
Pak PM Shahbaz at UN Raised Kashmir claimed 7 Indian jets downed
Pakistan UN speech : न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या (UNGA) ८०व्या अधिवेशनात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ ( Shahbaz Sharif) यांनी आपल्या देशाच्या सुरक्षेचा, शांतीचा आणि भविष्यातील राजकीय दिशेचा मुद्दा जगासमोर ठेवला. आपल्या नेहमीच्या भुमिकेप्रमाणे त्यांनी भारताला काश्मीर प्रश्नावर संवादाची तयारी दाखवण्याचे आवाहन केले, मात्र त्याच वेळी भारतीय हल्ल्यांपासून पाकिस्तानने स्वतःचे रक्षण करण्यासाठी केलेल्या कारवायांचेही दावे केले.
शाहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात काश्मीर प्रश्नाने केली. त्यांनी म्हटले की, “काश्मिरी जनतेचा आत्मनिर्णयाचा अधिकार हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झालेले सत्य आहे. हा प्रश्न फक्त संवादाने आणि संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखालील निष्पक्ष यंत्रणेद्वारेच सुटू शकतो.” पाकिस्तानने अनेकदा या मुद्याला आंतरराष्ट्रीय रंगमंचावर आणले असले तरी भारताने यास कडाडून विरोध दर्शवला आहे. भारताचे मत नेहमीच ठाम आहे की जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे आणि बाह्य हस्तक्षेप मान्य होणार नाही.
या भाषणात शाहबाज यांनी भारतावर आणखी एक गंभीर आरोप केला. त्यांनी सांगितले की भारताने सिंधू पाणी कराराचे एकतर्फी उल्लंघन केले आहे. हा करार दक्षिण आशियातील शांततेचा पाया मानला जातो, पण भारताचे वर्तन कराराच्या नियमांच्या आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात असल्याचा दावा त्यांनी केला. “हा मुद्दा फक्त पाण्याचा नसून पाकिस्तानातील २४ दशलक्ष लोकांच्या जीवनाचा आहे. जर भारताने उल्लंघन चालू ठेवले तर आम्ही याला युद्धाइतकेच गंभीर मानू,” असे शाहबाज यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Tariff : व्यापारयुद्ध पेटले! ट्रम्प यांनी आता उगारला आहे 100% टॅरिफचा आसूड; 5 दिवसात होणार लागू
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात मागील काही महिन्यांतील तणावाची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, “मे महिन्यात आमच्या पूर्व सीमेवर विनाकारण हल्ला झाला. आम्ही शत्रूला जोरदार प्रत्युत्तर देऊन परत पाठवले. आमच्या सैनिकांनी अभूतपूर्व शौर्य दाखवले.” यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याचाही उल्लेख केला आणि भारताने निष्पाप लोकांवर हल्ले केल्याचा आरोप लावला.
सर्वाधिक चर्चेत राहिलेला दावा म्हणजे सात भारतीय विमाने पाडल्याची घोषणा. शाहबाज म्हणाले की, “आम्ही स्वसंरक्षणासाठीच लढलो. ही कारवाई संयुक्त राष्ट्रांच्या नियमांनुसार योग्य होती. अमेरिकन हवाई दलाने या संघर्षात आमच्या मदतीने सात भारतीय विमाने पाडली.” हा दावा कितपत सत्य आहे हे वेगळा प्रश्न असला तरी त्यांच्या या विधानाने आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्सुकता निर्माण केली आहे.
शाहबाज शरीफ यांनी भाषणात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष आभार मानले. “जर ट्रम्प यांनी वेळेवर मध्यस्थी केली नसती तर या संघर्षाचे परिणाम फार भयंकर झाले असते,” असे ते म्हणाले. त्यामुळेच पाकिस्तानने ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. पाकिस्तानने चीन, तुर्की, सौदी अरेबिया, कतार, अझरबैजान, इराण, युएई आणि संयुक्त राष्ट्रांचेही आभार मानले कारण या देशांनी संघर्षाच्या काळात पाकिस्तानसोबत उभे राहण्याची भूमिका घेतली.
शाहबाज यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाचा गाभा स्पष्ट करताना सांगितले की, “आम्ही शांती, परस्पर आदर आणि संवाद यांवर विश्वास ठेवतो. प्रत्येक संघर्षाचा मार्ग संवादातूनच सुटतो.” मात्र त्याच वेळी त्यांनी स्पष्ट केले की पाकिस्तान आपल्या नागरिकांच्या सुरक्षेशी किंवा हक्कांशी तडजोड करणार नाही. दक्षिण आशियासाठी त्यांनी दिलेला संदेश महत्त्वाचा ठरला. “या प्रदेशाला अशा नेत्यांची गरज आहे जे संघर्ष निर्माण करणार नाहीत, तर संवाद साधून समस्या सोडवतील,” असे ते म्हणाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UAE visa new rules: सावधान! युएई व्हिसा नियमात मोठा बदल; प्रवास करण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा
शाहबाज शरीफ यांच्या भाषणातून पुन्हा एकदा दिसून आले की पाकिस्तान जागतिक रंगमंचावर भारताशी संवाद साधण्याची तयारी दाखवतो, पण प्रत्यक्षात त्याचवेळी युद्धजन्य वातावरणाचे दावे करून आंतरराष्ट्रीय समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करतो. सिंधू पाणी कराराचा मुद्दा मांडून त्यांनी भारतीय भूमिकेविरुद्ध आणखी दबाव तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.
काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानची सातत्यपूर्ण भुमिका नवी नाही. मात्र ७ भारतीय विमाने पाडल्याचा दावा ही एक धक्कादायक घोषणा आहे. यामुळे भारत-पाकिस्तान तणावाच्या कथनाला जागतिक माध्यमांमध्ये नवीन वळण मिळाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनातील हे भाषण पाकिस्तानच्या राजकीय धोरणाला बळकट करणारे मानले जात आहे. संवादाचे आवाहन करतानाच भारताविरुद्ध गंभीर आरोप, सिंधू पाणी करारावरून दिलेली धमकी आणि ट्रम्प यांचे कौतुक – या सगळ्यांतून पाकिस्तानने आपले दुहेरी धोरण जगासमोर ठेवले आहे. पुढील काळात या दाव्यांवर भारत काय उत्तर देतो याकडे जगाचे लक्ष लागले आहे.