Pakistan again shaken by series of blasts in Lahore
Operation Sindoor : पाकिस्तान पुन्हा एकदा भीषण असुरक्षिततेच्या सावटाखाली आला आहे. गुरुवारी रात्री लाहोरच्या जुन्या विमानतळाजवळ एकामागून एक स्फोट झाल्याने शहर हादरून गेले, आणि संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षदर्शींनी दावा केला आहे की हे स्फोट क्षेपणास्त्रांद्वारे करण्यात आले, ज्यामुळे या घटनेला गंभीर राष्ट्रीय सुरक्षेच्या पातळीवरचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
स्फोटांची तीव्रता इतकी होती की लाहोर विमानतळ तातडीने बंद करण्यात आले, परिणामी अनेक उड्डाणे रद्द झाली किंवा विलंबित झाली. प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. घटनास्थळी धावलेल्या आपत्कालीन यंत्रणांनी परिसर सील करत मदतकार्य सुरू केले आहे.
या स्फोटांच्या बाबत अनेक प्रत्यक्षदर्शींनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, स्फोट अचानक आणि अत्यंत तीव्र आवाजासह झाले, जे कोणत्याही सामान्य बॉम्बपेक्षा वेगळे वाटले. एका प्रत्यक्षदर्शीने स्पष्टपणे म्हटले, “हा हल्ला क्षेपणास्त्राच्या माध्यमातून झाला होता. आकाशात चमक दिसली आणि काही सेकंदात प्रचंड स्फोट झाला.” यापैकी अनेकांनी दोन ते तीन स्फोट ऐकले असल्याचे सांगितले असून, या हल्ल्याने परिसरातील अनेक इमारतींना गंभीर नुकसान झाले आहे. छायाचित्रांमधूनही इमारतींचा धुळीचा खच झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : काय सत्य अन् काय तथ्य! ‘Operation Sindoor’नंतर पाकिस्ताननेही भारताचे पाच फायटर जेट पाडले…; पाक लष्करी प्रवक्त्यांचा दावा
हे स्फोट ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर घडले आहेत. भारताने २२ एप्रिलपासून सुरू केलेल्या या मोहिमेत पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर लक्ष्य करून हल्ले करण्यात आले होते. लष्कराच्या माहितीनुसार, या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यामुळे या स्फोटांकडे केवळ अंतर्गत अस्थिरतेच्या दृष्टिकोनातून नव्हे, तर प्रतिकारात्मक हल्ल्याच्या शक्यतेनेही पाहिले जात आहे.
फक्त भारताच्याच नव्हे, तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) कडूनही पाकिस्तानला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारी BLA ने पाकिस्तानी सैन्याच्या एका गाडीवर हल्ला केला, ज्यामध्ये अनेक सैनिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर, पाकिस्तानला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाच वेळी सुरक्षा संकटांचा सामना करावा लागत आहे.
लाहोरमध्ये झालेल्या या स्फोटांमुळे लाहोर विमानतळ बंद करण्यात आले आहे, ज्यामुळे शेकडो प्रवाशांचे हाल झाले आहेत. उड्डाणे रखडली असून, अनेक विमानांना अन्यत्र वळवण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाकिस्तान सरकार आणि सैन्य आता अधिक सतर्क झाले असून, लाहोर परिसरात तातडीचा अलर्ट लागू करण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हा तोच देश आहे जिथे लादेन… ‘, Operation Sindoor चा ब्रिटिश संसदेत बोलबाला, भारताचा पाकविरुद्ध मोठा संदेश
एकीकडे भारतीय लष्कराकडून सुरू असलेले सैनिकी दडपशाहीचे धोरण, दुसरीकडे बीएलएसारख्या देशांतर्गत बंडखोर संघटनांचा वाढता प्रभाव, आणि आता लाहोरमध्ये थेट क्षेपणास्त्र हल्ल्याच्या शक्यता. या सर्व घटना पाकिस्तानसाठी गंभीर इशारा ठरत आहेत. या हल्ल्याने पुन्हा एकदा दाखवून दिले की, पाकिस्तानची अंतर्गत आणि सीमावर्ती सुरक्षा धोक्यात आली आहे, आणि येत्या काळात देश अधिक अस्थिरतेच्या दिशेने झुकू शकतो.