बांगलादेशात संसद बरखास्त; नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्याकडे अंतरिम सरकारचे नेतृत्त्व
ढाका : सध्या बांगलादेशात प्रचंड हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारानंतर तेथील राजकीय परिस्थितीही बिघडली आहे. त्यात शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता बांगलादेशमध्ये अखेर अंतरिम सहकार स्थापनाच्या हालचालींना वेग आला. नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांची अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : हिंदू मंदिरांवर हल्ले, जाळपोळ अन् बरचं काही; शेख हसीना यांनी देश सोडल्यावर काय झाले?
शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर बांगलादेशाची संसद विसर्जित करण्यात आलेली आहे. राष्ट्राध्यक्ष मोहमद शहाबुद्दीन यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र, बांगलादेशातील आंदोलनामागे असलेल्या विद्यार्थी संघटनांनी देशात लष्करी शासन लागू करण्यास विरोध केला आहे. मंगळवारी आंदोलकांनी सार्वजनिक वस्तूंची तोडफोड केली. तसेच संतप्त आंदोलकांनी काही लोकांच्या घरांनाही आग लावली. यामध्ये क्रिकेटपटूंच्या घराचाही समावेश आहे.
हेदेखील वाचा : जैसे ज्याचे कर्म तैसे! निषेध, लाँग मार्च आणि राजीनामे… 28 वर्षानंतर बांगलादेशमध्ये पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती?
बांगलादेशातील या आंदोलकांनी मेहरपूर येथील इस्कॉन मंदिर पेटवून दिले. आंदोलकांनी तोडफोडीनंतर मंदिराला आग लावली. बांगलादेशातील आंदोलकांकडून 27 जिल्ह्यात प्रामुख्याने अल्पसंख्याक हिंदू समाजाची घरे आणि दुकानांना लक्ष्य करण्यात आले. त्यांच्या घरातील किंमती वस्तूही चोरून नेल्या.
युनूस प्रभारी सरकारचे सल्लागार
आरक्षणाच्या मुद्यावरुन बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन प्रचंड चिघळल्यानंतर शेख हसीना यांनी सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशाबाहेर पलायन केले, आता नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांनी फेसबुक व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या नेत्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने लवकरच स्थापन होणाऱ्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार होण्याचे मान्य केले आहे.