Operation Gideons Chariots Israels new move to seize Gaza Thousands of lives at risk
Operation Gideon’s Chariots : गाझा पट्टीतील रक्तरंजित संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. इस्रायलच्या लष्करप्रमुख एयाल झमीर यांनी जाहीर केलेल्या नव्या मोहिमेमुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. गाझा शहर काबीज करण्यासाठी “ऑपरेशन गिडिओन्स चॅरियट्स” चा पुढील टप्पा लवकरच सुरू होणार आहे. या कारवाईत हमासवर जमीन, हवाई आणि समुद्रमार्गे हल्ले अधिक वेगाने व आक्रमकतेने चालू ठेवले जातील.
गाझा हे या पट्टीतील सर्वात मोठे आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर असल्याने या कारवाईचे परिणाम अत्यंत विनाशकारी ठरू शकतात. आंतरराष्ट्रीय समुदायाने आधीच या मोहिमेवर गंभीर इशारे दिले आहेत. युद्धबंदी व कैद्यांच्या सुटकेबाबतची चर्चा थांबल्यानंतरच इस्रायलने ही घोषणा केली आहे.
गाझा दौर्यावर असताना लष्करप्रमुख झमीर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले की हमास आत्मसमर्पण करत नाही तोपर्यंत लष्करी कारवाई सुरू राहील. तसेच, गाझामध्ये बंदिवान असलेल्या इस्रायली नागरिकांना सुरक्षित परत आणणे हे लष्कराचे “नैतिक कर्तव्य” असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तथापि, प्रत्यक्षात या संघर्षामुळे सर्वाधिक फटका सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांना बसत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?
इस्रायलने गाझा शहरातील रहिवाशांना दक्षिणेकडे हलवण्याची योजना आखली आहे. संरक्षण मंत्रालयाची संस्था COGAT यांनी जाहीर केले की येत्या रविवारपासून नागरिकांना तंबू वाटले जातील आणि त्यांना सुरक्षित भागात नेले जाईल. मात्र, हमासने या हालचालीचा तीव्र विरोध केला आहे. “ही एक नवीन नरसंहाराची व विस्थापनाची पायरी आहे,” असे हमासने म्हटले आहे.
७ ऑक्टोबर २०२३ पासून गाझावर इस्रायली हल्ल्यांमध्ये ६१,९४४ हून अधिक पॅलेस्टिनी मृत्युमुखी पडले आहेत. तर १.५५ लाखांहून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. केवळ युद्धामुळेच नव्हे, तर अन्नटंचाई व औषधांच्या अभावामुळेही परिस्थिती बिकट होत आहे. गेल्या काही महिन्यांत २५८ नागरिक उपासमार व कुपोषणामुळे मृत्युमुखी, ज्यामध्ये ११० मुले आहेत, ही परिस्थिती किती भयावह आहे याचा पुरावा आहे. गेल्या २४ तासांतच सात जणांनी भुकेमुळे प्राण गमावले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Hypersonic Missile : USA चे ‘Dark Eagle’ तैनात; अमेरिकेने इंडो-पॅसिफिकमध्ये चीनला दिला मोठा इशारा
संयुक्त राष्ट्र, युरोपियन संघ आणि अनेक मानवाधिकार संघटना वारंवार इस्रायलला नागरिकांच्या सुरक्षेची हमी देण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, गाझा शहर काबीज करण्यासाठी होणाऱ्या या नव्या लष्करी मोहिमेमुळे हजारो निरपराधांचे जीवन धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गाझातील लोकांसाठी हा संघर्ष आता केवळ युद्ध राहिलेला नाही, तर अस्तित्वाची लढाई बनली आहे. युद्धाचा शेवट कधी आणि कसा होईल, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.