nasa alert us cities sea level rise trump administration action
NASA Alert For US : जगभरातील हवामान बदल, समुद्राची वाढती पातळी आणि मानवनिर्मित हस्तक्षेप यामुळे संपूर्ण मानवजातीसमोर अभूतपूर्व संकट उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) ने दिलेला ताज्या अभ्यासाचा इशारा जगाला हादरवणारा ठरत आहे. नासाने जाहीर केलेल्या उपग्रह-नकाशानुसार, अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या किनारी भागातील अनेक शहरे हळूहळू समुद्रात बुडत चालली आहेत.
नासा, कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि एनओएए (NOAA) यांच्या संयुक्त संशोधनातून मिळालेल्या निष्कर्षांनी अमेरिकेच्या सरकारलाही धास्तावून सोडलं आहे. २०१५ ते २०२३ या काळातील उच्च-रिझोल्यूशन सॅटेलाइट रडार डेटाचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. हे निष्कर्ष सायन्स अॅडव्हान्सेस (Science Advances) या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नुकतेच प्रकाशित झाले आहेत. या अहवालानुसार, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस आणि सॅन दिएगो यांसारखी प्रमुख शहरे समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे आणि भूजल शोषणामुळे वेगाने खाली बसत आहेत. तज्ज्ञांच्या मते, दरवर्षी ही शहरे सुमारे ०.४ इंच (१० मिलिमीटर) पेक्षा अधिक वेगाने जमिनीत बुडत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ismail Azizi Tanzania : मृत्यूला हरवणारा टांझानियन इसम; सहा वेळा ‘मरण पावला’, पण प्रत्येक वेळी जिवंतच परतला
संशोधनात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की पुढील २५ वर्षांत म्हणजेच २०५० पर्यंत कॅलिफोर्नियाच्या किनारी भागात समुद्राची पातळी किमान १७ इंच (सुमारे १.४ फूट) ने वाढेल. याचा थेट परिणाम लाखो लोकांच्या जीवनावर, पायाभूत सुविधांवर आणि अमेरिकेच्या आर्थिक रचनेवर होऊ शकतो. या परिस्थितीमुळे, जर अचानक समुद्री वादळं किंवा प्रचंड पुर आले तर किनारी शहरे पूर्णपणे पाण्याखाली जाऊ शकतात. लोकांचे स्थलांतर, उद्योगधंद्यांचे नुकसान आणि पर्यावरणीय संकट अमेरिकेसमोर मोठं आव्हान म्हणून उभं राहील.
तज्ज्ञांनी या भीषण परिस्थितीमागे काही प्रमुख कारणं स्पष्ट केली आहेत
भूजलाचा अतिरेकी उपसा : शहरांच्या पाणीपुरवठ्यासाठी भूजलाचा अतिरेकाने वापर होत असल्याने जमीन हळूहळू खाली बसत आहे.
जलद शहरीकरण : वाढत्या लोकसंख्येमुळे आणि बांधकाम प्रकल्पांमुळे नैसर्गिक जमिनीची रचना बदलत आहे.
हवामान बदल : तापमानवाढ, हिमनगांचे वितळणं आणि समुद्रपातळीतील वाढ ही जागतिक समस्या आहे.
मानवी हस्तक्षेप : किनारी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर मानवनिर्मित हस्तक्षेपामुळे नैसर्गिक संतुलन बिघडले आहे.
अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर नासाने अमेरिकन प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. नासाच्या मते, जर वेळेत ठोस पावले उचलली नाहीत, तर अमेरिकेचा मोठा भाग पुढील काही दशकांत पाण्याखाली जाऊ शकतो. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनालाही या धोक्याचा गांभीर्याने विचार करण्याची सूचना करण्यात आली होती.
तज्ज्ञांच्या मतानुसार, परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी सरकारने तातडीने खालील उपाययोजना करणे आवश्यक आहे –
किनारी भागातील शहरे संरक्षित करण्यासाठी दीर्घकालीन भौतिक बंधारे (Sea Walls) उभारणे
भूजल शोषणावर नियंत्रण आणणे
पर्यावरणपूरक शहरी नियोजन आणि बांधकाम
हवामान बदलावर नियंत्रण आणण्यासाठी नवीन धोरणं आणि हरित ऊर्जेचा वापर
लोकजागृती आणि स्थलांतराची तयारी
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इंडो-पॅसिफिकमध्ये नवा गेमचेंजर! 2030 पर्यंत भारत-जपान भागीदारीतून तयार होणार ‘हे’ प्रचंड विध्वंसक क्षेपणास्त्र
नासाचा हा इशारा फक्त अमेरिकेसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा आहे. भारतासह अनेक आशियाई देशांच्या किनारी शहरांनाही याच संकटाचा सामना करावा लागत आहे. मुंबई, चेन्नई, कोलकाता यांसारखी शहरेही समुद्रपातळी वाढीमुळे धोक्यात असल्याचे अनेक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. हवामान बदल ही केवळ एक वैज्ञानिक संकल्पना राहिलेली नसून ती आपल्या दैनंदिन जीवनावर आणि भविष्यावर थेट परिणाम करणारी वास्तवता ठरत आहे. नासाच्या ताज्या इशाऱ्याने पुन्हा एकदा जगाला सावध केले आहे की वेळ निघून जाण्याआधी ठोस पावले उचलणे हीच खरी गरज आहे.