निषेध, लाँग मार्च आणि राजीनामे... 28 वर्षानंतर बांगलादेशमध्ये पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती?
बांगलादेशात हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या महिनाभरापासून तरुणांनी सरकारी निर्णयाचा आणि शेख हसीना सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत होती. अखेर आंदोलक थेट शेख हसीना यांच्या शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी बांगलादेशमधून काढता पाय घेतला आहे. शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्यांनी देश सोडला आहे. बांगलादेशात रविवारी (4 ऑगस्ट) मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. तर सोमवारीही आंदोलकांनी ढाकापर्यंत लाँग मार्चचे नियोजन केले होते.
परिस्थिती अशी होती की, आंदोलकांना रोखण्यासाठी देशभरात लष्कर तैनात करण्यात आले होते. मात्र लष्कराने या आंदोलकांना रोखले नाही, असे सांगण्यात येत आहे. याआधी लष्करप्रमुख म्हणाले होते की, सेना नेहमीच जनतेच्या पाठीशी उभी असते. दरम्यान जानेवारीतच शेख हसीना यांची पाचव्यांदा पंतप्रधानपदी निवड झाली. सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पक्ष अवामी लीगने 300 पैकी 224 जागा जिंकल्या. मात्र, या निवडणुका वादग्रस्त मानल्या जात असून त्यावर विरोधकांनी बहिष्कारही टाकला होता. शेख हसीना यांना ज्या पद्धतीने सात महिन्यांपेक्षा कमी कालावधीत राजीनामा द्यावा लागला, त्यामुळे 28 वर्षांपूर्वी खालिदा झिया यांच्या राजीनाम्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
खालिदा झिया आणि शेख हसीना या दोघांच्या राजीनाम्याची कहाणी जवळपास सारखीच आहे. तेव्हा शेख हसीना खालिदा झिया यांच्या विरोधात होत्या आणि आता खालिदा झिया यांचा पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) शेख हसीना यांच्या विरोधात होता. शेख हसीना यांनी अलीकडेच बीएनपीची तुलना दहशतवादी संघटनेशी केली होती. बीएनपी विद्यार्थ्यांना चिथावणी देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
दरम्यान खालिदा झिया यांच्यावर 1996 च्या निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप होता. त्याच वर्षी 15 फेब्रुवारीला निवडणुका झाल्या. त्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता. 19 फेब्रुवारी रोजी खालिदा झिया यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांना पदावरून हटवण्यासाठी शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी असहकार आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर 31 मार्च रोजी खालिदा झिया यांना राजीनामा द्यावा लागला होता. खालिदा झिया यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रपतींनी संसद बरखास्त केली. यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश मुहम्मद हबीबुर रहमान यांची हंगामी पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली.
आता 2024 मध्ये बांगलादेशमध्ये या वर्षी जानेवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. बीएनपी आणि जमात-ए-इस्लामीसह 15 विरोधी पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. या निवडणुकीत केवळ 40 टक्के मतदान झाले. शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगने संसदेत 300 पैकी 224 जागा जिंकल्या होत्या. निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
1996 च्या निवडणुकीत खलिदा झिया यांच्या बीएनपीने 300 पैकी 278 जागा जिंकल्या होत्या. राजीनाम्याची घोषणा करताना खालिदा झिया यांनी विरोधकांवर अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला होता. मात्र, खालिदा झिया सत्तेवर आल्यावर शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली देशभरात आंदोलन सुरू असताना सरकारी नोकरीत काम करणारेही त्यात सहभागी झाले. सरकारी नोकरीत काम करणारे संपावर गेले होते. अनेक कार्यालयांमधून खालिदा झिया यांची छायाचित्रेही हटवण्यात आली.
ज्या दिवशी खालिदा झिया यांनी राजीनामा दिला त्याच दिवशी शेख हसीना यांच्या पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रपती भवनाचा घेराव करण्यास सांगितले होते. तटस्थ अंतरिम सरकार स्थापन होईपर्यंत राष्ट्रपती भवनाला घेराव घालू, असे अवामी लीगने म्हटले आहे. त्या दिवशी संपूर्ण बांगलादेशात अलर्ट होता. खालिदा झिया आणि त्यांच्या सरकारच्या 27 मंत्र्यांच्या घराबाहेर लष्कर तैनात करण्यात आले होते.
या वर्षी जानेवारीत निवडणुकीत विजय मिळवल्यानंतरही शेख हसीना यांच्या विरोधात वातावरण होते. यानंतर कोटा पद्धतीबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर परिस्थिती आणखी बदलली. खरे तर बांगलादेशात स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या मुलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के आरक्षण मिळते. हसीना सरकारने 2018 मध्ये ते रद्द केले होते, मात्र या वर्षी जूनमध्ये उच्च न्यायालयाने हे आरक्षण पुन्हा बहाल केले होते.
यानंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि कोटा पद्धतीत सुधारणा करण्याची मागणी केली. कोटा पद्धतीच्या माध्यमातून शेख हसीना आपल्या निकटवर्तीयांना फायदा करून देतील, असा आरोप होता. विद्यार्थ्यांच्या या निदर्शनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसक हाणामारी झाली, त्यामुळे ते अधिक हिंसक झाले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या पाल्यांना कोटा पद्धतीतील आरक्षण 5 टक्के केले. यामुळे नक्कीच वातावरण थोडं शांत झालं, पण त्यानंतर शेख हसीनाच्या माफीची मागणी करत विद्यार्थी रस्त्यावर आले. 4 ऑगस्ट रोजी झालेल्या या निदर्शनात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर ५ ऑगस्टला आंदोलकांनी ढाकापर्यंत लाँग मार्च काढण्याची घोषणा केली. आंदोलकांना रोखण्यासाठी देशभरात लष्कर तैनात करण्यात आले होते. मात्र, लष्कराने या आंदोलकांना रोखले नाही. दरम्यान, शेख हसीना दुपारी अडीच वाजता बांगलादेशहून निघाल्या. शेख हसीना सध्या भारतात आहेत