Photo Credit : Social Media
ढाका : शेख हसीना यांनी सोमवारी (05 ऑगस्ट) बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला. त्यानंतर संपूर्ण देशभरात हिंसाचाराच्या घटना सुरूच होत्या. देशभरात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी संपूर्ण दिवसभरात अशांतता आणि रात्रभर तणावपूर्ण परिस्थिती होती. पण आज सकाळपासून काही प्रमाणात शांतता प्रस्थापित करण्यात तेथील लष्कराला यश आले आहे. आज सकाळपासून बस आणि इतर सार्वजनिक वाहने रस्त्यावर दिसल आहेत. स्थानिक दुकानदारांनीही आपली दुकाने उघडली. सरकारी वाहने कार्यालयाकडे जाताना दिसली आणि अनेक बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षाही रस्त्यावर दिसू लागल्या आहेत.
शेख हसीना यांनी अचानक पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याने आणि लष्करी विमानातून देश सोडला. शेख हसीना देश सोडून गेल्याची बातमी पसरताच शेकडो लोकांनी त्यांच्या घरात घुसून तोडफोड आणि लुटमार केली. आंदोलकांनी हसिना यांचे निवासस्थान ‘सुधा सदन’ आणि राजधानीतील इतर कार्यालयांवरही हल्ला केला. अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनाही समोर आल्या. ढाका आणि ढाका बाहेरील हसीनाच्या आवामी लीग सरकारमधील मंत्री, पक्षाचे खासदार आणि नेत्यांची निवासस्थाने आणि व्यावसायिक कार्यालयांचीही तोडफोड करण्यात आली.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी आणि इतर विविध ठिकाणी हिंदू मंदिरांवर हल्ले, हिंसाचार आणि लूटमारीत 119 लोक मारले गेले आहेत. बंगाली भाषेतील दैनिक ‘प्रथम आलो’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी ढाकासह देशाच्या विविध भागात झालेल्या संघर्षात किमान 109 लोक मारले गेले. याआधी, रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 98 मृत्यूची नोंद करण्यात आली होती आणि रविवारी मध्यरात्री 16 जणांचा मृत्यू झाला होता. रविवारी एकूण 114 लोकांचा मृत्यू झाला.
16 जुलै ते 5 ऑगस्ट या 21 दिवसांच्या कार्यकाळात हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या 440 वर पोहोचली आहे. ढाका येथे सोमवारी सकाळी 11 ते रात्री 8 दरम्यान 37 मृतदेह सापडले. ते मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. त्याशिवाय, हल्यात गंभीर जखमी झालेल्या 500 रुग्णांवरही उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. त्यापैकी अनेकजण बंदुकीच्या गोळीने गंभीर जखमी झाले होते.