
Mongolia President bench press 100 kg Ukhnaagiin Khurelsukh viral video
जागतिक राजकारणात राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांना आपण सहसा फॉर्मल कपड्यांमध्ये गंभीर बैठका घेताना किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भाषणे देताना पाहतो. परंतु, मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष (Mongolia President) उखनागीन खुरेलसुख (Ukhnaagiin Khurelsukh) यांनी या सर्व राजकीय चौकटींना मोडून काढत एक अनोखा विक्रम करून दाखवला आहे. मंगोलियाई सेनेच्या ०८४ व्या मिलिट्री युनिटच्या दौऱ्यावर गेले असता, ५८ वर्षीय राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख यांनी सैनिकांच्या मध्यभागी जात अचानक आपला सूट जॅकेट काढला आणि थेट जिमच्या बेंचवर जाऊन झोपले.
त्यानंतर त्यांनी १०० किलोग्रॅम वजनाची जड बारबेल उचलून एक दोन नव्हे, तर सलग २० बेंच प्रेस मारले. इतके कठीण आणि जड वजन उचलल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही थकवा किंवा त्रास दिसला नाही. वर्कआउट पूर्ण केल्यानंतर ते अत्यंत सहजतेने उठले, तिथे उपस्थित असलेल्या लष्करी अधिकारी आणि सैनिकांशी हस्तांदोलन केले आणि पुन्हा आपले जॅकेट परिधान केले. या घटनेचा व्हिडिओ स्वतः राष्ट्राध्यक्षांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून तो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
उखनागीन खुरेलसुख यांचा हा फिटनेस स्टॅमिना सहजासहजी आलेला नाही, तर त्यामागे त्यांची अनेक वर्षांची शिस्तबद्ध जीवनशैली आणि पार्श्वभूमी आहे. २०२१ पासून मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे सांभाळणारे खुरेलसुख हे राजकारणात येण्यापूर्वी मंगोलियन पीपल्स आर्मीमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते. लष्करी सेवेत असतानाच त्यांना बॉडीबिल्डिंग आणि मार्शल आर्ट्सची आवड निर्माण झाली, जी त्यांनी आज ५८ व्या वर्षीही जोपासली आहे. त्यांच्या या तगड्या शारीरिक क्षमतेमुळे आणि शिस्तीमुळेच ते सैनिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. एका राष्ट्राध्यक्षाने थेट लष्करी जवानांसमोर अशा प्रकारे १०० किलो वजनाचे बेंच प्रेस मारून दाखवणे ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ramon Crater: दिलासादायक! इराणकडून भेट मिळालेल्या 11 गाढवांनी इस्रायलच्या वाळवंटात फुलवले मरुद्यान; जगासाठी ठरले आश्चर्य
रॉक बँडमधील गिटारवादक ते हार्ले डेव्हिडसनचे शौकीन
राष्ट्राध्यक्ष उखनागीन खुरेलसुख यांचे व्यक्तिमत्त्व केवळ राजकारण आणि फिटनेसपुरतेच मर्यादित नाही, तर त्यांचे इतर छंदही तितकेच रंजक आहेत. ते ‘पल्स’ (Pals) नावाच्या एका प्रसिद्ध रॉक बँडमध्ये गिटार वाजवतात. याशिवाय, त्यांना हेवी बाईक्सची प्रचंड आवड असून ते मंगोलियातील ‘हार्ले डेव्हिडसन फॅन क्लब’चे संस्थापक देखील आहेत. एक लष्करी अधिकारी, बॉडीबिल्डर, रॉक गिटारवादक, बाईकर आणि देशाचा राष्ट्राध्यक्ष अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांची गणना जगभरातील सर्वात युनिक आणि स्टायलिश नेत्यांमध्ये केली जात आहे.
Mongolia’s president bench-presses 220 lbs (100 kg) for 20 reps Ukhnaagiin Khurelsukh showed off his strength while visiting a military unit pic.twitter.com/0lctA5T3IV — RT Intl (@RT_on_X) September 10, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 911Anniversary: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण; पहा जगातील ‘त्या’ 4 विमान अपहरणांनी कसे बदलले जगाचे भू-राजकारण?
हा व्हिडिओ एक्स (ट्विटर), इंस्टाग्राम आणि फेसबूकवर पोस्ट होताच जगभरातील नेटकऱ्यांनी त्यावर उड्या घेतल्या. सोशल मीडियावर युझर्स त्यांना ‘जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष’ (World’s Strongest President) अशी पदवी देत आहेत. एका युझरने कमेंट करत लिहिले, “जागतिक स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी नेत्यांमध्ये युद्धांऐवजी वेटलिफ्टिंगच्या स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत”. दुसऱ्या एका युझरने गंमतीने म्हटले, “जर जगभरातील राष्ट्रप्रमुखांमध्ये वेटलिफ्टिंगची स्पर्धा झाली, तर मंगोलिया नक्कीच जगातील सर्वात मोठी महासत्ता बनेल”. तर अनेक युझर्सनी ५८ व्या वर्षी त्यांचा असा स्टॅमिना पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.