Trump Tariff : व्यापारयुद्ध पेटले! ट्रम्प यांनी आता उगारला आहे 100% टॅरिफचा आसूड; ५ दिवसात होणार लागू ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध उत्पादनांवर १००% टॅरिफ लावण्याची घोषणा केली.
स्वयंपाकघर व फर्निचर उत्पादनांवर ५०% व ३०% कर, तर जड ट्रकांवर २५% कर लागू होणार.
या निर्णयामुळे भारत-अमेरिका व्यापारसंबंधांवर तणाव वाढला असला तरी, चर्चेच्या माध्यमातून उपाय शोधले जात आहेत.
100 percent tariff India : सध्या पुन्हा चर्चेत असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांनी एक मोठा आर्थिक निर्णय जाहीर केला आहे. निवडणुकीपूर्वी घेतलेले हे पाऊल केवळ अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठीच नाही तर जागतिक व्यापारासाठीही मोठे धक्कादायक ठरणारे आहे. ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की अमेरिकेत कारखाने न उभारणाऱ्या कंपन्यांना आता औषध क्षेत्रात (pharmaceutical industry) १०० टक्के टॅरिफचा फटका बसणार आहे.
शुक्रवारी (२६ सप्टेंबर) ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ वर पोस्ट करून ही घोषणा केली. त्यांच्या शब्दांत, “कोणत्याही ब्रँडेड किंवा पेटंटेड औषध उत्पादनावर १०० टक्के टॅरिफ लावले जाईल, जर त्या कंपनीने अमेरिकेत उत्पादन युनिट सुरू केले नसेल. मात्र, जर कंपनीने आधीच अमेरिकेत कारखाना उभारण्यास सुरुवात केली असेल, तर त्या उत्पादनांना करातून सूट दिली जाईल.” ही घोषणा थेट औषध कंपन्यांसाठी आहे. भारतासारख्या देशातून मोठ्या प्रमाणात औषधांची निर्यात अमेरिकेत केली जाते. त्यामुळे भारतीय औषध उद्योगावर याचा मोठा परिणाम होणार आहे. औषधे महाग होणे, बाजारपेठेतील असंतुलन, तसेच रुग्णांसाठी खर्चात वाढ हे परिणाम समोर येऊ शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : America News : 1 ऑक्टोबरपासून अमेरिकेत शटडाऊनची शक्यता; ट्रम्प यांच्या गुंतवणुकीच्या दाव्यानंतर नवा राजकीय कलह
याचबरोबर, ट्रम्प यांनी अमेरिकेतील गृहउद्योग व उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी स्वयंपाकघरातील कॅबिनेट, बाथरूम व्हॅनिटी आणि संबंधित उत्पादनांवर ५० टक्के कर, तसेच फर्निचर उत्पादनांवर ३० टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा कर १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहे. ट्रम्प यांच्या मते, हे पाऊल राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक आहे. इतर देशांतून मोठ्या प्रमाणात हे उत्पादन अमेरिकेत येत असल्याने स्थानिक उद्योगांना तोटा सहन करावा लागत आहे.
ट्रक उत्पादक कंपन्यांचे संरक्षण करण्यासाठी ट्रम्प यांनी आणखी एक घोषणा केली आहे. जगभरातून आयात होणाऱ्या जड ट्रकांवर २५ टक्के कर लावला जाईल. या निर्णयामुळे अमेरिकेतील पीटरबिल्ट, केनवर्थ, फ्रेटलाइनर यांसारख्या नामांकित ट्रक उत्पादक कंपन्यांना बळ मिळेल. ट्रम्प यांनी असेही म्हटले की, “आपल्याला आपल्या ट्रक चालकांना आणि उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवणे गरजेचे आहे. अन्याय्य स्पर्धेला थारा दिला जाणार नाही.”
या घोषणेमुळे भारत-अमेरिका व्यापार संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. औषध उद्योग हा भारताचा महत्त्वाचा निर्यात क्षेत्र आहे. टॅरिफमुळे या निर्यातीवर मोठा फटका बसू शकतो. मात्र, एक सकारात्मक बाब म्हणजे दोन्ही देशांमध्ये सध्या चर्चेला सुरुवात झाली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी नुकतीच अमेरिका भेट दिली. त्यांच्या चर्चेनंतर व्यापार करारावर वाटाघाटी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
अर्थतज्ज्ञांच्या मते, हा निर्णय अमेरिकेतील स्थानिक उद्योगांना काही प्रमाणात संरक्षण देऊ शकतो. पण याचा दीर्घकालीन परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर होऊ शकतो. औषधांचे दर वाढल्याने सामान्य नागरिकांना आरोग्य खर्चात वाढ जाणवेल. तसेच, इतर देशही अमेरिकेवर प्रतिकरात्मक शुल्क लादू शकतात, ज्यामुळे व्यापारयुद्ध तीव्र होण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : AI वर बोलताना पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची जीभ घसरली; ‘ही’ लाजिरवाणी बाब सोशल मीडियावर VIRAL
ट्रम्प यांचे हे निर्णय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात आहेत. “अमेरिकन उत्पादनाला प्रोत्साहन” हा त्यांचा मुख्य निवडणूक मुद्दा राहिला आहे. त्यामुळे स्थानिक उद्योगांना संरक्षण देण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा अमेरिका फर्स्ट धोरण पुढे केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणांनी जागतिक अर्थव्यवस्थेत खळबळ उडवली आहे. औषधांपासून स्वयंपाकघरातील वस्तू, फर्निचर आणि जड ट्रकांपर्यंत – सर्व क्षेत्रात कर वाढवून त्यांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, अमेरिकेत उत्पादन करणाऱ्यांनाच प्राधान्य मिळेल. आता भारतासह जगातील इतर देश हे पाऊल कसे स्वीकारतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.