Mohammad Yunus' warning to Sheikh Hasina
ढाका : आपल्या शेजारील बांगलादेशमध्ये मागील महिन्यामध्ये राजकीय उलथापालथ झाली. यामुळे त्या देशात एकच अनागोंदी माजली. देशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांना राजीनाम देत त्यांच्या देशातून काढता पाय घ्यावा लागला. शेख हसिना यांनी भारतामध्ये आश्रय घेत वास्तव्यास आल्या. बांगलादेशमध्ये अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांच्या पुढाकाराने आणि लष्कराच्या पाठिंब्यावर अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. त्यानंतर आता अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस यांनी शेख हसीना यांना इशारा दिला आहे. भारतामध्ये बसून शेख हसिना यांनी राजकीय वक्तव्य केली तर हे भारत बांगलादेश संबंधासाठी चांगले ठरणार नाही, असे देखील मोहम्मद युनूस म्हणाले आहेत.
शेख हसिना यांनी भारतामध्ये आश्रय घेतल्यानंतर चर्चांना उधाण आले. जगभरातून या घडामोडींवर लक्ष ठेवले जात होते. मागील महिन्यामध्ये शेख हसिना यांनी राजकीय वक्तव्य केले होते. शेख हसिना यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारला इशारा दिला होता. शेख हसिना यांनी म्हटले होते की, बांगलादेशमध्ये ज्यांनी सरकार विरोधात आंदोलन करताना हिंसाचार केला, निष्पाप नागरिकांचा बळी घेतला त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे राजकीय विधान शेख हसिना केले होते. मात्र त्यांच्या या विधानावर अंतरिम सरकारकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मोहम्मद युनूस यांनी शेख हसिना यांच्यावर जोरदार टीका केली असून भारत बांगलादेश संबंधावर परिमाण होतील,असा इशारा दिला आहे.
काय म्हणाले मोहम्मद युनूस?
एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना मोहम्मद युनूस यांनी शेख हसिना यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “शेख हसीना यांना भारतात आश्रय दिला आहे, असे आम्ही समजत होतो. मात्र त्या तर तिथून प्रचार करत आहेत. शेख हसीना या काही भारताच्या दौऱ्यावर गेलेल्या नाहीत. तर येतील जनतेने उठाव केल्यानंतर आणि जनक्षोभ लक्षात घेऊन त्या पळून गेलेल्या आहेत. त्यामुळे भारतात बसून त्यांनी इथल्या घडामोडींवर सल्ले देऊ नयेत, ते आम्ही स्वीकारणार नाही आणि हे भारत-बांगलादेशच्या संबंधासाठीही ठीक नाही. आमच्या मनात त्यांच्या विधानाबाबत अस्वस्थता आहे,” असे स्पष्ट मत मोहम्मद युनूस यांनी मांडले आहे.
या नरेटिव्हच्या पुढे जाणे आवश्यक
मोहम्मद युनूस यांनी भारत बांगलादेश संबंधावर भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, “भारत आणि बांगलादेशचे संबंध सध्या कमकुवत झाले असून दोन्ही देशांनी एकत्र येऊन त्यात सुधारणा केली पाहिजे. शेख हसीना यांना नक्कीच पुन्हा बांगलादेशमध्ये आणले जाईल. तसेच भारत आणि बांग्लादेश यांच्या द्विपक्षीय संबंधांना आम्ही महत्त्व देतो. पण भारताने अवामी लीग वगळता इतर राजकीय पक्षांना केवळ इस्लामवादी या चष्म्यातून पाहणे बंद करावे किंवा या नरेटिव्हच्या पुढे जाणे आवश्यक आहे,” असा सल्ला मोहम्मद युनूस यांनी दिला आहे.