Modi-Sharif to come face to face at UN first time after Operation Sindoor
Modi-Sharif UN meeting : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ठोस प्रत्युत्तरामुळे भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात एक महत्त्वाचा राजनैतिक प्रसंग घडणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे दोघेही एकाच दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या (UNGA) ८० व्या अधिवेशनात भाषण करणार आहेत. विशेष म्हणजे, ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच दोन्ही नेते एका जागतिक व्यासपीठावर समोरासमोर येणार आहेत. त्यामुळे या अधिवेशनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
पाकिस्तानमधील ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबरपासून संयुक्त राष्ट्र महासभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. उच्चस्तरीय चर्चा २३ ते २९ सप्टेंबरदरम्यान होईल. यावर्षीची थीम आहे ‘बेटर टुगेदर: ८० इयर्स फॉर पीस, डेव्हलपमेंट अँड ह्युमन राइट्स’. परंपरेप्रमाणे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष पहिले भाषण करतील. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपले भाषण देतील.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळच्या सत्रात भाषण करतील, तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ संध्याकाळी आपले विचार मांडतील. त्यामुळे शरीफ यांना मोदींनी मांडलेल्या मुद्द्यांना थेट उत्तर देण्याची संधी मिळू शकते. काश्मीरच्या प्रश्नाला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर उचलण्याचा प्रयत्न पाकिस्तान करेल, अशी शक्यता वर्तवली जाते. त्याच वेळी, भारताकडून दहशतवादाचा मुद्दा ठळकपणे मांडला जाणार, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India warns Pakistan : पहलगाम हल्ल्यांनंतर भारताने प्रथमच साधला पाकिस्तानशी थेट संवाद; दिला सावधानतेचा इशारा
शाहबाज शरीफ यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री इशाक दार, परराष्ट्र व्यवहार सल्लागार तारिक फातमी यांच्यासह उच्चस्तरीय शिष्टमंडळ न्यूयॉर्कला जाणार आहे. या अधिवेशनात पाकिस्तान आपल्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करेल.
भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक मंचावर दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका मांडतील. गेल्या काही वर्षांत भारताने संयुक्त राष्ट्रासमोर सातत्याने पाकिस्तानच्या कारवायांचा पर्दाफाश केला आहे. या वेळेसही मोदींच्या भाषणातून ठाम आणि आक्रमक संदेश जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मोदींचे भाषण आधी असल्यामुळे त्यांचा ठसा अधिक ठळकपणे उमटू शकतो.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या कारवाईत भारतीय जवानांनी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा यांसारख्या संघटनांचे शंभराहून अधिक दहशतवादी ठार करण्यात आले. या अभूतपूर्व कारवाईमुळे पाकिस्तान हादरला. नंतर त्याने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र भारताने ठामपणे त्याला थोपवले. अखेर पाकिस्तानला युद्धबंदीसाठी भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागला. त्यामुळे काही प्रमाणात शांतता प्रस्थापित झाली असली तरी दोन्ही देशांतील तणाव अजूनही शमलेला नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Market : अमेरिकाही भारताकडून तेल खरेदी करते मग तरीही ट्रम्प का आहेत खार खाऊन? वाचा सविस्तर…
ऑपरेशन सिंदूरनंतर मोदी आणि शरीफ पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या बैठकीबाबत प्रचंड उत्सुकता आहे. दोन्ही नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी जगभरातील राजनैतिक निरीक्षक उत्सुक आहेत. मोदींच्या ठाम भूमिकेला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळतो का, की शरीफ पाकिस्तानसाठी सहानुभूती मिळवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.