इंडो-पॅसिफिकमध्ये नवा गेमचेंजर! 2030 पर्यंत भारत-जपान भागीदारीतून तयार होणार 'हे' प्रचंड विध्वंसक क्षेपणास्त्र ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India-Japan missile cooperation : भारत आणि जपान हे आशियातील दोन मोठे लोकशाही देश. आर्थिक, तांत्रिक आणि धोरणात्मक पातळीवर दोन्हींचे सहकार्य दिवसेंदिवस वाढत आहे. आता या सहकार्याचा नवा अध्याय संरक्षण क्षेत्रात लिहिला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत आणि जपान संयुक्तपणे एका नव्या पिढीच्या लांब पल्ल्याच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र (BVRAAM) च्या विकासावर काम करण्याचा विचार करत आहेत. विशेष म्हणजे, हे क्षेपणास्त्र ३०० किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याचे असणार असून ते २०३० पर्यंत प्रत्यक्षात येऊ शकते.
आज जगातील सामरिक समीकरणे जलदगतीने बदलत आहेत. चीनने आधीच PL-16 (२००-२५० किमी) आणि PL-17 (४००+ किमी) सारखी क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. ही क्षेपणास्त्रे शत्रूच्या दूरवर असलेल्या AWACS (Airborne Warning and Control Systems) किंवा टँकर विमानांना लक्ष्य करू शकतात. जर चीनकडे अशी क्षमता असेल आणि भारत-जपानकडे नसली, तर युद्धाच्या वेळी त्यांच्या लढाऊ विमानांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच, भारत आणि जपानला असे आधुनिक क्षेपणास्त्र विकसित करणे आवश्यक आहे जे लांब अंतरावर देखील अचूक प्रहार करू शकेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ismail Azizi Tanzania : मृत्यूला हरवणारा टांझानियन इसम; सहा वेळा ‘मरण पावला’, पण प्रत्येक वेळी जिवंतच परतला
भारतातील DRDO (Defence Research and Development Organisation) ने मागील काही वर्षांत अस्त्र मालिकेतील क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत.
Astra Mk-I : ११० किमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र. हे आधीच भारतीय वायुदलात समाविष्ट झाले आहे.
Astra Mk-II : १६० किमी पल्ला. याची चाचणी २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा.
Astra Mk-III (गांदिव) : तब्बल ३४०+ किमी पल्ला असलेले हे क्षेपणास्त्र २०३० पर्यंत सेवेत येण्याची शक्यता.
यामुळे भारताने लांब पल्ल्याच्या BVRAAM क्षेत्रात स्वतःची चांगली पकड तयार केली आहे.
जपानकडे सध्या AAM-4TDR क्षेपणास्त्र आहे, ज्याचा पल्ला सुमारे १६०-१७० किमी आहे. मात्र, हे क्षेपणास्त्र चीनच्या नव्या PL-१६ किंवा PL-१७ च्या तुलनेत कमकुवत मानले जाते. त्यामुळे जपानलाही भारतासारखेच आधुनिक आणि लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र हवे आहे.
हा प्रकल्प यशस्वी झाला तर भारताचे अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) आणि जपानचे ग्लोबल कॉम्बॅट एअर प्रोग्राम (GCAP) या लढाऊ विमानांसाठी नवी शस्त्रे उपलब्ध होतील. हे क्षेपणास्त्र फक्त लढाऊ विमानांनाच नाही तर संपूर्ण इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सामरिक संतुलनालाही दिशा देईल. विशेष म्हणजे, भारताने अलीकडेच ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानकडून पाडलेल्या चिनी PL-15E क्षेपणास्त्रांमधील इलेक्ट्रॉनिक डेटा जपानसोबत शेअर केला आहे. यातून दोन्ही देशांमध्ये Electronic Counter-Countermeasures (ECCM) विषयक सहकार्य वाढले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेला आर्थिक झटका? भारत-चीन डॉलरविरोधी मोर्चावर; लवकरच येऊ शकते नवीन पेमेंट सिस्टम
तज्ज्ञांचे मत आहे की, जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर २०३० पर्यंत भारत आणि जपानच्या हवाई दलाला एक नवीन पिढीचे ‘सुपर क्षेपणास्त्र’ मिळेल. हे क्षेपणास्त्र केवळ चीनलाच नाही तर संपूर्ण आशिया-प्रशांत प्रदेशातील इतर शत्रू देशांनाही संतुलनात ठेवेल. भारत आणि जपान यांचे हे सहकार्य केवळ संरक्षण क्षेत्रापुरते मर्यादित नाही, तर त्यातून दोन्ही देशांतील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होणार आहे. भारत आणि जपान या दोन लोकशाही महासत्तांनी एकत्र येऊन सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जर हा संयुक्त प्रकल्प वेळेत पूर्ण झाला, तर २०३० पर्यंत जगाला एक नवीन संदेश मिळेल आशियाई महासत्ता आता स्वतःची शस्त्रतंत्रज्ञान विकसित करून जागतिक सामरिक संतुलन ठरवू शकतात.