Pakistan Army Chief Asim Munir Strict action taken against Imran Khan related military officers
इस्लामाबाद: पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी संबंधित लष्करी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली असल्याची माहिती मिळाली आहे. इम्रान खान यांना अलीकडेच 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. याशिवाय, त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांनाही 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा करण्यात आली. आता इम्रान खान यांच्या जवळच्या लष्करी अधिकाऱ्यांवर कारवाई करत लष्करप्रमुखांनी मोठा धक्का दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 9 मे 2023 रोजी पाकिस्तानमध्ये घडलेल्या घटनेनंतर लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी ब्रिगेडियर शोएब यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष चौकशी समिती स्थापन केली. या समितीचा उद्देश इम्रान खान यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या लष्करी अधिकाऱ्यांचा शोध घेणे हा होता. चौकशीदरम्यान 100 लष्करी अधिकारी असे आढळले असून त्यांचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे म्हटले जात आहे.
अटी मान्य न केल्याने इम्रान खान यांना तुरुंगवासाची शिक्षा
याआधी, इम्रान खान तुरुंगात असताना त्यांच्यासंमोर काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. लष्कराच्या अटींना मान्यता देतील, अशी अपेक्षा लष्करप्रमुखांना होती. मात्र, चर्चा फसल्याने आणि खान यांनी लष्कराशी सहकार्य करण्यास नकार दिल्याने त्यांना तुरुंगात शिक्षा सुनावण्यात आली. नंतर लष्करप्रमुखांनी कठोर पावले उचलत खान यांच्या समर्थक असलेल्या लष्करी अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली.
100 लष्करी अधिकाऱ्यांवर कारवाया
100 लष्करी अधिकाऱ्यांवर विविध स्वरूपाच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये 35 अधिकाऱ्यांना थेट सैन्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. 15 अधिकाऱ्यांना पेन्शनशिवाय सेवेतून काढण्यात आले, तर 20 अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्यात आली. याशिवाय, 50 अधिकाऱ्यांना कोणत्याही दोषाशिवाय निवृत्त करण्यात आले आहे. 5 अधिकाऱ्यांच्या सेवापुस्तकांवर प्रतिकूल नोंदी केल्या गेल्या आहेत, तर उर्वरित 10 अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा झाली आहे.
या निर्णयाने लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी इम्रान खान यांना एक स्पष्ट संदेश दिला आहे की, त्यांच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीला सूट मिळणार नाही. ही कारवाई लष्करप्रमुखांनी इम्रान खान यांना मानसिकदृष्ट्या तोडण्यासाठी केली असल्याचे मानले जाते. या घडामोडी पाकिस्तानमधील राजकीय अस्थिरतेचे व लष्कराच्या शक्तिशाली हस्तक्षेपाचे चित्रण करतात. त्यामुळे देशातील परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे.