या ‘या’ माजी मंत्र्याने केला मोठा दावा
हल्ल्यांमुळे वाढता तणाव
गेल्या काही महिन्यांपासून बलुचिस्तानमध्ये अशा हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी मस्तुंग शहरातील एका पोलीस चौकीवरही बलुच बंडखोरांनी मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात पोलीस ठाण्याला आग लावण्यात आली होती. तसेच, सिमेंट कारखान्यातील मशिनरी आणि उपकरणेही जाळण्यात आली होती.
बलुचिस्तानमध्ये अस्थिरता कायम
या सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे बलुचिस्तानमध्ये अस्थिरता वाढत आहे. पाकिस्तान सरकार आणि लष्कराला अद्यापही या बंडखोरांवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. बीएलएच्या वाढत्या कारवायांमुळे पाकिस्तानसाठी बलुचिस्तान एक मोठा डोकेदुखी ठरत आहे.